शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!
शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!
मविप्र विधी महाविद्यालयातील शिवानी फडोळचे यश
नाशिक : एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कु. शिवानी रामनाथ फडोळ या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर दिवाणी न्यायाधीश परीक्षेत गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मविप्र पदाधिकारी, संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षणाधिकारी आणि शिक्षकांनी शिवानीचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकची कु. शिवानी रामनाथ फडोळ हिने गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला आहे. शिवानीने मविप्रच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातून शालेय शिक्षण घेतले असून, मविप्रच्याच विधी महाविद्यालयातून सन २०१६-२०२१ या दरम्यान शिक्षण घेतले आहे.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने मिळविलेले हे देदीप्यमान यश असून निकालाबाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. मविप्र विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या गडाख यांच्या हस्ते महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. निरंतर कठोर परिश्रम घेण्याची तयारी आणि ध्येय ठेवल्यास यश मिळविणे अवघड नाही. माझ्या यशामध्ये कुटुंबाचा भक्कम पाठिंबा तसेच, मार्गदर्शक शिक्षक, मित्र मैत्रिणींचीदेखील मोलाची साथ लाभली, असे यावेळी शिवानी फडोळ हिने सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा