मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे
मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु,
जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे
नाशिक : येत्या १२ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता नाशिकमध्ये होणाऱ्या ९ व्या राष्ट्रीय आणि १४ व्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवार (दि.१०) पासून ऑनलाइन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मविप्रचे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.
‘रन फॉर हेल्थ ॲण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रिदवाक्य घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने यंदा ‘मविप्र मॅरेथॉन-२०२५’ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे. गेल्या आठवड्यात रूट मेजरमेंट या कार्यक्रमाने या मविप्र मॅरेथॉनच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला असून, विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मविप्र मॅरेथॉनसाठीची नोंदणी प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. त्यासाठी क्यू आर कोड आणि ऑनलाइन लिंक तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी ९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता बंद होईल. अधिक माहितीसाठी https://www.nashikmvpmarathon.org/marathon/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
निवास व भोजनाची व्यवस्था
मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक टी शर्ट, फलाहार, अल्पोपहार दिला जाईल. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र व पदक, तर विजेत्याला ट्रॉफी, रोख स्वरूपातील बक्षीस, प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित केले जाईल.
. ..अशी असेल स्पर्धा
मविप्र मॅरेथॉनसाठी १४ गट तयार करण्यात आले असून, ५ किमी पासून ते ४२.१९५ किमी असे अंतर ठेवण्यात आले आहे. फूल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) आणि हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी) आणि (खुली १० किमी) साठी वयाची अट नसून कोणत्याही वयोगटातील पुरुष या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. ६० वर्षांवरील (पुरुष) ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ किमी अंतर ठेवण्यात आले आहे. सर्व वयोगटातील महिलांसाठी १० किमी, तर ३५ वर्षापुढील महिलांसाठी ५ किमी अंतर असेल. देशभरातील कुठल्याही शाळा-महाविद्यालयांतील १४, १७, १९ आणि २५ वर्षांआतील मुले आणि मुलींसाठी स्पर्धा खुली आहे.
*विजेत्यांना यंदा साडे आठ लाखांची बक्षीसे*
या स्पर्धेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. पाच हजार रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत अशी एकूण साडे आठ लाखांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. फूल मॅरेथॉन (४२.१९५ किमी) साठी एकूण ११ विजेत्यांना अनुक्रमे एक लाख ५१ हजारांपासून ते ११ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. हाफ मॅरेथॉन (२१.०९७ किमी)साठी एकूण ९ विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजारांपासून ते ३ हजारांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला व पुरुष १० किमी खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रत्येकी ९ अशा १८ स्पर्धकांना ११ हजारांपासून ते १ हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. १४, १७, १९ आणि २५ वर्षांआतील मुले आणि मुलींच्या खुल्या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटात सहा स्पर्धक निवडण्यात येणार असून, यामध्ये पाच हजारांपासून ते एक हजारापर्यंत रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा