‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती
‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !
सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती
नासिक (प्रतिनिधी )::- प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं कारण बनलेला मराठी चित्रपट 'गुलाबी' उद्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो. यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले.
'गुलाबी' चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वतःला शोधण्याचा संघर्ष हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो. एकत्र येऊन आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या या तिघींच्या प्रवासातून मैत्रीचे गहिरे रंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतील.
या चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रेक्षकांसमोर आले असून, त्याला साई-पियुष यांचे संगीत लाभले आहे. मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणं हंसिका अय्यर यांनी गायलं आहे. जयपूरच्या विविधरंगी वातावरणात तिघी मैत्रिणींच्या मैत्रीची धमाल यात अनुभवायला मिळते. हे गाणं तितकंच उत्साहपूर्ण असून, प्रेक्षकांच्या मनात घर करणारं आहे.
त्याचप्रमाणे, ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहे. अदिती द्रविड यांनी लिहिलेलं हे गाणं राहुल देशपांडे यांनी आपल्या मोहक आवाजात गायलं आहे. या गाण्यात तिघींच्या आयुष्यातील प्रवास आणि त्यांचा स्वत्वाचा शोध अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. जयपूरच्या रंगीत रस्त्यांमध्ये या गाण्याचं सादरीकरण झाल्यामुळे त्याला एक अनोखा रंग मिळतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, 'गुलाबी' चित्रपटाचं शीर्षक गीत या तिघींच्या आयुष्यातील उत्साह, आनंद आणि मोकळेपणाचे प्रतीक आहे. आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नांची एक अनोखी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूरच्या सुंदर निसर्गात प्रेक्षकांना या तीन स्त्रियांच्या जीवनातील विविध रंग अनुभवता येतील.”
गुलाबी चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, सुहास जोशी, शैलेश दातार, निखिल आर्या आणि अभ्यंग कुवळेकर या गुणी कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या स्त्रीप्रधान चित्रपटाची कथा स्त्रियांच्या नात्यांवर, त्यांची स्वप्नं आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यांवर आधारित आहे, जी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, 'गुलाबी' हा केवळ महिलांचा चित्रपट नाही, तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आई, बहिण, पत्नी, मुलगी किंवा मैत्रिणीसोबत बघावा, कारण या चित्रपटात जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे.”
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली शिवणकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा