बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी
पहिले १००० दिवस महत्वाचे !
नाशिक ( प्रतिनिधी) - माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या काळात बाळाच्या मेंदूची ७५ टक्के वाढ पूर्ण होते. बाळ गर्भावस्थेत असल्यापासून पहिले १००० दिवस त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात बाळाला योग्य पोषण, माया देऊन त्याचे उत्तम संगोपन केले तरच मेंदूची पूर्णपणे वाढ होते. मेंदूतील अनेक केंद्रांची जोडणी होऊन बाळाची आकलन शक्ती, समाजिक कौशल्ये विकसित होते. त्याचा योग्य दिशेने संज्ञात्मक व गुणात्मक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा असून बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची जरुरी असते. आई देखील सशक्त, निरोगी व आनंदी असणेही महत्वाचे आहे. मुलाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याला वेळच्यावेळी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. युनिसेफ व सर्वजणी महिला उत्कर्ष संस्थेच्या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली.
प्रारंभी सुजाता शिर्के यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या संदर्भात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमाद्वारे समाज प्रबोधन केले पाहिजे. तरच सुदृढ भावी समाज निर्माण होईल. डॉ. के. आर. खरात यांनी तपशीलवार आढावा घेतला. ते म्हणाले गर्भावस्थेत बाळ २७० दिवस होते. पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे ३६५ + ३६५ दिवस मिळून १ हजार दिवस होतात. याच काळात बाळाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो. बाळाच्या दुसऱ्या वाढदिवशी जेव्हढी उंची असते त्याच्या दुप्पट उंची तरुणावस्थेत होते व तिच कायम रहाते. गर्भवस्था काळ देखील ९०+९०+९० = २७० दिवस असतो. त्या काळात माता व बालकाची योग्य दक्षता घ्यायला हवी. भारतासह कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षाखालील ४३ टक्के बालकांना बुटकेपणा व वाढ खुरटण्याचा धोका आहे. अतितीव्र कुपोषणाच्या समस्येला तोंड देत आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ.खरात पुढे म्हणाले, शासनातर्फे गर्भवती महिलांना विनामूल्य औषधे, पोषणआहार दिला जातो व बालकांचे वेळोवेळी लसीकरण केले जाते. ते वेळापत्रक काटेकोरपणे पाळले पाहिजे.
निकृष्ट आरोग्य, अपुरे पोषण, ताणतणाव, वयोगटानुसार कमी प्रमाणात मिळणाऱ्या सोयीसुविधा यांच्या अभावामुळे लाखो बालके अपयशी ठरतात. महाराष्ट्राने ५ वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर कमी करण्याचे शाश्वत विकास ध्येय गाठले आहे. तरीही राज्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त असून एकतृतीयांश बालके तीव्र कुपोषित असून अपेक्षित उंचीपेक्षा बुटकी आहेत. तर प्रत्येक चौथे बालक कमी वजनाचे आहे. ज्या बालकांना योग्य आहार, प्रेम, पोषण मिळत नाही ते वारंवार आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. स्पर्धेच्या युगात ते मागे पडतात. वंचित कुटुंबात जन्मलेल्या बालकांना योग्य विकासाच्या संधी लवकर उपलब्ध करुन दिल्या तर त्यांचीही प्रगती होते. देशाने व राज्यांनी बालविकासासाठी गुंतवणूक करणे हा समृद्धीकडे वाटचाल करण्याचा प्रभावी मार्ग आहे असे त्यांनी नमूद केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा