।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।
।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।
२२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून घरोघरी कार्यक्रमाची पत्रिका, मंदिराचा फोटो, आणि अक्षदा पोहोचवल्या गेलेल्या आहेत. २२ जानेवारी रोजी घरोघरी उत्सव साजरा होत आहे . बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्याला मूर्तीची स्थापना होणार आहे. याप्रसंगी आपल्याकडे आपल्या अक्षदा रामाला वहायच्या आहे. राम नामाचा जप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. दिवे लावायचे आहे. रोषणाई करायची आहे. पंजीरीचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवा.( पंजीरी म्हणजे, गुळ, धनेपावडर, सुंठ, खडीसाखर, खोबरे. एकत्रित पावडर.) दिवाळी साजरी करायची आहे. राम नामाचा झेंडा हाती घेतलेला प्रत्येकाने फोटो काढायचा आहे. एकूणच सर्वदूर राममय वातावरण झालेले आहे. अनेक ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून एकत्रित जप रामरक्षा स्तोत्र पठण सुरू आहे. शाळांमधून रामरक्षा स्तोत्र म्हटले जात आहे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्या दृष्टीने गावोगावी ते सुरू आहेत. जेणेकरून सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्या स्तोत्र आणि मंत्रांच्या लहरी आजूबाजूला निर्माण होत आहेत. पुणे,( स.प कॉलेजच्या मैदानावर) नाशिक, जळगाव, अशा अनेक ठिकाणी रामरक्षा स्तोत्र, राम नामाचा जप, सामुदायिक केला गेला. अनेक काँलन्या, अपार्टमेंट मध्ये रोज जप, स्तोत्र पठण उत्साहात होतेय.
"रामरक्षा" हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे ज्यामध्ये स्तुती केली जाते ते स्तोत्र होय. रामरक्षेच्या सुरवातीलाच, "अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मन्त्रस्य" असे म्हटले आहे. रामरक्षा हे स्तोत्र तर आहेच पण ते मंत्र सुद्धा आहे. रामरक्षा हे स्तोत्र विश्वामित्रांच्या कुळातील बुधकौशिक ऋषी यांनी लिहिले. त्यांना हे मंत्र स्वप्नात भगवान शंकरांनी त्यांना सांगितले. (आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमां हरः) एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्.
या स्तोत्रामधील एक एक अक्षर महापातकाचा नाश करते – कारण ह्या मंत्राचे आराध्य दैवत कोण आहेत तर श्री प्रभू रामचंद्र हे परमात्मा होय. ह्या स्तोत्रामधील फार महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली आहे.
गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा रामरक्षा स्तोत्र व एकवेळ मारुती स्तोत्र श्रद्धापूर्वक म्हटल्यावर ते सिद्ध होते. रामरक्षेत प्रत्येक अवयवांचे साठी स्वतंत्र श्लोक आहेत. त्यामुळे त्या त्या अवयवांचे विकार बरे होतात..
राम रक्षा पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथित्मजः ।।
कौसल्येयो दृशौपातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितनः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।।
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजितः ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभि जाम्बवदाश्रयः ।।
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरु रघुत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ।।
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोsखिलं वपुः ।।
असे कवच या रामरक्षा स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे.
रामाने आपले रक्षण करावे, यासाठी रामरक्षेच्या चौथ्या श्लोकापासून आपल्या शरीराच्या एकेक अवयवाचे रक्षण रामाने कसे करावे, याबद्दल वर्णन केले आहे.
माझ्या शिराचे रक्षण करावे, कपाळाचे रक्षण करावे. माझ्या डोळ्याचे रक्षण करावे. माझ्या कानाचे रक्षण करावे. माझ्या नाकाचे आणि मुखाचे म्हणजे केवळ ऐकणे बोलणे नसून संपूर्ण चेहेरा. आपले व्यक्तिमत्व आपल्या चेहेऱ्यावर अवलंबून असते, त्याचे रक्षणरामाने करावे.
जिव्हा, हा महत्वाचा अवयव. आपण काय बोलतो आणि काय खातो यावर नियंत्रणासाठी जिभेचे अनन्य साधारण महत्व आहे. तिचे रक्षण सर्व विद्या धारण करणाऱ्या श्रीरामाने करावे. रामाने माझ्या कंठाचे रक्षण करावे. रामाने माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करावे. माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे. रामाने माझ्या हातांचे रक्षण करावे. रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे. शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर किंवा जठराग्नी ज्याचे कार्य समान वायूवर अवलंबून असते त्या माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण रामाने करावे. जाम्बुवन्तांनी ज्याचा आश्रय घेतला त्या श्रीरामाने माझ्या नाभिचे म्हणजेच बेंबीचे रक्षण करावे. सुग्रीवाचा स्वामी रामाने माझ्या कमरेचे रक्षण करावे. रामचंद्रांनी माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करावे. रामाने माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे. माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करावे. रामाने माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करावे.
माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करावे. प्रभू श्रीरामाने माझ्या सर्व शरीराचे रक्षण करावे.
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत्।
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥
याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य पठण करेल तो दीर्घायुषी होईल. तो सुखी होईल. तो पुत्रवान होईल आणि सर्व कार्यात विजय मिळवणारा म्हणजेच यशस्वी होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एवढे सगळे मिळून सुद्धा तो विनयसंपन्न अर्थात तो नम्र राहील. ज्यांना आपदा म्हणजेच संकट नको असेल त्यांनी रामरक्षेचे पठण नियमित करावे. ते श्रद्धेनं करणे गरजेचे आहे. कारण, श्रद्धावान लाभते ज्ञानं, असे म्हटले आहे.
● जय जय रघुवीर समर्थ.
रामदास स्वामींनी खूप खडसर तपश्चर्या केली आणि आत्मसाक्षात्कार करून घेऊन रामनामाचा प्रचार आणि प्रसार केला. समर्थ रामदास स्वामी घरून निघाले ते पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. नाशिकमधील टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले.
समर्थ दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता. आपल्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी रामा आधी वदावा.
● "जेथें रामनाम तेथे माझे प्राण". असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमीच सांगायचे. नाम परमेश्वरप्राप्तीचे कर्म-योग-ज्ञान या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताची अनेक रूपे नाहीशी झाली, तरी त्याचे नाम देशकालातीत असते. नाम श्रेष्ठ आहे.
गोंदवलेकर महाराज हे तुकारामचैतन्यांकडे( तुकामाई) गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरूसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकारामचैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.
सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रें निर्माण केली.
गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांची व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसे करावे हे शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला. आजही गोंदवले येथे सतत राम नामाचा जप सुरूच असतो. रामनामी पावन झाली ईथली माती.. येथे प्रकटली चैतन्य मुर्ती.
●साखरखेर्डा( बुलढाणा)
विदर्भ प्रांतातील प्रल्हाद महाराजांनी अनेक ठिकाणी रामाची व मारुतीची मंदिरे उभारली. आजीवन रामनामाचा प्रसार आणि प्रचार केला. भजनपूजन, कीर्तन, प्रवचन, उपासना, १३ कोटी रामनाम, यज्ञयाग, रामायण व भागवत सप्ताह, तीर्थयात्रा इत्यादींच्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्गाला लावले. रामनामावर त्यांंचा सर्वाधिक भर होता. सर्व भाविकांना ते आवर्जून सांगत, ‘‘रामनाम घ्या. सदासर्वकाळ रामाचा आठव करा. नामाचे अनुसंधानात रहा. नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा. देवाचे स्मरण ते जीवन, देवाचे विस्मरण ते मरण हे विसरू नका. मानवाच्या वाट्याला जी सुखदःखे येतात ती देवाच्या ईच्छेनेच हे पक्के समजा. सतत नामस्मरण करून रामाची करुणा भाका. रामराय तुमचं कल्याण करील,’’ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराज होत. महाराज नामावतार म्हणूनच ओळखले जात. प्रल्हाद महाराजांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
● मुळ नागपूर येथील दत्ता भैया महाराज नोकरी व्यवसाय निमित्त बरेच वर्षे कलकत्त्याला होते.
बराच काळ मध्यप्रदेशात गेला, ते नामयोगी दत्ता भैया महाराज म्हणून ओळखले जात होते त्यांना सर्वजण दत्ता काका असे म्हणतात. ते सतत राम नामाचे जपात तल्लीन असत. अखंड रामनामाचा जप करीत असत ते गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांचा खामगाव, बुलढाणा, मेहकर, नागपूर, कलकत्ता, झांशी, मध्य प्रदेश आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तवर्ग आहे ."नाम घ्या आणि आनंदात रहा" असे ते म्हणत. रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. श्रीराम जय राम जय जय राम, जप सतत करीत असत आणि सगळ्यांकडून जप करून घेत होते. दोन-तीन वेळा मलाही त्यांच्या दर्शनाचा आणि प्रवचनाचा लाभ झाला त्यांची खूप मोठी साहित्य संपदा आहे. अगदी सोप्या भाषेतून त्यांनी कठीण प्रसंगातून तरुन जाणे साठी आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले आहे.
अशाप्रकारे समर्थ रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प्रल्हाद महाराज ,आणि नामयोगी दत्ता भैया महाराज, यांनी संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्रा बाहेरही राम नामाचा प्रसार, प्रचार केला. सगळ्यांना राम नाम घेण्यास प्रवृत्त केले. आता हे निमित्त साधून आपण सगळ्यांनीच रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, दत्ता भैय्या महाराज, आणि प्रल्हाद महाराज यांची साहित्य संपदा आवर्जून वाचायला हवी आहे. आणि आपण सर्वजण या कार्यात सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे.
राम नाम उच्चरा जन्माचे सार्थ करा.. नामस्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा..
दिलीप देशपांडे
जामनेर,,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा