जगातील पहिला मराठी ओटीटीचा मानकरी 'प्लॅनेट मराठी' ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा !
जगातील पहिला मराठी ओटीटीचा मानकरी 'प्लॅनेट मराठी' ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा !
गुरुदत्त वाकदेकर यांजकडून,
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक,
मुंबई::- महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाभलेला साहित्याचा वैभवशाली वारसा जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अक्षय विलास बर्दापूरकर यांनी 'प्लॅनेट मराठी' या ओटीटीची सुरुवात केली. मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंट देणाऱ्या या प्लॅनेट मराठीला आता यशस्वी दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. जगातील पहिल्या मराठी ओटीटीचा मान मिळवणाऱ्या प्लॅनेट मराठीने अनेक जबरदस्त चित्रपट, वेबसिरीज, शोज, इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यातील रान बाजार, मी पुन्हा येईन, अनुराधा, अथांग, बदली या सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज तर पटलं तर घ्या आणि कलरफुल कोकण हे शोज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमाशा लाईव्ह हा ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेला सिनेमा ठरला तर "पाँडिचेरी अणि जूनला" प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळालं. याव्यतिरिक्त टॉक शोज, शॉर्ट फिल्म्स, सांगीतिक मैफल असे बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रमही प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून जगभरात पोहोचवले. या काळात अनेक नवोदितांना उत्तम व्यासपीठ मिळवून दिले. या सगळ्याच्या निमित्ताने प्लॅनेट मराठी सोबत अनेक नामवंत जोडले गेले. यामुळेच प्लॅनेट मराठीने अल्पावधीत मराठी प्रेक्षकांच्या मनात एक स्वतःची जागा निर्माण केली आहे. प्लॅनेट मराठीने ग्रामीण, शहरी, तरुणाई, बच्चे कंपनी अशा सगळ्याच प्रकारच्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. प्लॅनेट मराठीच्या या यशस्वी वाटचालीबद्दल अनेक कलाकारांनी, मान्यवरांनी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्लॅनेट मराठीला शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''जगातील एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅनेट मराठीला दोन वर्षं पूर्ण होत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्लॅनेट मराठीला आणि प्लॅनेट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय दर्जेदार कंटेंट प्लॅनेट मराठीने आपल्या प्रेक्षकांपुढे पोहोचवला आहे आणि जगभरातील जे मराठी प्रेक्षक आहेत, त्यांच्यापर्यंत सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य, नाटकं, गाणी, सिनेमे, वेबसीरिज पोहोचवण्याचे काम या ओटीटीने केले आहे. मला याही गोष्टीचा आनंद आहे, की आता 'प्लॅनेट भारत' हा ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील लवकरच लाँच होणार आहे. त्यामुळे त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो.''
प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''आज दोन वर्षं झाली आहेत. प्रेक्षकांकडून जे भरभरून प्रेम मिळतंय, त्यामुळे खूप छान वाटतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्लॅनेट मराठीला शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. यापेक्षा आणखी काय हवं ? प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कंन्टेन्ट द्यायचा, हे सुरुवातीपासून दिलेले वचन पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही कायम करत राहणार. येत्या काळात आम्ही नवनवीन विषय, काही भव्य प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच अजून चांगल्या कंटेंटची निर्मिती करण्याची ऊर्जा मिळते. यापुढेही आम्ही असेच मनोरंजन करत राहू असे बर्दापूरकर यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा