सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !
सृजनाच्या वाटा : परिचयाचा उत्कृष्ट नमुना !
महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उद्धव भयवाळ यांची साहित्याच्या प्रांतात विनोदी कथासंग्रह, बालकथासंग्रह, काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, एकांकिका लेखन, लावण्या, दिवाळी अंकात लेखन आणि हिंदी भाषेतील लेखन अशी यशस्वी घोडदौड सुरू असताना त्यांनी आता विविध लेखकांच्या पुस्तकांचे परिचयात्मक लेखांचा संग्रह प्रकाशित करणे अशी भरारी घेतली आहे. कारण नुकताच त्यांचा 'सृजनाच्या वाटा' हा परिचय आणि प्रस्तावनांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. शॉपिझेन डॉट इन या नामांकित प्रकाशन संस्थेने अत्यंत आकर्षक, देखण्या स्वरूपात तो संग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ, कागद, छपाई, अक्षरांचा आकार, इत्यादी बाबतीत अत्यंत सुस्वरूपात हा संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे, हा संग्रह हाती घेतल्याबरोबर वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतील हे निश्चित !
अंतरंगात लेखकाची लेखणी वाचकांना खिळवून ठेवण्यासाठी समर्थ नि सशक्त आहे. या संग्रहात एकूण सव्वीस लेख आहेत. ज्यात अठरा लेख हे परीक्षणात्मक आहेत, सहा लेखांना भयवाळ ह्यांनी दिलेल्या प्रस्तावनांचा समावेश केला आहे आणि दोन पुस्तकांची केलेली पाठराखण अशी एकूण संग्रहाची मांडणी केली आहे. ज्या लेखकांच्या पुस्तकांसंदर्भात लेखकाने तळमळीने लिहिले आहेत त्यामध्ये प्रकाश क्षीरसागर, अरुण देशपांडे, नागेश शेवाळकर, भारत धनावडे, भारती बाळकृष्ण सोळंके, धर्मराज माहुलकर, शरद पुराणिक, प्रा. देवबा पाटील, गेणू शिंदे, उत्तम सदाकाळ, प्रा. रमेश कुलकर्णी, लक्ष्मण दिवटे, भास्करराव मुंडलिक, आर.पी.दुसे, सौ. भारती सावंत, नीळकंठ लोसरवार, शिवाजी सांगळे, देविदास अधिकार, कालिंदी पांडे इत्यादी साहित्यिकांच्या साहित्य कृतीवर उद्धव भयवाळ यांनी प्रकाश टाकला आहे. लेखकाकडे परिचयासाठी आलेली पुस्तके केवळ महाराष्ट्रातील लेखकांची नाहीत तर गोवा राज्यातील एका कवीचा काव्यसंग्रह आलेला आहे याचा अर्थ भयवाळ यांचे पाऊल पुढे पडत असल्याची ही चाहूल आहे.
लेखकाची अनुभव समृद्धी, शब्द संपत्ती ह्या लेखांमध्ये ठिकठिकाणी जाणवते. वास्तविक पाहता समीक्षा, परीक्षण हे तर दूर राहिले परंतु कोणत्याही साहित्याचा परिचय करून देणे सोपे नसते हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे लेखकाचा अनुभव, अभ्यास, तळमळ, वातावरण, मूड इत्यादी अनेक बाबी त्या साहित्य अपत्यावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. एखादा विषय दहा लेखकांना लिहायला दिला तर प्रत्येकाच्या लेखणीतून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य जन्मू शकते यानुसार समीक्षक किंवा परिचयकर्ता हाही लेखकच असतो. त्यामुळे कोणत्याही साहित्य कृतीचा परिचय करून देताना परिचयकर्ता लेखन करीत असतो. त्यादृष्टीने जेव्हा उद्धव भयवाळ यांच्यासारखा ज्येष्ठ आणि कसदार साहित्यिक एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देतो तेव्हा तो स्वतः लेखकाची भूमिका बजावतो आणि तरीही संग्रहातील एकूण एक लेख वाचताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भयवाळ ह्यांनी केवळ वाचकाची भूमिका बजावली आहे. कुणासही अनाठायी सूचना, मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. दुसऱ्या शब्दांत लेखकांचा, त्यांच्या लेखणीचा, अनुभवाचा, मांडणीचा मान राखून कौतुकच केले आहे. जे नव्याने लिहिणारांना प्रेरणादायी, स्फूर्तिदायक ठरू शकते. याठिकाणी गुरूवर्य प्रा. राम शेवाळकर यांचा अनुभव उद्धृत केला तर तो अनाठायी ठरू नये. एकदा एका लेखकाने त्याचा पहिला संग्रह प्रा. शेवाळकर यांची प्रस्तावना मिळावी म्हणून त्यांच्याकडे दिला. शेवाळकरांनी प्रस्तावना लिहिताना काही सूचना केल्या ज्या लेखकास आगामी लेखनासाठी उपयुक्त ठराव्यात यासाठी ! यथावकाश ते पुस्तक प्रकाशित झाले आणि एक प्रत प्रा. शेवाळकर यांच्याकडे आली. त्यावेळी शेवाळकरांच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे शेवाळकरांनी ज्या सूचना केल्या होत्या त्या सोईस्करपणे बाजूला करून प्रस्तावना छापली होती. असो.
समीक्षा म्हणजे दोन्ही बाजू समोर याव्यात अशी असावी परंतु आजकाल अनेक लेखकांना दोष दाखवलेले पटत नाहीत. परंतु स्वतः भयवाळ यांचाही दृष्टिकोन कुणाला दुखावण्याचा नसून त्या लेखकाने घेतलेले कष्ट पाहता कौतुक करणे हाच आहे, कारण मुळात लेखकाचा मूळ स्वभाव कुणाचेही दोष काढण्याचा नसून प्रत्येकाचे कौतुक, शाब्दिक शाबासकी देण्याचा आहे. कुणाला दुखावणे हे त्यांच्या स्वभावात बसत नाही म्हणून ह्या संग्रहाचे मोल निश्चितपणे वाढले आहे. 'संग्रह वाचून आत्मिक समाधान मिळते', 'राष्ट्रप्रेम जागृत करणारा संग्रह', अशा शब्दांमध्ये या साऱ्यांचा परामर्श लेखकाने सविस्तरपणे पुस्तकात घेतला आहे, संवेदनशील मनाने लिहिलेल्या कविता, निर्मळ आणि हलकाफुलका विनोद, वाचकाची उत्सुकता ताणून ठेवणारे कथानक, विज्ञान कथेचा उत्कृष्ट नमुना, वाचनाचा आनंद देणारा संग्रह, तरुणांच्या भावी जीवनाचा वाटाड्या, मुलांच्या भावविश्वाचा ठाव घेणारी कोडी, अचूक प्रसंगनिर्मिती आणि सरस शेवट, छोट्यांच्या मनावर आनंदाचा वर्षाव करणारा संग्रह, ज्येष्ठांचा सखा, हृदयद्रावक चित्रण, सद्गुरूला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही, ललितलेखनाचा उत्तम नमुना, कवितासंग्रह म्हणजे केवळ प्रतिभेचा स्पर्श नसून प्रतिभेचा ठेवाच आहे अशा वाक्यांची पेरणी म्हणजे सिद्धहस्त लेखक भयवाळ यांची एक प्रकारची शाबासकी आहे ज्यामुळे लेखकाच्या भविष्यकालीन लेखनाला एक आगळीवेगळी ऊर्जा मिळण्यासारखे आहे.
समीक्षण, परीक्षण किंवा परिचय लेख वाचून ते पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण व्हावी असे लेखन असावे या निकषावर उद्धव भयवाळ यांचे सर्वच लेख, ते ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे आहेत हे निश्चित ! 'कोण्याही जीवाचा न घडो मत्सर' हा भयवाळ यांच्या आस्वादात्मक लेखनाचा आत्मा आहे आणि तो या संग्रहात
जाणवल्याशिवाय राहत नाही. स्वतः लेखक 'दोन शब्द' लिहिताना म्हणतात, 'मी पुस्तकांना लिहिलेली प्रस्तावना असो, ब्लर्ब असो की पुस्तकांचे केलेले परीक्षण असो, हा केवळ औपचारिकपणा नव्हता, तर मलाही व्यक्तिशः त्यांच्या लेखनात काही वैशिष्ट्य दिसले म्हणून मला लिहावेसे वाटले. मी निवडलेल्या पुस्तकांमध्ये प्रत्येक लेखकाची / कवीची लेखनशैली, मांडणी, शब्दसौष्ठव, भाषासौंदर्य, रचना या गोष्टींनी माझ्या मनामध्ये घर केले.'
उध्दव भयवाळ यांच्या लेखणीतून नव्याने लिहिणारांना प्रोत्साहन मिळो आणि भयवाळ यांचा आस्वादात्मक लेखवृक्ष भरभरून बहरून येवो ही अपेक्षा! शुभेच्छा!!
००००
सृजनाच्या वाटा::-परीक्षण, प्रस्तावना संग्रह
लेखक : उद्धव भयवाळ (८८८८९२५४८८)
प्रकाशक : शॉपिजेन डॉट इन, अहमदाबाद (गुजरात)
पृष्ठ संख्या : ७१
किंमत : २५०\- ₹
आस्वादक : नागेश शेवाळकर, पुणे
***********************************
सदर परिक्षण नागेश शेवाळकर यांनी लेखक उध्दव भयवाळ यांच्या "सृजनाच्या वाटा" या पुस्तकाविषयी लिहिले आहे, त्या परिक्षणाशी न्यूज मसाला व संपादक सहमत असतीलच असे नाही.
************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा