नांदगाव येथील "गिरणा वसाहतीचं" अनोखं स्नेह संमेलन ! तब्बल ३५ वर्षांनंतर १८० सभासद एकत्र !
नांदगाव येथील "गिरणा वसाहतीचं" अनोखं स्नेह संमेलन ! तब्बल ३५ वर्षांनंतर १८० सभासद एकत्र !
न्यूज मसाला वृत्तसेवा,
नासिक::- नांदगाव तालुक्यातील साकोरा रोडवर असलेल्या गिरणा वसाहतीत साधारण सन १९६० ते सन २००५ या कालावधीत वास्तव्यास असलेल्या तत्कालीन लहान थोर अबालवृद्धांचा स्नेह मेळावा त्रंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट, नाशिक येथे अनोख्या पद्धतीने रविवार दिनांक ६ ऑगष्ट २०२३ रोजी आनंदोत्सवात साजरा झाला. या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष स्थान गिरणा कॉलनीतील जेष्ठ सदस्य शाम जोशी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई येथुन सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले इंजि. पी. आर. भामरे व जलसंपदा विभागातुन मुख्य अभियंता म्हणुन सेवानिवृत्त झालेले इंजि. र. वा. निकुम हे उपस्थित होते.
गिरणा वसाहत नांदगाव येथे शासकीय सेवेनिमित्त आपले जीवन व्यथित केलेले साधारण १०० कुटुंबातील १८० सभासद या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते. स्नेह मेळाव्यास उपस्थित असणारे सभासद साधारण ३६ वर्षानंतर एकमेकांना भेटुन आपल्या कौटुंबिक जीवनाच्या विचारांची देवानं घेवाण उपस्थितांनी केली. जुन्या आठवणींना उजाळा देतांना गिरणा वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांनी सुख दुःखात केलेल्या मदतीच्या आठवणी उजाळा देतांना काही सभासदांना गहिवरुन येत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा गिरणा वसाहतीचे तत्कालीन कुटुंब प्रमुख म्हणुन भुमिका निभावले इंजि. पी. आर. भामरे यांनी आजच्या या स्नेह मेळाव्यामुळे मी माझ्या जीवनात भुतकाळात ३५ वर्षे मागे गेल्याचा भास होत असल्याचे नमूद केले. आजही गिरणा वसाहतवासीय एकमेकांच्या सुख दुःखात सोबत असतात ही खूप मोठी गिरणा वसाहतीची उपलब्धी असल्याचे नमूद केले.
स्नेह मेळाव्यास उपस्थित महिलांनी भावना व्यक्त करतांना आमचं माहेर हे गिरणा वसाहत आहे हे अभिमानाने आम्ही लोकांना सांगतो असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात शाम जोशी यांनी सांगितले की गिरणा वसाहत म्हणजे समृद्धीने नटलेलं छोटं गाव होतं. काळाच्या ओघात गिरणा वसाहत मोडकळीस आलेली असतांना तिथं रहिवास केलेली माणसं अजुनही प्रेमानं एकमेकांच्या संपर्कात आहे याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना इंजि. र. वा. निकुम यांनी गिरणा वसाहतीचा इतिहास नमूद केला. गिरणा वसाहतीचा गौरव म्हणून गिरणा वसाहतीत वास्तव्यास असतांना सन १९६० ते २००० च्या काळात जन्मास आलेली पिढी नांदगावसह नाशिक जिल्ह्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या सीमा ओलांडून राज्य देश व विदेशात कर्तुत्वस्थानी कार्यरत असणाऱ्या पिढीने आज हा गिरणा वसाहतीतील वास्तव्यास असणाऱ्या तत्कालीन लहान थोर आबालवृद्ध या समाजमनाचा स्नेहमेळावा आयोजित केला ही खुप मोठी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. आजच्या पुरुष प्रधान संस्कृतीत कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याठिकाणी पुरुषांचे पुढारपण अजुनही विविध ठिकाणी पहावयास मिळते. परंतु नांदगाव येथील तत्कालीन गिरणा वसाहत वासियांचा स्नेह मेळावा आयोजनात महिलांचा सहभाग हा अग्रभागी होता त्यामुळे त्यांचे निकुम यांनी विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित लहान थोर मंडळींचा परिचय करुन देण्यात आला. उपस्थित सर्वांनी आपली ओळख करुन देतांना गिरणा कॉलनीतील वास्तव्याच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या बबली शेख, किरणताई शिंदे, लीनाताई थोरात, पुष्पाताई बोरसे व गजानन जोशी यांचा विशेष सन्मान उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य भारतीताई बागुल व जी. पी.खैरनार यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवा उद्योजक वैभव जोशी यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा