शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !
शास्त्रीय गायक, मार्गदर्शक पं. शशिकांत मुजुमदार यांचे निधन, संगीतक्षेत्रात शोक व्यक्त !
नाशिक ( प्रतिनिधी ) पंडित शशिकांत मुजुमदार ( ८७) यांचे अल्पश्या आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, दोन बंधू असा मोठा परिवार आहे. काल रविवारी सकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
त्यांचा अल्प परिचय - शशिकांत मुजुमदार यांचा जन्म १९३७ साली नाशिक येथे झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून संगीताची आवड असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी विष्णू संगीत विद्यालयामध्ये स्व. त्रिवेदी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास पाठवले. शालेय शिक्षण चालू असताना संगीताचे शिक्षण पण सुरु होते. इच्छा असूनही आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नसल्याने मोठ्या गायकाकडे गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेता आले नाही. मुंबईला पंडित फिरोज दस्तुर यांच्याकडे त्यांनी काही काळ मार्गदर्शन घेतले. पण तेही पुढे जास्ती दिवस जमले नाही. नंतर स्वतः कठोर रियाज करून किराणा घराण्याचे संगीत आत्मसात केले. सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून काम केले. नंतर जु. स. रुंग्टा हायस्कूल, पुरूषोत्तम हायस्कुल व पुष्पावती विद्यालयामध्ये लिपिक म्हणून ३० वर्ष सेवा बजावली.
निवृत्तीनंतर पूर्णवेळ संगीतसेवा केली. अनेक विद्यार्थी घडवले. नामवंत कलाकारां सोबत त्यांनी अनेक मैफलीत सहगायक म्हणून स्वरसाथ केली. लोकहितवादी मंडळातर्फे राज्यपातळीवर शास्त्रीय संगीत स्पर्धांमध्ये प्रथम व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते त्यांना मिळाले. संगीतविशारद पदवी संपादन केल्यानंतरही त्यांनी अनेकांना सांगितिक मार्गदर्शन केले. निवृत्तीनंतर पंडित कुमार गंधर्व यांच्या अनेक बंदिशी आत्मसात करून सखोल अभ्यास केला. त्यांना सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार व अनेक सन्मान प्राप्त झाले. नाशिकच्या संगीतक्षेत्रात त्यांना आदराचे स्थान होते. विविध मैफलींना ते शेवटपर्यंत हजेरी लावत. छायाचित्रकार रघुनंदन मुजुमदार यांचे ते वडील होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा