अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !!
अहिरे यांना राज्यशासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर ! सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव !!
ग्रामविकास विभागाच्या वतीने २०२० -२१ गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा
नाशिक : ग्राम विकास विभागांतर्गत राज्य शासनाच्या तसेच पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात, अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्याचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते. असे प्रकल्प पूर्ण करताना अधिकारी / कर्मचाऱ्यामधील विशेष वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता आढळून येते. अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय, दिनांक २ सप्टेंबर २००५ अन्वये सन २००५-२००६ पासून सुरु केली आहे. त्यानुषंगाने सन २०२० २०२१ यावर्षी ग्राम विकास विभागातील मंत्रालयातील (खुद) व क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्काराची घोषणा ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक प्रदीप अहिरे यांची निवड गुणवंत कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेत उत्कृष्ठ काम केले आहे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात देखील काम केले असून जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची निविदा प्रक्रिया यशस्वीरित्या राबवली, जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीची रचना बघता निविदा प्रक्रिया राबवताना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातच ही निविदा राबवताना प्रदीप अहिरे यांना कोरोनाची देखील लागण झाली होती परंतु अशा परिस्थितीत देखील त्यांनी काम करत यशस्वीरीत्या ही निविदा प्रक्रिया राबवली. जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील अहिरे यांचा सहभाग असतो. सद्यस्थितीत प्रदीप अहिरे हे पंचायत समिती इगतपुरी येथील शिक्षण विभागात कार्यरत असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पंचायत समिती इगतपुरीच्या गट विकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी गुणवंत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रदीप अहिरे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा