श्री शृंगेरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न !

श्री शृंगेरी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न !

               नाशिक ( प्रतिनिधी ) पंचवटीतील श्री शृंगेरी मठात सोमवारी (दि. ३) गुरुपौर्णिमा महोत्सव व महर्षी वेदव्यास पूजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. गुरुवंदन, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, एकावर्ती रुद्राभिषेक, श्री जगदगुरू आदि शंकराचार्य पादुका पूजन, महर्षी वेद व्यास प्रतिमा पूजन तसेच आद्य गुरुपरंपरेचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पौरोहित्य वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जोशी, मंगेश जोशी, प्रसन्न जोशी, श्रीपाद गायधनी, अंकित पांडे,  प्रणव कावळे, जीवन भटमुळे, सौरभ कापसे यांनी केले. मठाचे व्यवस्थापक रामगोपाल व्ही. अय्यर यांनी सर्वांचे स्वागत व पूजन केले.

                 पंचवटीतील सरदार चौकाजवळ श्री श्रुंगेरी शंकराचार्य मठात साडेतीनशे वर्षांपासून जगद्गुरू शंकराचार्य दक्षिणाम्नाय श्रुंगेरी शारदा पिठाधीश्वर यांच्या पवित्र परंपरेतील दोन महासमाधी आहेत. आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार मठांची स्थापना केली. त्याच परंपरेतील नाशिक येथील मठाची स्थापना पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात श्रुंगेरी शारदा पिठाधीश्वर २७ वे श्री शंकराचार्य सच्चिदानंद भारती महास्वामी ( दुसरे ) यांच्या हस्ते इ. स. १७४० मध्ये झाली. २८ वे  शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती व २९ वे शंकराचार्य नृसिंह भारती यांनी येथील मठात वास्तव्य केले. त्यांच्या महासमाधी येथे आहेत. त्यांचे पूजन करण्यात आले.
            यावेळी महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे सुमारे ५० वेदविद्यार्थी उपस्थित होते त्यांनी पौरोहित्यात सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येने विविध दक्षिणात्य राज्यातील नाशिकला स्थायिक झालेले भाविक उपस्थित होते. दुपारी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.            
             पंचवटीतील वात्सल्य वृद्धाश्रमात भोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बलराम अय्यर,शेखरमामा अय्यर, राजीमामी आदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !