चौकीदार ते पद्मश्री - नामदेव कांबळेंचा प्रवास !२ जुलै रोजी प्रकाशक रेषा शिक्षण संस्थेच्या शिक्षण महर्षी डॉ. बाबा नंदनपवार यांच्या "सुंदर माझे घर" पुस्तकाचे प्रकाशनानिमित्ताने पद्मश्री नामदेव कांबळे नासिकला येत आहेत, त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी घेतलेला थोडक्यात धांडोळा !!
चौकीदार ते पद्मश्री - नामदेव कांबळेंचा प्रवास !
२ जुलै रोजी प्रकाशक रेषा शिक्षण संस्थेच्या शिक्षण महर्षी डॉ. बाबा नंदनपवार यांच्या "सुंदर माझे घर" पुस्तकाचे प्रकाशनानिमित्ताने पद्मश्री नामदेव कांबळे नासिकला येत आहेत, त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी घेतलेला थोडक्यात धांडोळा !!
१९९५ ला "राघव वेळ" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि नामदेव कांबळे या लेखकाचा परिचय सर्व दूर झाला. तत्पूर्वी त्यांनी "अस्पर्श" नावाची कादंबरी लिहून प्रसिद्ध केली होती. या कादंबरीवर चर्चा झाली होती. समीक्षकांनी केलेल्या टीकेचा आणि सूचनांचा विचार करून राघव वेळ या स्त्रीप्रधान कादंबरीचे लेखन नामदेव कांबळे यांनी केले. या कादंबरीला मराठीतील साहित्य अकादमीबरोबर ह. ना. आपटे, बा.सी मर्ढेकर, ग.त्रं. माडखोलकर यांच्या नावाचे साहित्य पुरस्कार प्राप्त झाले होते. 'राघव वेळ' ही स्त्रीप्रधान कादंबरी नाही रे वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या कादंबरीची नायिका विधवा आहे. तिचा संघर्ष कादंबरीत नामदेव कांबळे यांनी मांडला. देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने ही कादंबरी प्रसिद्ध केली होती. त्यातून नाही रे वर्गाच्या व्यथा वेदना याची मांडणी लेखकाने केली आहे.
नामदेव कांबळे यांची वाटचाल 'चौकीदार ते शिक्षक' अशी झाली. या शेतमजुराच्या मुलाला पुढील काळात पद्मश्री हा भारत सरकारचा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला. पुरस्कारानंतरही त्यांचे लेखन चालू राहिले.
शिक्षणाचा अभाव असणाऱ्या कुटुंबात नामदेव कांबळे यांचा जन्म झाला. ते शाळेत हुशार होते. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे त्यांनी मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेतले आणि मॅट्रिक नंतर त्यांचा शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलला प्रवेश घेतला. मात्र अनेक अभावांचा सामना त्यांना करावा लागला. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण न होऊ शकल्याने या तरुण मुलाने गावाकडे येऊन शाळेत चौकीदाराची नोकरी स्वीकारली आणि आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. त्यातूनच त्यांनी आपल्या शिक्षणाच्या नव्या वाटेने प्रवास सुरू केला. बी.ए. बी एड पदवी संपादन करून ते त्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागले.
मातंग समाजाचे चित्रण करणाऱ्या या कादंबरीत नायिका वालंबी हिचा संघर्ष लेखकाने मांडला आहे. समाजाचित्रण म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रीचा जीवन संघर्ष मांडणारी स्त्रीप्रधान कादंबरी म्हणूनही ती महत्त्वाची आहे. सामान्य स्त्री नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहते तर अनुसूचित जाती जमाती मधील स्त्री नवऱ्यासोबत काम करून संसाराला आकार देत असते. या अर्थाने ती अधिक स्वयंपूर्ण असते असे आपल्याला दिसून येते. माणसाला भुकेचा प्रश्न वेगवेगळ्या जीवन संघर्षात अनुभवायला येतो. भूक ही नैसर्गिक असते. ती पोटाची असते आणि तशीच शरीराची ही असते. शरीराची भूक भागवण्यासाठी नैतिकतेची बंधने समोर असतात. विधवा स्त्रीच्या बाबतीत ती अधिक तीव्र असतात. या बंधनाचा सामना करत करत बाई आपला संसार उभा करत असते असे विचार सूत्र नामदेव कांबळे यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे.
पद्मश्री नामदेव कांबळे यांचा लेखन प्रवास कवितेपासून सुरू झाला. पुढील काळात त्यांनी कथाही लिहिल्या. कथा हा तोकडा वांङमय प्रकार आहे असे नेमाडे गुरुजी यांनी म्हटले आहे. नामदेव कांबळे यांनी जीवनाचा प्रदीर्घ पट मांडण्यासाठी कादंबरी लिहिली. त्यांच्या आठ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ऊन सावली, कृष्णार्पण, झाकोळ, मोराचे पाय, सांज रंग, सेल झाडा या त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी दादासाहेब हावरे यांचे चरित्र लिहिले आहे. तरी त्यांची साहित्यात मुख्य ओळख कादंबरीकार अशीच आहे.
'राघव वेळ' या कादंबरीला त्यावेळी 'आहे मनोहर तरी' आणि 'एका मुंगीचे महाभारत' अशा साहित्यकृतींच्या बरोबर स्पर्धा करावी लागली. अखेर साहित्य अकादमीने राघव वेळची निवड केली आणि नाही रे वर्गाचा एक लेखक पुढील काळात लेखकराव झाला. नामदेव कांबळे यांनी आपल्या एका मुलाखतीत "मी दु:खाचे विरेचन करण्यासाठी लेखन करतो" असे आपल्या लेखनाचे प्रयोजन स्पष्ट केले होते. मातंग समाजाचे चित्रण करण्यासाठी त्यांनी जसे लिहिले तसेच बलुतेदार जातीतील अन्य नायकही आपल्या साहित्यात अधोरेखित केले. प्रमाण भाषेबरोबरच वैदर्भीय बोलीचा ते संवादासाठी उपयोग करतात. मराठीतील बोलीने मराठी भाषा समृद्ध झाली आहे. बोली या मराठीच्या अलंकार आहेत, असे त्यांचे मत आहे. गेली चार दशके लिहिणाऱ्या या लेखकाने आपली छाप मराठी साहित्यात निर्माण केली आहे. ते नाशिकमध्ये येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट मांडला आहे.
__प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा