फुलावीत स्फुल्लिंगे ही, ऐकता तुकोबाची वाणी !सौ. भारती सावंत रचित आषाडी स्पेशल, तळमळ संतांची
फुलावीत स्फुल्लिंगे ही, ऐकता तुकोबाची वाणी !
सौ. भारती सावंत रचित आषाडी स्पेशल,
मागते मागणे विठूराया
द्यावा ज्ञानेशाचा ध्यास !
बहूजन समाजाकरिता
फुलावा अंतरीचा श्वास !!
फुलावीत स्फुल्लिंगे ही
ऐकता तुकोबाची वाणी !
विठूच्या भेटीसाठी मी
करावी अल्लड मनमानी !!
एकनाथांची ती गवळण
माझ्या तनामनात ठसावी !
रसाळ ओवी ज्ञानेशाची
आमच्या हृदयात वसावी !!
लागावे अभंग कीर्तनाचे
मला नामदेवावाणी वेड !
शिकवण मिळेल संतांची
कशी करावी विठू फेड !!
मनाचे श्लोक नि समास
पक्केच व्हावेत हृदयात !
रामदासांच्या निरुपणाचे
रहावे स्मरण तह हयात !!
मुक्ताबाईंचे अभंग भजन
गुणगुणावे माझ्या ओठात !
कष्ट जनाबाईंचे कांडताना
भरावे अन्नासह मी पोटात !!
सोयरा आणि निर्मलाबाई
नांदाव्या सुखात चोखाघरी !
विठूरायाच्या भेटीसाठीची
असावी कृपाच त्यांच्यावरी !!
कान्होपात्रा मंगळवेढ्यात
व्हावी विठूभक्तीने पवित्र !
रहावी शिळा होऊन पंढरी
बदलावे घराघरातील चित्र !?
-सौ.भारती सावंत
खारघर, नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा