आषाढी स्पेशल (२०), वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा...वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा...वारी म्हणजे आनंदाचा सोहळा...दिलीप देशपांडे यांच्या "अवघे गरजे पंढरपूर" मधून सर्वांना विठूरायाचे मनोमन दर्शन घडावे !

आषाढी स्पेशल (२०), वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा...
वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा...
वारी म्हणजे आनंदाचा सोहळा...
दिलीप देशपांडे यांच्या "अवघे गरजे पंढरपूर" मधून सर्वांना विठूरायाचे मनोमन दर्शन घडावे !

■ अवघे गरजे पंढरपूर.....||


जे विठ्ठलाचे भक्त असती
ते येवोनी एक होती
गावोनी भगवत् भक्ती
विठ्ठलाचे नाम घेत
उत्तम मार्गी चालती....
              "वारी"
म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांमधून निघून पंढरपूर येथे येणारी सामुदायिक विठ्ठल भक्तांची पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. 
वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा...
वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा...
वारी म्हणजे आनंदाचा सोहळा...

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.
शेतकरी, कष्टकरी, महिला, असा सगळ्यांचा सहभाग वारीत असतो. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, निवृत्त जेष्ठ, यांचाही सहभाग दिसून येतो. 
वारकरी संप्रदायात लहान मोठा, गरिब-श्रीमंत, पुरुष-महिला हा भेदाभेद नाही.


एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. नमस्कार करतात. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरी नगरीचा स्पर्श , चंद्रभागेतस्नान, आणि  विठोबाचे,पांडुरंगाचे  दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. ती त्यांचेसाठी आनंदवारीच असते. त्यांचे मागणे एकच असते..
हेची दान देगा देवा...
तुझा विसर न व्हावा ...तुझा विसर न व्हावा...

 वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे सारेच भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
 सात्त्विक आहार, सदाचारण, करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.
साधारणपणे पेरणीनंतर वारी सुरू होते, वारी परतून येईपर्यंत शेतात पिके वाढलेली असतात. पांडुरंगाचे दर्शनाने एक प्रकारची ऊर्जा मिळते. असा आनंद पुढील वारी पर्यंत वारकरी टिकवतो.
        वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम" "पंढरीनाथ महाराज की जय!" असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ भगवान की जय" असा वेगळेपणा आढळतो. अनेक ठिकाणी "माऊली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरु तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.
वारीत अभंग, ओव्या, भारुड, हरीपाठ, ज्ञानेश्वरी, हे सगळं येत. जो तो आपल्याच नादात असतो.
वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात.. जादा बसेसही सोडण्यात येतात. मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते.


पंढरपूरला जात असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून स्वेच्छेने घेतली जाते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, रेनकोट देणे अशी सेवा केली जाते. सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारकऱ्यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.
           महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्रंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईची पालखी पंढरपूरला येते. सोपानदेवांची पालखी सासवड येथून येते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
         आषाढ महिन्यातील (जून-जुलै) शुक्ल/शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी / महा एकादशी / देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चातुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. 
        ह्या काळात जमेल ते जमेल तेवढे चातुर्मासात नियम करतात (जप, पोथीवाचन, आदी)
           पंढरपुराला उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेवाची पायरी’ म्हणतात.
विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार वाहतात.
 तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते. तर वारकरी स्वतः तुळशीच्या वाळलेल्या काड्या जाळून त्यात, कापूर, चांगले तुपा पासून बनवलेला बुक्का लावतो. ह्या बुक्क्याला फार महत्व आहे. बुक्का, तुळशीची माळ हे आवश्यक आहे. अर्थातच हे विठ्ठलाचे, पांडुरंगाचे भक्तिचे प्रतिकच आहे.
             वारीच्या दरम्यान होणारे "रिंगण" हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.
"धावा" म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
         आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते. लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक असतात..पंढरपुरनगरी दुमदुमून जाते.
      अशोकजी परांजपे यांनी लिहिलेला अभंग आहे...
अवघे गरजे पंढरपूर
चालला नामाचा गजर...
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर ...अवघे....
इडापीडा टळुनी जाती
देहाला या लाभेल मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर ...अवघे....
देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर...अवघे....

खरोखरच हा अभंग ऐकतांना, नकळतच आपण पंढरीच्या वारीत सामील होतो, आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा.
प्रत्येक भक्ताला, वारक-याला आषाढी एकादशी ला पांडुरंगाचे दर्शन होणारच. कारण तो प्रत्येकाचे मनामनात आहे. भाव तिथे देव. ...आपण त्याचे नामात तल्लीन होऊ या...आणि दर्शन घेवू या.
विठ्ठल..विठ्ठल..जय हरि विठ्ठल ...

            ◆-दिलीप देशपांडे,
                    जामनेर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !