विठूरायाच्या भक्तिगीतांनी अभंगवाणी मैफल रंगली !

विठूरायाच्या भक्तिगीतांनी अभंगवाणी मैफल रंगली !

       नाशिक ( प्रतिनिधी )-  पावसाची प्रतीक्षा करीत असतांना कालिदास कलामंदिरात स्वरांची बरसात झाली. रसिक श्रोते त्यात न्हाऊन चिंब झाले. जय जय राम कृष्ण हरी या गजराने मैफलीचा प्रारंभ झाला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा..., नामाचा गजर गर्जे भीमातीर..., तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल... अश्या आनंद भाटे यांनी गायलेल्या अनेक अभंगात श्रोते तल्लीन झाले.

   आषाढी एकादशी आणि अभंगांची सुरेल मैफल हे समीकरण पक्के झाले आहे. महाराष्ट्राला थोर संतांची दीर्घ परंपरा लाभलेली असून त्यांनी असंख्य रसाळ अभंग रचले आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने निवडक अश्या लोकप्रिय भक्तीसंगीताची मैफल काल रविवारी ( दि. २५) आयोजित करण्यात आली. लोकप्रिय गायक आनंदगंधर्व आनंद भाटे यांची अभंगवाणी सायंकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात उत्तरोत्तर रंगत गेली. जणुकाही आपण चंद्रभागेच्या तीरावर पंढरीत आहोत अशीच अनुभूती श्रोत्यांना मिळाली.
सरगम थिएटरच्या नंदकुमार देशपांडे यांची निर्मिती असलेल्या व साची एंटरटेनमेंट प्रस्तुत ' अभंगवाणी ' मैफलीत आनंद भाटे आपल्या प्रासादिक स्वरात अभंग सादर केले. त्यांना बालपणीच आनंदगंधर्व पदवीने गौरविण्यात आले असून आजच्या आघाडीच्या गायकांमध्ये त्यांचा अग्रक्रम लागतो. 
         वारकरी संप्रदायाच्या संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, गोरोबा, चोखोबा, जनाबाई, कान्होपात्रा आदी संतांनी विपुल अभंग लेखन केले. त्यातील निवडक सुरेल लोकप्रिय अभंग श्रोत्यांना अनुभवता आले. या मैफलीला नाशिकचे नितीन वारे  तबल्यावर तर सुभाष दसक्कर संवादिनीवर साथसंगत केली. तानपुरा आणि स्वरसाथ डॉ.आशिष रानडे व अथर्व भगरे यांनी तर तालवाद्य साथ अमित भालेराव व पखवाजाची दमदार साथ दिगंबर सोनवणे यांनी करून मैफलीची रंगत वाढवली. सुप्रिया देवघरे व शिल्पा फासे यांनी रसाळ सूत्रसंचालन केले. नाशिककरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून अभंगवाणीचा लाभ घेतला. संयोजक नंदकुमार देशपांडे व आनंद जाधव यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !