दिव्यांग साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांगांचा सहभाग ! ९३ पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय !
दिव्यांग साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांगांचा सहभाग !
९३ पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय !
नाशिक : समाज कल्याण विभाग व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक व रत्नानिधी चेरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींकरिता साधन सहाय निदान शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देवून दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधला, यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या नंदिनी मॅडम, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कविता जूनेजा उपस्थित होत्या.
या शिबिरामध्ये पायांनी दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी जयपूर फूट (कृत्रिम पाय ) पोलियो ग्रस्तांसाठी कॅलीपर्स किंवा क्रचेस (कुबडी), कोपऱ्याच्या खाली हात नसलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम हाथ बसवण्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली.
दिव्यांग साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला यामध्ये ९३ पात्र लाभार्थ्यांना साधन सहाय वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ३ ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून उद्या २० जून रोजी सामान्य रुग्णालय कळवण तर २१ जून रोजी मालेगाव येथे ११ ते ४ वाजेपर्यंत दिव्यांग व्यक्तींकरिता साधन सहाय निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, शिबिरात सहभागी होण्यासाठी 87670 47438 भ्रमणध्वनी क्रमांकावर देखील नाव नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा