संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची यात्रेदरम्यान दररोज ताज्या सुवासिक फुलांची सजावट ! Santshreshta Nivrutti Maharaj Palakhi Ceremony, Trimbakeshwar to Pandharpur
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची यात्रेदरम्यान दररोज ताज्या सुवासिक फुलांची सजावट !
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801
माडसांगवी (बिडवे)::- आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाची दररोज ताज्या सुवासिक आणि निरनिराळ्या जातीच्या फुलांनी सजावट करण्याची परंपरा असून आज दि.१८ रोजी घोगरगाव जि. अहमदगर येथे माडसांगवीच्या मित्र मंडळाने अतिशय सुबक सजावट केली.
माडसांगवी येथील वैकुंठवासी शिवाजी महाराज पेखळे यांच्या प्रेरणेने ही रथ सजावट परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून निरनिराळ्या गावातील मित्रमंडळी, सामाजिक संस्था, वारकरी आणि गावकरी तरुण यांच्या माध्यमातून रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी भल्या पहाटेच दररोज रथ सजावटीसाठी लगबग सुरू होते. उत्साहाने निरनिराळ्या डिझाईन आणि हार, फुले, तोरणे, बुके यांच्या माध्यमातून रथ सजावट केली जाते. सुवासिक आणि आकर्षक फुलांनी रथासह नाथ महाराजांच्या पालखीची ही सजावट पहाटे पाच ते सात या वेळेत पूर्ण करून रथ सजावटकार मंडळींच्या माध्यमातून पालखी रथात ठेवली जाते. सजावटकार मंडळींना यावेळी मानाचा नारळ देऊन सन्मान केला जातो. रथ सजावटीसाठी एक ते दोन दिवस अगोदर उत्तम प्रकारच्या फुलांची खरेदी करून रथाच्या मापाच्या तोरणांची बांधणी करावी लागते. निरनिराळ्या प्रकारात फुलांचे हार तयार केले जातात. रथ सजावटीचा साधारण शिरस्ता डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकारे फुले गुंफली जातात. एक दिवसाच्या सजावटीसाठी साधारण २० ते २५ हजार रुपयांची फुले लागतात. हा सर्व खर्च रथ सजावटकार मंडळी करतात.
वैकुंठवासी शिवाजी पेखळे यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले असले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा त्यांनी जबाबदारी सोपवलेली मित्रमंडळी, सामाजिक संस्था, गावकरी, तरुण आजही मोठ्या उत्साहात पार पाडत आहेत .
रथाच्या प्रस्तानापूर्वीच रथ सजावटीचे नियोजन करण्यात येत असते, श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारीच्या रिंगण सोहळ्यापर्यंत मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत साधारण २९ ते ३० ठिकाणी रथ सजावट केली जाते. यावर्षी परतीच्या मार्गावर देखील रथ सजावटीचे नियोजन काही मंडळांकडून करण्यात आले आहे. माडसांगवी मित्र मंडळाचे रथ सजावटीचे हे १८ वे वर्ष असून त्या कामी संजय तांबे, ज्ञानेश्वर गायखे, दशरथ पेखळे, शिवाजी गायखे, ज्ञानेश्वर दाते, आदी नियोजन करतात .
रथ सजावटीसाठी सुभाष काठे, राजू महाले, अरुण बिडवे( पत्रकार ), सुरेश आहेर, रमेश वाघ, वासु सोनवणे, पांडुरंग बनकर, गोकुळ पेखळे, कैलास माळी, पप्पू घुमरे, सतिश मंडलिक, प्रदिप चव्हाण, चंदन वाघ, किशोर फड, तन्मय गावंड यांचे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते तन मन धनाने सहभागी होऊन रथ सजावट आणि पंढरीच्या वारीचा आनंद लुटतात .
*************************************
आषाढी वारीसाठी रथ सजावट म्हणजे आमच्यासाठी आनंदवारी असून आम्ही मित्रमंडळी अगोदरच दैनंदिन कामाचे नियोजन करून रथासाठी आवश्यक असणारे फुले आणि इतर साहित्य घेऊन आदल्या रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. पहाटे पाच वाजता रथाची सजावट सुरू होते. सात वाजेपर्यंत सजावट पूर्ण करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची फुलांनी सजवलेली पालखी रथात ठेवून पुढील प्रवासासाठी रथ मार्गस्थ होतो.
सुभाष काठे
रथ सजावट कार मित्र मंडळ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा