डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणारी भारत गौरव पर्यटक रेल्वे काल नवी दिल्ली येथून रवाना !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणारी भारत गौरव पर्यटक रेल्वे काल नवी दिल्ली येथून रवाना !
देशांतर्गत पर्यटन आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना देणे हे या रेल्वेचे उद्दिष्ट : जी.के. रेड्डी
तळागाळातील माणसाला सक्षम बनवण्यासाठी आणि जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबासाहेबांचा जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. : डॉ वीरेंद्र कुमार
दिल्ली (१४) ::- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणाऱ्या भारत गौरव पर्यटक रेल्वे यात्रेला आज हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्येकडील राज्ये विकास विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी आणि सामाजिक न्याय तसेच अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची झलक सर्व प्रवाशांना दाखवणे हा भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा उद्देश आहे, असे जी.के.रेड्डी यावेळी बोलताना म्हणाले.
देशांतर्गत पर्यटन आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना देणे हा देखील या रेल्वेचा उद्देश असल्याचे रेड्डी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत स्थळे केवळ भारतातच नव्हे तर लंडनमध्येही विकसित केली आहेत, अशी माहितीही रेड्डी यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या जगात प्रसार करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.
भारत गौरव ट्रेन हे 'देखो अपना देश' उपक्रमा अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचा प्रचार करण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे, असे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार याप्रसंगी म्हणाले.
बाबासाहेबांनी आपल्या जीवनात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातल्या सर्वात शेवटच्या माणसाला सक्षम बनवण्याचा आणि जातीवर आधारित भेदभाव दूर करण्याचा त्यांचा जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
बाबासाहेबांनी समता आणि बंधुतेसाठी आयुष्यभर काम केले आहे. ही रेल्वे त्या समतेची प्रतिनिधी आहे आणि प्रवास करणारे प्रवासी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांबद्दलच्या अनेक आठवणी आणि ज्ञान घेऊन परत येतील.
पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने आयआरसीटीसी १४ एप्रिल २०२४ पासून आंबेडकर सर्किटवर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकापासून ०७ रात्री आणि ०८ दिवसांची पहिली विशेष सहल चालवत आहे.या सहलीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित नवी दिल्ली, महू, नागपूर सारख्या प्रमुख स्थळांच्या तर सांची, सारनाथ, गया, राजगीर आणि नालंदा या पवित्र बौद्ध स्थळांच्या भेटींचा समावेश असेल.
नवी दिल्ली येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देणे हे या दौऱ्याचे प्रमुख आकर्षण असेल. पर्यटकांना ताजे शाकाहारी जेवण मिळावे यासाठी सुसज्ज पॅन्ट्री कार ट्रेनला जोडण्यात आली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा रक्षक सेवा यासारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील. देशांतर्गत पर्यटनात विशेष रूची असलेल्या सर्किट्सला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या “देखो अपना देश” या उपक्रमा अंतर्गत भारत गौरव पर्यटक रेल्वे सुरु करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा