षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम !

    षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

            नुकतेच लोकप्रिय माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन झाले. साठच्या दशकातील ते डॅशिंग अष्टपैलू खेळाडू होते. १९६० साली इंग्लंडला आणि १९७१ मध्ये वेस्ट इंडिजला कसोटी सामन्यात पराभूत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तेव्हा मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले जात नव्हते. तथापि, सलीम दुर्रानी कसोटीतही धुवांधार फलंदाजी करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारण्यात ते माहीर होते. त्यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. त्यांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा ...      

                                                 षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम !
      
              दिलदार स्वभाव आणि क्रिकेटमधील कौशल्यामुळे ‘प्रिन्स सलीम’ या नावाने क्रिकेट वर्तुळात ओळखले  जाणारे  सलीम दुर्रानी यांचा जन्म अफगाणिस्तानमधील काबूल येथे ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला होता. दुर्रानी यांनी १९६० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९६० ते १९७३ या काळात भारतीय संघातून २९ कसोटी सामने खेळताना त्यांनी ७५ बळी घेतले तर १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १२०२ धावा काढल्या. दुर्रानी यांचे क्रिकेट करिअर फार मोठे नसले तरी त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. षटकार मारण्यावर हुकूमत असलेले सलीम मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार मारीत असत. भारतीय संघाकडून खेळलेल्या ज्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीची चर्चा होते त्यामध्ये सलीम दुर्रानी यांचा देखील समावेश होतो. १९६०च्या दशकात दुर्रानी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.


             १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक (२-०) मालिका विजयात सलीम दुर्रानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावताना या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भरपूर विकेट्स घेतल्या. कोलकाता आणि मद्रासमध्ये भारताने ज्या दोन कसोटी जिंकल्या त्यापैकी कोलकाता कसोटीत त्यांनी आठ आणि मद्रास कसोटीत १० बळी घेतले होते. याशिवाय १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या ऐतिहासिक पोर्ट ऑफ स्पेन सामन्यातही त्यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात त्यांनी तत्कालीन महान फलंदाज क्लाइव्ह लॉईड आणि सर गारफिल्ड सोबर्स यांना बाद केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सलीम यांनी परवीन बाबी यांच्या बरोबर ‘चरित्र’ या चित्रपटात नायकाची भूमिका केली. या महान क्रिकेटपटूला भावपूर्ण श्रद्धांजली.           
               -प्रा. विजय कोष्टी, 
         कवठे महांकाळ (सांगली).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल