तरुणांनी `नोकरी देणारे' उद्योजक व्हावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून तरुणांनी `नोकरी देणारे' उद्योजक व्हावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
मुंबई( दि. २२)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या कौशल्य विकास योजना व स्टार्ट अप योजना ( startup ) यांचा समन्वय साधून नवउद्योजक तरुणांना रोजगारनिर्मीतीची संधी उपलब्ध केली आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणांनी नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे नवउद्योजक होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथे अॅचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद यांच्या वतीने स्टार्टअप, इनक्यूबेशन आणि एंटरप्रेनरशिप या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बोलताना पाटील यांनी हे आवाहन केले. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, डॉ. महेश भिवंडीकर, प्राचार्य अविनाश पाटील, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. बी. तायवडे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. टी. ए. शिवारे, आदी या वेळी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २०१५ रोजी देशात स्टार्ट अप योजनेची सुरुवात झाली, त्याच्या एक महिना आधी पंतप्रधान कौशल्य विकास योजना सुरू झाली होती. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. गेल्या आठ वर्षांच्या काळात अनेक तरुणांनी स्टार्ट अप योजनेतून हजारो रोजगार निर्माण केले असे ते म्हणाले. आपल्या भागातील गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराची संधी मिळत असते, नवतरुणांनी स्टार्ट अप च्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी असे पाटील यांनी सांगितले.
अॅचिव्हर्स महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेने एकत्र येऊन घेतलेल्या या परिषदेबद्दल पाटील यांनी आयोजकांचे कौतुक करत या उपक्रमांमधून भविष्यात अनेक तरुण मुले उद्योजक होतील, असा विश्वास व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा