दर सेकंदाला एक नळजोडणी देत 'सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात पाणी' हे शाश्वत विकास लक्ष्य भारत वेळेआधीच पूर्ण करेल !
दर सेकंदाला एक नळजोडणी देत 'सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात पाणी' हे शाश्वत विकास लक्ष्य भारत वेळेआधीच पूर्ण करेल !
जल जीवन मिशनने ६०% व्याप्तीचा गाठला टप्पा !
११.६६ कोटी कुटुंबे आणि ५८ कोटी लोकांना घरातील नळांद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी आता उपलब्ध !
नवी दिल्ली(४ एप्रिल)::-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज ६०% ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. भारतातील १.५५ लाखाहून अधिक गावांमध्ये, (एकूण गावांच्या २५%) आत्तापर्यंत ‘हर घर जल’ अंतर्गत नोंद झाली आहे. या गावांतील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घराच्या आवारात नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षात जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत जल जीवन मिशन अंतर्गत दर सेकंदाला एक नळजोडणी देण्यात आली आहे. यात २०२३ च्या पहिल्या तीन महिन्यांत दररोज सरासरी ८६८९४ नवीन नळजोडण्या देण्यात आल्या आहेत ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी जल जीवन मिशनची घोषणा केली होती. सर्व ग्रामीण कुटुंबांना पुरेशा दाबाने, विहित गुणवत्तेचे (55 lpcd) पाणी नियमित आणि दीर्घकालीन आधारावर उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 'हर घर जल' च्या प्रवासात देशाने, आज ४ एप्रिल २०२३ रोजी आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला. ११.६६ कोटी (६०%) ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा करण्यात आला. गुजरात, तेलंगणा, गोवा, हरियाणा आणि पंजाब या ५ राज्यांनी आणि अंदमान आणि निकोबार बेटे, दमण दीव आणि दादरा नगर हवेली आणि पुद्दुचेरी या ३ केंद्रशासित प्रदेशांनी योजनेची १००% व्याप्ती गाठली आहे. सर्व ग्रामीण कुटुंबांना नळांद्वारे पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने देश सातत्याने प्रगती करत आहे.
जल जीवन मिशन हा केवळ पायाभूत सुविधांचा विकास कार्यक्रम नाही. यात पुरेसे प्रमाण, सुरक्षितता आणि पाणीपुरवठ्याची नियमितता या दृष्टीने सेवा देण्यावर भर आहे. जेजेएमच्या अंमलबजावणीचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. केवळ ३ वर्षात, ४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या ८.४२ कोटी ग्रामीण कुटुंबांना (@४.९५ व्यक्ती प्रति ग्रामीण कुटुंब, स्रोत आयएमआयएस) या कार्यक्रमांतर्गत लाभ मिळाला आहे. हे अमेरीकेच्या लोकसंख्येपेक्षा (३३.१ कोटी) जास्त आहे, ब्राझील (२१ कोटी) आणि नायजेरियाच्या (२० कोटी) लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट तर मेक्सिको (१२.८ कोटी) आणि जपानच्या (१२.६ कोटी) लोकसंख्येच्या तिप्पट आहे.
मुलांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनावर लक्ष केंद्रित करून, सर्व ग्रामीण शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि आश्रमशाळांमध्ये (आदिवासी निवासी शाळा) पिण्यासाठी, माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी, हात धुणे आणि शौचालयात वापरण्यासाठी नळजोडणी देण्याकरता विशेष प्रयत्न केले गेले आहेत. आजपर्यंत, ९.०३ लाख (८८.२६%) शाळा आणि ९.३६ लाख (८३.७१%) अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
सुरक्षित पाणी पुरवठा” हा जेजेएम अंतर्गत महत्त्वाच्या तत्वांपैकी एक आहे.
जलपरिक्षण करण्यासाठी २०७८ प्रयोगशाळा उभारल्या आहेत. त्यापैकी ११२२ प्रयोगशाळा एनएबीएल मान्यताप्राप्त आहेत. पाण्याच्या गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, फील्ड टेस्ट किट्स (एफटीके) वापरून पाणी नमुने तपासण्यासाठी ग्रामीण भागात २१ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकट्या २०२२-२३ मध्ये, एफटीके मार्फत १.०३ कोटी तर प्रयोगशाळांमध्ये ६१ लाख पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. मिशनद्वारे ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. २०२२-२३ या वर्षात ५.३३ लाख गावांमध्ये रासायनिक आणि ४.२८ लाख गावांमध्ये जैविक दूषितते संदर्भात (पावसाळ्यानंतर) पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात आली.
लोकांच्या सक्रीय सहभागाने विशेषतः महिला आणि ग्रामीण समुदायांच्या एकत्र काम करण्यामुळे जल जीवन मिशन खऱ्या अर्थाने लोकचळवळ (जनआंदोलन) बनली आहे. दीर्घकालीन पेयजल सुरक्षेसाठी स्थानिक समुदाय आणि ग्रामपंचायती पुढाकार घेत आहेत आणि गावाच्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थापनाची, त्यांच्या जल संसाधनांची आणि सांडपाण्याच्या स्वरुपातील पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारत आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेश ग्राम जल आणि स्वच्छता समित्या(VWSC) स्थापन करण्यासाठी, समुदायांच्या एकजुटीसाठी, ग्राम कृती आराखडा तयार करण्यात पाठबळ देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीनंतर कामे हाती घेण्यासाठी अंमलबजावणी पाठबळ संस्थांना(ISAs) हाताशी धरून पंचायतींना पाठबळ देत आहेत. १४ हजारांपेक्षा जास्त आयएसएना ही जबाबदारी देण्यात आली असून या क्षेत्रात त्या सक्रिय पद्धतीने काम करत आहेत.
जलजीवन मिशनचा समाजावर विविध प्रकारे प्रभाव पडत आहे. नळाला नियमित पाणीपुरवठा झाल्यामुळे महिला आणि तरुण मुलींना रोजच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी डोक्यावरून जड हंडे आणि पाणी वाहून आणण्याच्या त्रासापासून दिलासा मिळतो. दुसरीकडे पाणी भरण्यामध्ये वाया जाणारा वेळ वाचल्यामुळे महिलांना या वेळेचा वापर आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध प्रकारची नवी कौशल्ये शिकण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष देण्यासाठी करता येऊ शकतो. किशोरवयीन मुलींना आता पाणी भरण्यामध्ये आपल्या मातांना मदत करण्यासाठी शाळा चुकवण्याची गरज राहणार नाही.
नोबेल पारितोषिक विजेत डॉ. मायकेल क्रेमर आणि त्यांच्या चमूने केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला आहे की जर कुटुंबांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध केले तर अर्भक मृत्यूचे प्रमाण ३०% नी कमी होऊ शकेल. नवजात शिशूंना पाण्याशी संबंधित आजारांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमध्ये ( पाच वर्षांखालील वार्षिक १.३६ लाख) प्रत्येक चार मृत्यूंमध्ये एक असे हे प्रमाण आहे आणि भारतामध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी पुरवून ते टाळता येऊ शकेल.
जेजेएम ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारसंधी देखील निर्माण करत आहे. आयआयएम बंगळुरूच्या प्राथमिक सर्वेक्षणाने असे मूल्यांकन केले आहे की जेजेएमच्या अंमलबजावणीच्या पाच वर्षांच्या काळात १,४७,५५,९८० मनुष्य वर्षांचा रोजगार निर्माण होऊ शकतो. याचा सविस्तर विचार केल्यास या मिशनच्या उभारणीच्या संपूर्ण वर्षात प्रत्येक वर्षी सरासरी २९,५१,१९६ लोकांना रोजगार मिळू शकतो. पाईपद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा प्रणालीचे परिचालन आणि देखभाल यासाठी दरवर्षी सुमारे १०.९२ लाख लोकांना रोजगार देण्याचे काम देखील हे मिशन करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा