अक्षय तृतीयेचा सकारात्मक संदेश !शुभमुहूर्ताचा दिवस व पुजेची वेळ खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या !!
अक्षय तृतीयेचा सकारात्मक संदेश !
शुभमुहूर्ताचा दिवस व पुजेची वेळ खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या !!
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला (तिसरा चंद्रदिवस) साजरा केला जाणारा अक्षय तृतीया हा हिंदू सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीयेला अखाजी असेही म्हणतात. ‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही. या दिवशी केले जाणारे कोणतेही कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न समाप्त होणारे फळ देते म्हणूनच या तिथीला जेवढे पुण्य कार्य व दान धर्म केले जाते त्याचे शुभ फळ निश्चितच मिळते.
अक्षय तृतीया विवाहासाठी शुभ दिवस मानला जातो. ह्या दिवशी विवाह केल्याने विवाहित जोड्याचे बंधन कायम टिकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती तर देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी झाला होता, असे मानतात. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान दिले जाते. दक्षिण भारतात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचे देवता बनवले होते. म्हणून या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते. महाभारतामध्ये देखील अक्षय तृतीयेचा उल्लेख सापडतो. महर्षी वेद व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तर युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र वरदान म्हणून मिळाले. वनवासा दरम्यान जोवर द्रौपदीचे भोजन होत नाही तोवर या अक्षय पात्रातील अन्न संपत नसे. एका कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती. भविष्यपुराण नुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगचा आरंभ झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान-लहान गोष्टी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. म्हणून अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ दिवस असतो. विद्वान पंडित आणि धर्माचे ज्ञान असणाऱ्यांच्या मते या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. साडे तीन मुहूर्ता पैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त समजला जातो. तरीही या वर्षी अक्षय तृतीयेचा शुभ दिवस २२ एप्रिल ला असून पूजेचा मुहूर्त सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २० मिनिटे असा आहे.
प्रा. व्ही. व्ही. कोष्टी, शिपूर (सांगली)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा