संगत आणि पंगत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र, गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा :- ऑक्सफर्ड, हार्वर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे
संगत आणि पंगत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र, गर्दीच्या मानसिकतेतून बाहेर पडा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करा :- ऑक्सफर्ड, हार्वर्ड स्कॉलर डॉ. सुरज एंगडे यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
पुणे (दि.०४)::- जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असली पाहिजे, किंबहुना संगत आणि पंगत हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या विचारधारेशी संगत ठेवली पाहिजे तर विवेक विचारांच्या पंक्तीत बसले पाहिजे. जाती-धर्माच्या चक्रविहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करा असा कानमंत्र हार्वर्ड विद्यापीठातील स्कॉलर, "कास्ट मॅटर" या जग विख्यात पुस्तकाचे लेखक तसेच समाज कल्याण विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी जागतिक व्याख्याते डॉ. सुरज एंगडे यांनी दिला आहे.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत आज पुणे येथील शासकीय वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी डॉ. एंगडे यांनी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्तीवर भर दिला पाहिजे, कोणतेही कार्य किंवा शिक्षण यामध्ये संशोधनाची सांगड घालने अत्यंत महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला, कृति, विचार व प्रश्न विचारण्याची सवय या गोष्टींना देखील तितकेच प्राधान्य दिले पाहिजे असेही डॉ. एंगडे यांनी यावेळी सांगितले.
शिक्षणाबरोबरच नवीन संशोधन वृत्ती आत्मसात करा , तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करावे, स्वतःला घडवा व त्यातून इतरांना घडवा तरच कुटुंब व समाज घडेल व त्यातून विवेकवादी आदर्श निर्माण होतील असेही शेवटी बोलताना डॉ. एंगडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय पर्व अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा परिपूर्ण वापर करून त्यातून नवसमाज घडवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असा असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, सहायक आयुक्त निशादेवी बंडगर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, गृहपाल, कर्मचारी तसेच पुणे शहरातील सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा