आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !! --परीक्षण, उद्धव भयवाळबायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,,

आयुष्याची सेकंड इनिंग-ज्येष्ठांचा सखा !!
              --परीक्षण, उद्धव भयवाळ
बायको हाच खरा आधार, मनातले मांडे, म्हातारे अर्क, आरोग्याशी सामना, दिर्घायुष्य एक दृष्टिकोन अशा विषयांचा लेखसंग्रह प्रत्येकाच्या संग्रहासोबतच वाचनात यावा अशा या प्रा.रमेश कुलकर्णी लिखित "आयुष्याची सेकंड इनिंग" पुस्तकाचे नामवंत लेखक परिक्षक उद्धव भयवाळ यांनी केलेले परिक्षण,,,,,,,,,,,,
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
     छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष,  राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक आणि एक प्रथितयश लेखक प्रा. रमेश कुलकर्णी यांचा "आयुष्याची सेकंड इनिंग" हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. याआधी त्यांचा 'संवेदना' हा कवितासंग्रह आणि "कळत नकळत" हा कथासंग्रह, अशी दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 

           'आयुष्याची सेकंड इनिंग' या लेखसंग्रहामध्ये एकूण वीस लेख आहेत. हे वीसही लेख ज्येष्ठांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचे विविध पैलू दाखवणारे आहेत. सर्व लेख हे आयुष्याच्या उत्तरार्धातील अनुभवांचे, आठवणींचे आणि प्रसंगांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
             'चाहूल' या पहिल्याच लेखामध्ये बालपण, किशोरावस्था, तारुण्य, प्रौढावस्था आणि शेवटी येणारे म्हातारपण या स्थित्यंतरात मनुष्याच्या विचारांमध्ये कसा फरक पडत जातो याचे वर्णन करीत असतांनाच ज्येष्ठांनी आपल्या आहारविहारात काय पथ्ये पाळली पाहिजेत आणि उतारवयामध्ये काय सावधानता बाळगली पाहिजे यासंबंधी सुंदर विवेचन केले आहे. 'मनातले मांडे' या लेखामध्ये मनुष्य नोकरी व्यवसायात असतांना त्याचा दिनक्रम खूप व्यस्त असतो म्हणून निवृत्तीनंतर आपण हे करू, ते करू, पर्यटन करू, तीर्थयात्रा करू असे तो आधीच ठरवून ठेवतो. परंतु प्रत्यक्ष वार्धक्य आल्यावर हे सारे शक्य होईलच असे नसते. कारण प्रकृतीच्या तक्रारी हळूहळू सुरु होतात. आयुष्याच्या या वळणावर आपली मानसिकता बदललेली असते. आवडीनिवडीही बदलतात. यावेळी सर्वात जास्त लक्ष आपल्या स्वाथ्याकडे देणे भाग पडते. म्हणून निवृत्तीपूर्वी केलेले संकल्प तडीस जातीलच याची शाश्वती राहत नाही. म्हणून मनातले मांडे मनातच कसे राहतात याविषयी विस्ताराने सांगितले आहे.


          'आरोग्याशी सामना', 'म्हातारे अर्क', 'दीर्घायुष्य एक दृष्टीकोन', 'दुखणं – दवाखाने आणि डॉक्टर्स' या लेखांमध्ये अगदी साध्या साध्या दुखण्यांपासून ते गंभीर आजारापर्यंत परामर्श घेऊन साठीनंतर होणारे नवनवीन विकार आणि त्यासंबंधी काय काळजी घ्यावी याबद्दल विचार व्यक्त केलेले आहेत. 'बायको हाच खरा आधार' या लेखामध्ये पतीपत्नीची तारुण्यातील वाटचाल कशी भरकन निघून जाते आणि आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र पती पत्नी आरोग्याच्या आणि आहाराच्या बाबतीत एकमेकांची कशी  काळजी घेतात. एकमेकांना कसे जपतात. पत्नीने आयुष्यभर उपसलेल्या कष्टांची आणि अनेक समस्यांना तोंड देऊन आपला संसार नीटनेटका करण्यात लावलेल्या हातभाराची कशी जाणीव पुरुषास होऊ लागते; त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींसाठी आपण पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास कसे काय विसरलो याची रुखरुख लागून राहते. याविषयी सुरेख विवेचन केले आहे. 'अध्यात्माची ओढ' या लेखामध्ये आयुष्याच्या उत्तरार्धात स्त्री असो अगर पुरुष असो, अध्यात्माकडे आकर्षित होतात. जीवनातील जी विविध स्थित्यंतरे आहेत, त्यातील प्रत्येक वळणावर जे बदल होतात, त्यापैकीच हा एक बदल आहे, हे सविस्तरपणे समजावून सांगितले आहे.
         याव्यतिरिक्त, 'ज्येष्ठांचे आर्थिक गणित', 'आपण आणि आपले छंद', 'खंत- राहून गेलेल्या गोष्टींची', 'जगण्याचे प्रयोजन', 'जीवन एक उत्सव' या आणि इतर उर्वरित लेखांमध्ये जीवनाकडे सकारात्मकतेने कसे बघावे याचा वस्तुपाठच लेखकाने दिला आहे.
          एकूणच, हा लेखसंग्रह म्हणजे जेष्ठांचा सखा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
               प्रा. रमेश कुलकर्णी यांना त्यांच्या भावी लेखनकार्यास शुभेच्छा देतो आणि थांबतो. 

-पुस्तक परिचय-
आयुष्याची सेकंड इनिंग  
[प्रेरणादायी लेखसंग्रह]
लेखक – प्रा. रमेश कुलकर्णी     
प्रकाशक- सचिन कुलकर्णी,
सिडको एन- ८ 
छत्रपती संभाजीनगर ४३१००३    
पृष्ठे १६०,  किंमत २०० रुपये

उद्धव भयवाळ,
छत्रपती संभाजीनगर ४३१००९ 
मो: ८८८८९२५४८८

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे