श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहुन २९ मार्च रोजी अयोध्येकडे जाणार काष्ठ ! देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार ! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र !!
श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहुन २९ मार्च रोजी अयोध्येकडे जाणार काष्ठ !
देशातील सर्वोत्तम सागवान काष्ठ दिल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने मानले आभार !
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंदिर महासचिवांचे पत्र
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
मुंबई, दि.(२५)::- चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा होत असल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे.
निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंड मधील देहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. ना. मुनगंटीवार यांनी या विषयात व्यक्तीश: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरीता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सागवानचे हे काष्ठ दि.२९ मार्च २०२३ रोजी विधीवत पूजा करून आणि शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने ना. मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
लाकडावर करणार नक्षीकाम व कोरीवकाम !
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानचे हे काष्ठ ना. मुनगंटीवार यांनी आपल्या शुभहस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.
असा असेल काष्ठपूजन सोहोळा !
चंद्रपूर जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होता. अशा या चंद्रपूरमधून देशाच्या अभिमानाचे केंद्र ठरलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणी करिता अत्यावश्यक सागवान मागवले गेले आहे, ही अतिशय अभिमानाची आणि समाजातील श्रीरामभक्तीला उजळवणारी बाब आहे. त्यामुळेच चंद्रपूरहून श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा दोन भागात होणार असून दि. २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी ०३:३० वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायं. ४ वा. पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचीन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुदा आशियातील सर्व वृक्षात सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल.
ही शोभायात्रा सायं . ६ वा. संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्रौ ९ पर्यंत चालेल.
या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्य़ात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून ११०० असे एकूण २१०० कलाकार हे सादरीकरण करणार आहेत. "एक भारत श्रेष्ठ भारत" या संकल्पनेवर आधारित विविध सादरीकरणे भारतभरातून विविध प्रांतातून आलेले कलाकार करणार आहेत.
प्रत्येक चौका चौकात विविध कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रंगोळ्यांनी सजविण्य़ात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनीं गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत.
या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तीपिठे” हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहेत.
काष्ठ वाहून नेणाऱ्या रथाच्या भोवती कलाकारांचे रिंगण राहिल. हा चित्ररथ श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर ही शोभायात्रा चांदा चौकात संपन्न होईल.
शोभायात्रेनंतर रात्री १० ते १२ या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्य़ात आला आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील.
या काष्ठ पूजन सोहॊळा आणि शोभायात्रेत दूरदर्शनच्या रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेकरिता योगगुरू श्री. स्वामी रामदेव बाबा तसेच सद्गुरू श्री. जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येत आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व खासदारांना आणि आमदारांना तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना या भव्य काष्ठपूजन सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री आणि खासदार व आमदार यांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले आहे.
या काष्ठपूजन सोहोळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीरामनाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे.
देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पुर्न:उभारणीत अनेकांचे हात लागले आहेत. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडून श्रीराम ही काष्ठार्पण सेवा करवून घेत आहेत, अशी भावना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे सर्व नागरिकांनी साक्षिदार व्हावे, काष्ठ पूजनात सहभाग घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर उभारणीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा