कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे !
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई, दि. २ : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अडचणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. आज पुन्हा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित तसेच अंशत: अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती योग्य निर्णय घेणार आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात उर्वरित शिक्षक, राज्य शासकीय कर्मचारी यांच्याबाबत राज्य शासनाच्या धोरणानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही लागू केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठविला आहे. तसेच राज्यातील आय.टी. विषयाच्या नियुक्तीला मान्यताप्राप्त आय.टी. शिक्षकांच्या २१४ पदांना मान्यता दिली आहे. त्यांच्या वेतनाबाबत अधिवेशन संपल्यानंतर वित्त विभागासोबत बैठक घेवून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा