"सारंच कुठे आलबेल आहे" ! कविता ही प्रसव वेदना होय.. कविता भावनांचा, वेदनेचा हुंकार असते आणि याचं प्रत्यंतर पानोपानी येणार याची खात्रीच पटते-ज्योती कपिले,
"सारंच कुठे आलबेल आहे" !
कविता ही प्रसव वेदना होय.. कविता भावनांचा, वेदनेचा हुंकार असते आणि याचं प्रत्यंतर पानोपानी येणार याची खात्रीच पटते-ज्योती कपिले,
डॉ. ज्योती कदम यांच्या कवितासंग्रहाचे ज्योती कपिले यांनी केलेलं परिक्षण !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
कविता असते ...
अंतरीची ओल,
व्याकुळ बोल,
चिंतन खोल,
अर्थ अनमोल.
कविता हा साहित्यातील खूप मोठ्या प्रमाणात लिहिला जाणारा साहित्य प्रकार आहे. बरेचदा साहित्याची प्रथम अभिव्यक्ती ही कविताच असते. डॉ. ज्योती कदम ह्या एक प्रथितयश कवयित्री आहेत. त्यांचा साहित्यिक, सामाजिक कार्य परिचय बघितला की आपल्याला थक्क व्हायला होतं. अनेक आयमातून त्यांचे जीवन फुललेले आहे. बालपणापासून वाचनाची, चित्रकलेची आवड, वडील आणि घरच्यांचं पाठबळ ह्या साऱ्या गोष्टी कळत नकळतपणे त्यांच्या मनाला संवेदनशील बनविण्यास कारणीभूत ठरत गेल्या. आजपावतो त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालेलं आहे, त्यात ललित, सदर, कविता, बालसाहित्य, शैक्षणिक दृष्टीने झालेला अभ्यास क्रम आहेत. ह्या सर्व साधनेचा परिणाम त्यांच्या साहित्यावर, कवितांवर पडलेला आपल्याला दिसतो.
'सारंच आलबेल कुठे आहे !' असा उद्गारवजा प्रश्न आपल्याला मुखपृष्ठकार सुमिरन म्हस्के यांच्या काहीश्या रहस्यमय मुखपृष्ठावर खिळवून ठेवतो आणि आत नेमकं काय वाचायला मिळेल किंवा या संग्रहातील कविता आपल्याला कुठला आरसा दाखवणार आहे याचा विचार मनात सुरू असताना, आपण पुस्तकाचे पान उलटतो आणि कवयित्रीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही आपणास लगेच कवयित्रीकडून मिळते.
पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे 'सारंच आलबेल होणार आहे, सुंदर निरभ्र पहाट लवकरच उगवणार आहे, ही सकारात्मकता पेरणाऱ्या कवितेस ...हे पुस्तक सस्नेह अर्पण'
अशी आशादायक अर्पण पत्रिका समोर आली की पुस्तक चाळण्याची उत्सुकता वाढतेच.
कवितांना मिळालेली पूर्व प्रसिद्धी आपली नजर खिळवून ठेवणारी, दर्जेदार कविता वाचायला मिळणार याची हमी देणारी. मनोगतावर नजर फिरवली.. आणि स्वतःच्या कवितेविषयी वेगळं मनोगत लिहिण्याची गरजच नसावी मुळी, कारण कविता हे त्या त्या क्षणाचं मनोगत, कैफियत असते. शब्दांमुळे माझी डॉ. ज्योती कदम यांच्या कवितेशी नाळ जुळली गेली. खरोखर कविता ही प्रसव वेदना होय.. कविता भावनांचा, वेदनेचा हुंकार असते आणि याचं प्रत्यंतर पानोपानी येणार याची आपल्याला खात्री पटते.
आपलं बालपण जेवढं भावनासमृद्ध तेवढंच आपण लिहिण्याची शक्यता जास्त, पाचवीत पहिली कविता लिहली गेलीय म्हणजे कमालच, सभोवतालचे कौतुक, शाबासकीची थाप असली तरीही भाषेची, वाचनाची आवड कवयित्रींच्या नसानसात भिनली गेल्याचे आपल्याला जाणवतं किंवा हीच बालगुटी मिळाली की काय हे आपल्याला वाटुन जातं, सुरू होतो, त्यांचा साहित्यप्रवासात त्यांना आप्तस्वकीयांची मिळणारी साथ, त्यांना अधिकाधिक प्रगल्भ करत गेली, आपल्याला कवयित्रींच्या मनाची, त्यांची कविता किती तीक्ष्ण असणार आहे याची जाणीव करून देतात. कवितेत एकेक शब्द महत्वाचा असतो आणि तो छिलून येतोय तेव्हा त्याची झेप, व्याप्ती वाचकांच्या मनाचा छेद घेणारी असते, आणि त्या कवितेत त्यांनी आपले पंचप्राण ओतलेले आहेत...
'बाईची कविता' ही तर बाईच्या जन्मजन्मांतरीची ठसठस अधोरेखित करते.
समाजात स्त्री कवयित्रींना नेमकं कसं बघितलं जातं, त्यांच्या कवितेपेक्षा त्यांच्या शरीराकडेच समाजाचे कसे लक्ष असते आणि हे ह्या कवयित्रीला सलतंय, ही कविता समस्त स्त्री जातीचा उद्गार आहे कारण ती स्त्री कोणीही असो, कवयित्री असो, शिक्षक असो वा पोलीस असो तिला या नजरांना सामोरी जावेच लागते. मात्र या वेदनेला सामोरी आणण्याचे धैर्य ज्योतिताईंच्या कवितेने केलं आहे,
पान नं 54
'बाई हाडांची कवयित्री
नसली तरी चालते
पण..
त्वचेचा पोत मात्र
तिला राखता यायलाच हवा..
मग तिनं लिहावी
खुश्शाल कविता-बिविता..'
'संवेदनशील मनात
कधीच रहात नाही
कोणतंही जनावर
आणि
अशा मनाचे पाणवठे
भागवू पहात नाहीत
कोणतीच तहानही..'
कवयित्रीच्या भय ह्या कवितेची व्यथाही काही फारशी वेगळी आहे असे नाही, बाईची कविता आणि भय या कवितेची जातकुळीही बरीच एक आहे. अगदी सहजतेने कवयित्रीं भयाच्या व्यापक रूपाचे दर्शन करवून आपल्याला भयमुक्तही करते. कविता ह्या बऱ्याच थेट आहेत. वास्तवाचे, आयुष्याचे खरंखुरं दर्शन देणाऱ्या आहेत..
बरेचदा शब्दावाचून समजलं जावं, हे बऱ्याच व्यक्तींची इच्छा असते, यांनी यात वावगं काही नाही परंतु कुठल्यानं कुठल्या कारणांनी नेमकं तेच राहून जात, ती मनातली रिकामी जागा भरली जातच नाही. आणि जीवनाला अपूर्णतेचा शाप लाभतो.
कवयित्रीची कविता ही सर्वसमावेशक कविता आहे असं मला वाटतं, त्यांच्या कवितेला कुठल्याही विषयाचे बंधन नाही, त्यांची कविता त्यांना महाभारतात दिसते, कृष्णमय होते, निसर्गात जाणवते, मुलांच्या चिमण्या बोलीत, चाळ्यात गुंफत राहते, भयमुक्त होऊन सूर्य गिळते, प्रकाश होऊन शब्द छिलत राहते...ही कविता फक्त त्यांची नाही तर त्यांच्याबरोबर ही जनसामान्यांची कविता आहे. त्यामुळे त्या कविता वाचतांना आपण लगेच तादात्म्य पावतो.
सदर संग्रहातील राघववेळ जगण्याला खिळे ठोकून, दुःखाच्या बहिऱ्या कानात, केशरात खललेला दुधाळ चंद्र, निरव तळ्याच्या काळजात अशा अनेक सुंदर प्रतिमा आहेत. खरंतर कविता एकदा वाचून सोडायचीच नसते, ती पुन्हा पुन्हा वाचायची असते, ती मनात मुरवायची असते... या संग्रहातील बऱ्याच कविता ह्या पठडीतील आहेत. तेव्हांकुठे कवितेच्या अर्थाचे कॅलिडोस्कोप आपल्या दिसत राहीन. पण तरीही आशावाद, सकारात्मकता, दुःखावर विजय मिळवणं, शांतीमय जगणं तरीही अन्यायाला वाचा फोडणं ह्या कवितासंग्रहाचा गाभा आहे असं मला वाटतं.
ही कविता आपल्याला अंधार चिरण्याची निर्भयता देईल ही खात्री किंवा प्रस्तावनेत तांबोळी सरांनी म्हटल्याप्रमाणे विद्यमान भयग्रस्त काळात भयमुक्त जगण्याचा आश्वासक स्वर लावणारी ही कविता, हरवलेल्या श्वासांचा शोध घेत घेत निघालेली आहे. तिचं शब्दांना छिलनं अखंड चालत राहो आणि छिलता छिलता कवितेतून एखादं कैलासलेणं उभे राहिल याची खात्री या कवितेतून मिळते हे निश्चित. कवयित्रीला लिहिण्यासाठी अनंत शुभेच्छा !!
ज्योती कपिले.
९७६९१४१०७४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा