डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांसारख्या मातब्बरांच्या शिक्षणाची साक्षीदार असलेली संस्था मुंबईचं एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय बंद करण्याचं कारण काय ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांसारख्या मातब्बरांच्या शिक्षणाची साक्षीदार असलेली संस्था मुंबईचं एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय बंद करण्याचं कारण काय ?
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी शाळा वाचवा अभियाना अंतर्गत, एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई. या पूर्णतः मराठी शाळेला लागलेली अखेरची घरघर कमी करुन शाळा पूर्ण विद्यार्थी संख्येने चालू व्हावी यासाठी माजी विद्यार्थी कार्यकारीणी सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची सदिच्छा भेट घेतली. ह्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीत शाळेच्या भूत, वर्तमान आणि भविष्य विषयक महत्त्वपूर्ण बाबींचा सखोल आढावा घेतला.
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या शाळेतून शिकून मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या आहेत. याची जाणीव ठेऊन या बैठकीत सक्रिय माजी विद्यार्थी सदस्यांनी शाळेच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे प्रश्न विचारले.
१८७२ साली सुरू झालेली मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही १५० वर्षे जुनी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या शाळेचा बहुतांश भाग शासकीय तसेच अशासकीय आस्थापनांच्या कार्यालयीन कामांकरिता वापरला जात आहे. शाळेच्या इमारतीमधील इतर शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित करावी आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ विविध नवीन तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करून या शाळेला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी सक्रिय माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकांसोबत चर्चा करण्यासाठी दिलीप शिंदे, किर्ती जाधव, संजय सावंत, गंगाराम मेडसरे, बाळकृष्ण नाणेकर, मिलिंद मिरजकर, राजु कांबळे, रमेश हंकारे, विनोद जठार, निशिकांत महांकाळ, सुभाष पावसे, अॅम्रोज सोज आणि प्रसाद आंबेरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरात लवकर भेटण्याचे ठरविले व शाळा पूर्णपणे सुरू होईपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करत राहण्याचा दृढनिश्चय केला. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्र्यांना याबाबत यापूर्वीच निवेदन सादर करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक बडय़ा व्यक्तींनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. अशी नामवंत शिक्षण संस्था अखेरची घटका मोजत असल्यामुळे माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व्हॉट्सॲप क्र.98924 70137/93204 34916/98692 72057 किंवा 93221 23001 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा