असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन !
असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन !
नाशिक(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर येथे दिनांक १८ आणि १९ मार्च २०२३ या दोन दिवशी असंसर्गजन्य व्याधींसंबंधी एका महत्वपूर्ण संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी २५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात एकूणच असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण वाढत असून मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, गुडघेदुखी, मानसिक आजार, अपघात, लठ्ठपणा हे आजार बळावले आहेत. या परिषदेत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून असंसर्गजन्य व्याधींच्या समस्या, प्रतिबंधित आणि व्यापक उपाययोजना याबद्दल विचारविनिमय होणार आहे.
ही परिषद सार्वजनिक-आरोग्य आणि जन-वैद्यक शास्त्र यासंबंधी असून महाराष्ट्र राज्य पातळीवरील जन औषधवैद्यकशास्त्र या विषयातील शिक्षक, संशोधक व विविध विद्यार्थ्यांची असोसिएशन अर्थात इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन (IAPSM) आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेली आहे.
याच परिषदेला जोडून दिनांक १७ मार्च २०२३ ला शुक्रवारी दिवसभर दोन अभ्याससत्रे आयोजित केलेली आहेत. यापैकी एका सत्रात संशोधनासाठी निधी मिळवणे यासंबंधी प्रशिक्षण असून भारतातील प्रसिद्ध वैद्यक-संशोधन तज्ञ व भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजय मेहंदळे आणि त्यांचे सहकारी हे सत्र घेतील.
तसेच दुसरे सत्र संशोधन संबंधित 'पेटंट' कायद्याबद्दल असून हे सत्र वेगो संस्थेचे डॉ. नीलेश पावसकर आणि त्यांचे सहकारी घेणार आहेत. उद्घाटन-सत्रात आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जनरल (नि.) मा. डॉ. माधुरी कानिटकर आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे मार्गदर्शन करतील.
या दोन दिवसीय परिषदेत दिल्ली येथील राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था स्रोत या संस्थेचे डॉ. अतुल कोतवाल बीजभाषण देतील. याशिवाय या परिषदेत प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. राजीव भलवार, नवी दिल्ली येथील भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय झोडपे, डॉ. बाळकृष्ण अडसूळ, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे डॉ. बाहुबली नगावकर. नागपूर येथील डॉ संजय देशपांडे, छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय कर्करोग रुग्णालयाचे डॉ अरविंद गायकवाड आदि अनुभवी तज्ञ विविध विषयांवर व्याख्याने देणार आहेत.
महाराष्ट्राचे आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे या परिषदेत महाराष्ट्रातील असांसर्गिक आजारांचा प्रादुर्भाव व त्याविरोधातील शासकीय प्रयत्नाचा आढावा घेतील. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या. जास्तीत जास्त वैद्यकीय शिक्षक व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी संयोजन समितीच्या डॉ. मानसी पाध्येगुर्जर, आयएपीएसएमचे डॉ. ललित संखे व आयपीएचएचे डॉ. गजानन वेल्हाळ आदि परिश्रम घेत आहेत.
हे आहे परिषदेचे आकर्षण
* युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या डॉ. प्रमिला मेनन यांचे बालवयातील अतिवजन/स्थूलता समस्या याबद्दल व्याख्यान.
* महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आहारातज्ञ आणि जन वैद्यक शास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे 'दोन वेळचे भोजन आणि नियमित व्यायाम या जीवनशैलीतून मधुमेह मुक्ती' याविषयी शोधनिबंध व चळवळीसंबंधी व्याख्यान.
* डॉ. प्रदीप देशमुख (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर) यांचे भौगोलिक समाज आरोग्याभ्यास यासंबंधीचे व्याख्यान.
* डॉ. प्रशांत पानसरे (पुणे) यांचे डेटा सायन्स आणि आरोग्यविषयक संशोधन यासंबंधीचे व्याख्यान
* शरीरातील मेद-प्रमाणाचे मोजमाप वर डॉ. अंकिता घाग व टाटा कर्करोग रुग्णालय, परळ, मुंबई डॉ. सुबिता पाटील यांचे महाराष्ट्रातील कर्करोगाचे सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोनातून समीक्षण मांडले जाणार आहे.
* या परिषदेत एकूण ७५ शोधनिबंध सादर केले जाणार असून त्यातील निवडक शोधनिबंधांना विविध पारितोषिके दिली जाणार आहेत. या परिषदेत एकूण २५० प्रतिनिधी सामील होत आहेत. प्रतिनिधी नोंदणी १७ मार्च २०२३ तारखेपर्यंत सुरू असून http://MHIAPSMIPHACON 2023 या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा