आईनस्टाईन ने साऱ्या जगाला एकट्याने जिंकले, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मानवाच्या सृष्टीविषयक तत्कालीन कल्पनेत उलथापालथ घडवून आणून गुरुत्वाकर्षण, अवकाश , काळ आदीमध्ये क्रांतिकारक स्वरूपाचे नवे विचार जगापुढे मांडण्याचे कार्य गणितज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ने केले आहे. १४ मार्च हा त्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने.....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आईनस्टाईन ने साऱ्या जगाला एकट्याने जिंकले, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मानवाच्या सृष्टीविषयक तत्कालीन कल्पनेत उलथापालथ घडवून आणून गुरुत्वाकर्षण, अवकाश , काळ आदीमध्ये क्रांतिकारक स्वरूपाचे नवे विचार जगापुढे मांडण्याचे कार्य गणितज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ने केले आहे. १४ मार्च हा त्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने.....
विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : अल्बर्ट आईनस्टाईन !
अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म या गावी एका ज्यू कुटुंबात झाला. लहानपणी मंद बुद्धीचा आणि एकलकोंडा समजल्या गेलेल्या अल्बर्ट यांना गणित, विज्ञान आणि संगीताची आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी बीजगणितातील भौतिकी समीकरणे आत्मसात केली होती. झ्युरिच (स्वित्झर्लंड) येथील फेडरल इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलोजी मधून गणित व विज्ञान या विषयातून पदवी घेऊन ते एका पेटंट ऑफिस मध्ये कारकुनाची नोकरी करू लागले.
आईन्स्टाईन नोकरी करीत असताना न्यूटनच्या गतीविषयक व गुरुत्वाकर्षण विषयक सिद्धांतावर विचार करावयाचे. त्यांना विश्वाचा शोध घेण्याची तळमळ लागली होती. न्यूटनचा सिद्धांत आकाशातील ग्रहांच्या भ्रमणाचा खुलासा योग्यप्रकारे करत असला तरी प्रकाशाच्या स्वरूपाबद्दल न्यूटनने मांडलेली रज:कण उपपत्ती प्रकाश विषयक वेगवेगळ्या आविष्कारांचा खुलासा करण्यास असमर्थ ठरत होती. इथर सारख्या माध्यमाचे अस्तित्व व न्यूटनचे गतीविषयक सिद्धांत याबाबत त्यावेळेचे शास्त्रज्ञ अंधारात चाचपडल्या सारखे करीत होते. तथापि, आईनस्टाईन यांना इथर ची कल्पना मान्य नव्हती. याचदरम्यान मायकल्सन आणि मोर्ले या अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रकाशकिरणांच्या गतीसंबंधी केलेले संशोधन त्यांच्या वाचनात आले आणि त्यांचे विश्वाचे चित्र स्पष्ट झाले. स्थिर अवकाशाची कल्पना नाहीशी होऊन विश्वातील प्रत्येक गोष्ट निरंतर गतिमान आहे, हे आईन्स्टाईन नी १९०५ साली आपल्या प्रबंधातून स्पष्ट करून सांगितले. यासाठी त्यांनी दोन आधार तत्वे मांडली. कोणत्याही प्रयोगातून आपल्याला एखाद्या पदार्थाची फक्त सापेक्ष गतीच समजू शकते, म्हणजे एका निरीक्षकाच्या गतीचा बोध दुसऱ्या निरीक्षकाच्या संदर्भातच आपल्याला होऊ शकतो आणि प्रकाश देणाऱ्या वस्तू कडून येणारा प्रकाश ती वस्तू स्थिर असो वा कोणत्याही दिशेत गतिमान असो तिच्या गतीची तमा न बाळगता निर्वात जागेतून सदैव एक ठराविक वेगाने प्रवास करतो. १९०५ साली पेटंट कचेरीतला कारकून एखादे नवल घडावे त्याप्रमाणे एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, गणितज्ञ म्हणून नावारूपाला आला. त्याने जर्मन भाषेतील वैज्ञानिक नियतकालिका मध्ये आपल्या संशोधनावर आधारित प्रबंध प्रसिद्ध केला त्याच्या प्रबंधाचे नाव होते ‘सापेक्षतेची खास उपपत्ती’( स्पेशल थिओरी ऑफ रिलेटीव्हीटी). न्यूटनने मांडलेल्या पदार्थ विज्ञानातील कल्पनेला आईनस्टाईन यांनी हादरा दिला. न्यूटनच्या कल्पनेप्रमाणे काळ हा निरपेक्ष असून तो अखिल विश्वात कोठेही तसाच राहतो. त्याचा ओघ भूतकाळातून भविष्याकडे सतत चालू असतो. काळाप्रमाणे न्यूटनची निरपेक्ष लांबीची कल्पनाही लुप्त होते हे आईनस्टाईन यांनी सिद्ध केले. आईनस्टाईन यांच्या सापेक्षतेनुसार काळ व अंतर हे दोन्ही अस्थिर असून ते दोन्ही निरीक्षकांच्या सापेक्ष गतीवर अवलंबून असतात. फक्त प्रकाशाचा वेग हा निरपेक्ष असतो.
आईनस्टाईन यांनी सापेक्षतेच्या कल्पनेवर आधारित गणिताचा व प्रकाश विद्युत परिणामविषयक कल्पनेचा उपयोग कृन्येक नवीन क्रांतिकारक कल्पना मांडली. ती अशी,’एखाद्या वस्तूकडून प्रकाश रुपात ’ई’ एवढी उर्जा बाहेर टाकली गेली तर त्या वस्तूचे वस्तुमान (ई/प्रकाशाचा वेगवर्ग) इत कमी होईल’. म्हणजेच वस्तू आणि उर्जा केवळ सममूल्यच नसून ती अदलाबदल करण्या योग्य आहेत. याच सूत्राच्या आधारे आपला सूर्य आकाराने विशेष कमी नव्हता, लक्षावधी वर्षे कसा प्रकाश व उष्णता देत आहे याचा उलगडा होतो. आईनस्टाईन यांच्या या संशोधनामुळेच आधुनिक काळातील अणूशक्तीच्या युगाची दारे उघडली गेली.
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी केलेल्या महान संशोधनांमुळे विज्ञान क्षेत्रात एका नविन प्रकारची क्रांती आणली.त्यांनी कठीणाहून कठीण गोष्टी खूप सोप्या बनवल्या.बऱ्याच वेळेला आईनस्टाईन प्रात्याक्षित करत असतांना अपयशी होत असत. अपयश आले तरी ते कधीच खचून गेले नाहीत.त्यांनी आपल्या प्रयत्नातून सर्व जगासमोर स्वत:ला सिद्ध करून दाखविले आणि संपूर्ण जगासाठी ते प्रेरणादायी बनले. आईनस्टाईन यांचे काही सुविचार
(१) विश्वात दोन गोष्टी अगणित आहेत, ब्रह्मांड आणि मानवाची मूर्खता. परंतु ब्रह्मांडा बद्दल मी निश्चित सांगू शकत नाही.
(२) ज्या माणसाने आपल्या आयुष्यात चुका कधीच केल्या नाहीत, त्याने जीवनात काही नविन करण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही.
(३) सर्व मानव हे ईश्वरांच्या नजरेने एक समान आहेत, कोणीच जास्त बुद्धिमान नाही आणि मूर्ख सुद्धा नाही.
जेव्हा जर्मनी मध्ये हिटलर चे शासन आले, तेव्हा त्याने आपल्या देशातील सर्व यहुदी लोकांना देशाबाहेर काढले.अल्बर्ट आईनस्टाईन हे जर्मनीचे रहिवासी आणि विशेष म्हणजे ते सुद्धा यहुदीच असल्यामुळे त्यांना सुद्धा जर्मनीच्या बाहेर जावे लागले. जर्मनी सोडल्यानंतर आईनस्टाईन अमेरिकेच्या न्यूजर्सीत येऊन स्थायिक झाले. याच ठिकाणी ‘प्रिस्टन’ महाविद्यालयात काम करीत असतांना १८ एप्रिल १९५५ साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
कवठेमहांकाळ, जि. सांगली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा