प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती !आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती

प्रवाशांची प्रीमियम प्रवासाला पसंती !
आजपासून (रविवार २५ डिसेंबर) आणखी तीन मार्गावर सेवा, लोकेश चंद्र यांची माहिती

           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सेवेत ई- वातानुकूलित प्रीमियम बसेस आणल्या आहेत. १२ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या प्रीमियम बसने रोज ३०० प्रवासी लक्झरी प्रवास करत असून, ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रीमियम बसेसना प्रवासी पसंती देत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, प्रीमियम बस सेवेला पसंती बघता २५ डिसेंबरपासून आणखी तीन मार्गांवर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

         ओला-उबेरपेक्षा स्वस्त, आरामदायी, गारेगार प्रवास करता यावा म्हणून बेस्ट उपक्रमाने प्रीमियम बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. ठाणे ते बीकेसी व वांद्रे स्थानक पूर्व ते बोकेसी दरम्यान, १२ डिसेंबरपासून प्रीमियम बससेवा प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावू लागली आहे. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान एक हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रीमियम बसने प्रवास केला असून, सद्यस्थितीत रोज ३०० प्रवासी गारेगार प्रीमियम बसने प्रवास करत असल्याचे चंद्र यांनी सांगितले. प्रवाशांची पसंती लक्षात घेता उद्यापासून खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई (हिरानंदांनी) आणि चेंबूर ते कफ परेड या तीन मार्गावर १० प्रीमियम बस चालविण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
***********************************
           घरबसल्या तिकीट
             १२ डिसेंबरपासून बीकेसी ते ठाणे आणि वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसी दरम्यान चार प्रीमियम सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे घरातून बेस्टच्या 'चलो मोबाइल' अॅपवर सीट आरक्षित करता येत असून, प्रवाशांना घरबसल्या तिकीट बुक करता येत आहे. एकूण दोन हजार प्रीमियम बस दाखल होणार असून, त्यापैकी २० बस दाखल झाल्या आहेत. ठाणे ते बीकेसी दरम्यान पहिली प्रीमियम बस सुरू झाली असून त्यानंतर खारघर ते बीकेसी, ठाणे ते पवई आणि चेंबूर ते कफ परेड दरम्यान प्रीमियम बस चालविण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !