मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !
मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !
मुंबई (प्रतिनिधी)::- दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय, मुंबई विभाग व श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य (रजि) यांच्या संयुक्त विद्यमाने 'मूर्तिकार कारागीर कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा' पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक संदीप सिद्धे गुरुजी तसेच श्रमिक बोर्डाचे राष्ट्रीय सदस्य सुधाकर अपराज, सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र पुरोहित, स्वावलंबी भारत अभियानाचे संदीप देशपांडे. कौशल्य विकास तज्ञ विनायक जोगळेकर तसेच संघटनेच्या पदाधिकारी आणि सर्व उपस्थितांच्या साक्षीने झाले.
कार्यक्रमाची सुरुवात संदीप सिद्धे गुरुजी यांच्या मनोगताने झाली. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणेश मूर्ती कशी घडवावी याबद्दल त्यांनी माहिती दिली. विभागीय संचालक चंद्रसेन जगताप यांनी लघूकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश व बोर्डाची माहिती दिली. तसेच मूर्तीकार कामगारां करता अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम असून विविध सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्या करता श्रम व रोजगार मंत्रालय प्रयत्न करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विकास कौशल्य तज्ञ विनायक जोगळेकर यांनी विविध प्रकारच्या कौशल्य योजनांचा लाभ कसा घेता येईल याची माहिती दिली. संदीप देशपांडे यांनी 'स्वावलंबी भारत' यावर माहिती दिली.
श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन मूर्तिकार कामगार संघटनेचे सचिव सुरेश शर्मा, राहुल घोणे, निलेश भालेराव यांनी केले. सर्व कलाकार आणि कामगारांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेच्या दोनशे पन्नास सदस्यांना ई-श्रम कार्ड, निवृत्ती वेतन योजना व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच केंद्र सरकार तर्फे त्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा