महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

         यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच सोहळ्यात कायदा विषयक सर्वोच्च गुण मिळविलेल्या अपूर्वा केरकर आणि सिद्धार्थ साळवे यांना न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
          महाराष्ट्राला विश्वास देणारा, बहुजन समाजाला आत्मविश्वास देऊन उन्नतीची दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. आज यशवंतराव यांचे सर्व सद्गुण घेऊन त्यांचे महाराष्ट्राचे स्वप्न पुढे नेणारे व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. आणीबाणीच्या पूर्वार्धात यशवंतराव आणि उत्तरार्ध काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचे कार्य केले. यशवंतरावांचे शिष्य शरद पवार आणि माझा मागील ६० वर्षांपासूनचा परिचय आहे. यशवंतरावांचा वसा आणि वारसा शरदरावांनी जोपासला आहे, असेही मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी सांगितले.
        यशवंतराव चव्हाण हे एक राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक होते पण त्यापेक्षा ते मोठे वाचक होते. कला, साहित्याची जाणीव असणारे असे ते व्यक्तिमत्व  होते. यशवंतराव यांना अपत्य नसल्याने आपल्या पश्चात संपत्तीचे काय करायचे, त्याचे त्यांनी आधीच मृत्यूपत्रात लिहिले होते. ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या बँक खात्यात २७ हजार रुपये होते तर त्यांच्या घरात २४ हजार पुस्तके होती. यावरून ते वाचक, ग्रंथप्रेमी होते, हे समजून येते. यशवंतराव यांना साहित्याची मोठी आवड होती. परराष्ट्र मंत्री म्हणून देश-विदेशात दौर्‍यावर गेल्यावर यशवंतराव दुर्मिळ पुस्तकांची खरेदी करत असत. आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाल्याने या पुरस्काराची निवड अगदी सार्थ आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी कर्णिक यांचे कौतुक केले.
       देशातील आघाडीचे उद्योगपती अझीम प्रेमजी यांना २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या पुरस्कार निवड समितीचे प्रमुख डॉ. अनिल काकोडकर यांनी केली. पुढील वर्षी १२ मार्च २०२३ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे त्याचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कृषी औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांत भरीव व पारदर्शी कार्य करणार्‍या व्यक्ति अथवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
        यावेळी कार्याध्य़क्षा सुप्रिया सुळे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण आपल्या मनोगतामध्ये केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरीश मिश्र यांनी केले तर आभार प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी मानले. कार्यक्रमास साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !