आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !
दि.१ ते ३० नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. निराधार बालक आणि अपत्यासाठी आसुसलेले पालक या दोन टोकांना दत्तक विधान एकत्र आणते. मात्र या क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन फसवणूक देखील केली जाते. बेकायदेशीर दत्तक प्रकरणे घडतात. नाशिकमध्ये आधाराश्रम ही सेवाभावी संस्था समाजाने नाकारलेल्या निरागस बालकांचे संगोपन करते. त्यांचे शैक्षणिक, मानसिक पालनपोषण करते. आरोग्याची काळजी घेते. अधिकृत दत्तक प्रक्रिया राबवून बालकांना हक्काचे पालक, कुटुंब मिळवून देते. आतापर्यंत सुमारे ९५० पेक्षा जास्त बालके देश-परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.
रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस बालकांनाही इतरांसारखे आपल्याला आईबाबा असावेत, आपले घर असावे असे वाटते. प्रेम करणारी, हक्काची माणसे आजूबाजूला असावीत अशी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच अनाथ बालकांचीही साहजिक इच्छा असते. दुसरीकडे चारचौघांप्रमाणे आपल्याही संसारवेलीवर बाळाच्या रूपाने फूल फुलावे, आपला वंश पुढे सुरु राहावा असे अपत्य नसलेल्या जोडप्यांचे स्वप्न असते. या दोन्ही घटकांना कायदेशीरपणे एकत्र आणून त्यांचे 'अधिकृत नाते' जोडण्याचे काम दत्तक प्रक्रिया करते. नोव्हेंबर महिन्यात यासाठी जगभरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. नाशिकमधील आधाराश्रम ही सेवाभावी संस्था गेली ६८ वर्षे सातत्याने निराधार बालकांचे मातेच्या ममतेने संगोपन करते. येथून कायदेशीर प्रक्रिया राबवून आतापर्यंत ९५० पेक्षा अधिक बालके दत्तक पालकांच्या सुरक्षित हाती सोपविण्यात आली आहेत. त्यातील काही थेट विकसित देशांमधील कुटुंबात गेली आहेत. कोरोनाच्या काळात दत्तक प्रक्रिया काहीशी रेंगाळली. त्यामुळे दुर्दैवाने बेकायदेशीर प्रकरणांमध्ये वाढ झाली. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दत्तक महिना घोषित झाल्याने कायदेशीर दत्तक विधानांना चालना मिळाली आहे. याबाबत आधाराश्रमाचे समन्वयक राहुल जाधव म्हणतात की, सध्या संस्थेकडे ६० पेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दत्तक महिना घोषित होताच राज्यातील पहिले बाळ नाशिकच्या आधाराश्रमातून दत्तक देण्यात आले. दोन बालकांची दत्तक प्रक्रिया सुरु असून लवकरच ती पालकांकडे सुपूर्द केली जातील.
जानेवारीपासून आतापर्यंत ९ बालके दत्तक देण्यात आली. त्यात ५ मुलगे व ४ मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्याकडे पालकांचा कल वाढतोय, हे देखील लक्षणीय आहे. 'केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणा'द्वारे वेळोवेळी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्था या प्रक्रियेची अंमलबजावणी करते. सन २०११ पासून संस्थेने सुमारे ३० विशेष बालकांना परदेशी पालकांकडे सुपूर्द केले आहे. दत्तक प्रक्रियेसाठी www.cara.nic.in
या संकेतस्थळावर माहिती मिळवता येईल. 'कारा' ही स्वायत्त संस्था देशांतर्गत व परदेशात द्यावयाच्या दत्तक प्रक्रियेचे संस्थांच्या माध्यमातून संचालन, नियंत्रण करते. आधाराश्रमाचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. संस्थेचे कार्यवाह हेमंत पाठक म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याच्या औचित्याने विविधांगी माहिती समाविष्ट असणाऱ्या भित्तीपत्रांचा संच तयार करण्यात आला आहे. खास रेडियमचा वापर करून विशेष फलक बनविण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रबोधन, प्रचार, प्रसार होईल. समाजाने नाकारलेली बेवारस बालके सेवाभावी संस्थेत दाखल कशी करायची? दत्तकविधान प्रक्रिया कशी राबविण्यात येते? या प्रश्नांची सोप्या शब्दात माहिती देण्यात आली आहे. लवकरच आधाराश्रमात दत्तक दिलेल्या बालकांचा व बाळ दत्तक घेऊ पाहणाऱ्या पालकांचा मेळावा घेण्यात येईल. बालन्याय कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने दत्तक विधानाचा अधिकार आता न्यायालयाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. दिरंगाई टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल व बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षाही पाठक यांनी व्यक्त केली.
-संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार, नाशिक)
*********************************
दत्तक विधानातील ठळक बाबी ,,,,,,,
■ बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, राज्य दत्तक स्रोत, विशेष दत्तक संस्था व विविध घटकांची भूमिका महत्त्वाची.
■ बालकांची संख्या व इच्छुक पालकांच्या संख्येतील लक्षणीय तफावत.
■ जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच ठिकाणी संपूर्ण दत्तक प्रक्रिया झाल्याने अडथळे दूर होतील.
■ दत्तक पालक, दाम्पत्यांना मानसिक, नैतिक बळ मिळेल तसेच प्रतीक्षाकाळ कमी होईल.
■ बेकायदेशीर दत्तक विधान व त्यामुळे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला आळा बसेल.
■ एकटी महिला किंवा पुरुष मुलगा, मुलगी दत्तक घेऊ शकतात.
■ दत्तक घेऊ इच्छिणारे दाम्पत्य शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे, तसेच आधीची दोन किंवा त्याहून जास्त अपत्ये असू नयेत.
■ लग्नाला किमान दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला असावा.
**********************************
आधाराश्रमाची सत्तरीकडे वाटचाल...
दि.४ एप्रिल १९५४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वैद्य अण्णाशास्त्री दातार यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या प्रेरणेने अनाथ महिलाश्रम या संस्थेची स्थापना केली. कालांतराने अनाथ, निराधार बालकांच्या पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली व आधाराश्रम असे नामकरण करण्यात आले. या कार्यात मुकुंदशास्त्री बापट, इंदिराताई बापट, इंदूताई खाडिलकर, पु.रा. वैद्य यांचे सहकार्य लाभले. घारपुरे घाट परिसरात संस्थेची वास्तू उभी आहे. बालकांचे संगोपन, शिक्षण व आरोग्य रक्षण यासाठी संस्थेतील सेविका, परिचारिका, काळजीवाहू कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. अध्यक्ष विजय दातार, उपाध्यक्ष डॉ. सुनेत्रा सरोदे, राजन चांदवडकर, कार्यवाह सुनीता परांजपे व हेमंत पाठक तसंच कार्यकारिणी सदस्य तन, मन, धनाने सेवाकार्यात सहभागी होतात. आगामी काळात वृद्धाश्रम प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. दानशूर व्यक्तींनी ७३८७९९९४३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा