समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी जनजागृती होणे गरजेचे ! आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) संघटनेकडून प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन


समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी 
जनजागृती होणे गरजेचे !
   अस्थिव्यंग जन्मतः असते किंवा काहीवेळा अस्थिरोगांंमुळे,अपघातांनी अस्थिव्यंग निर्माण होते. अस्थिरोग तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. त्यातून रुग्ण बरे होतात. मात्र त्यामध्ये ऑर्थोटिक्स म्हणजे आधार देऊन बाह्योपचार व प्रोटेटिक्स म्हणजे कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या तज्ज्ञांची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स
(आयएसपीओ) या संघटनेने प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन जाहिर केला आहे.

नाशिकमध्ये डॉ. दीपक सुगंधी त्यांच्या दीपक सर्जिकल्स संस्थेतर्फे ४४ वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. या दिनाच्या निमित्ताने...
    ऑर्थोटिक्स अँड प्रोथेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ( ओपीएआय ) आज देशभर जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या विशेष प्रगत विज्ञान शाखेमुळे दिव्यांग व्यक्तींना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रात जसा भारतात विकास होत आहे तसाच या क्षेत्रातही सातत्याने होतो आहे. त्यामुळे दिव्यांगांना सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगण्यास हातभार मिळतो. नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान यांच्या समन्वयातून या क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाधिक उत्तम सेवा देतात. त्यातून रुग्णांना सक्षमपणे पुन्हा आपल्या पायावर उभे राहून समस्येशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास मिळतो. त्याचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यायला हवा. सर्वसामान्य नागरिकांना योग्य, नेमकी माहिती असेल तर गरजू रुग्णांना तातडीने सुयोग्य उपचार मिळतात. त्याच उद्देशाने हे प्रबोधन ! डॉ. दीपक सुगंधी हे प्रोस्थेटिक्स तंत्र वापरून अपघात झालेले किंवा मधुमेह, कर्करोग झालेल्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतात. अश्या रुणांमध्ये काही अवयवांमध्ये अतिरिक्त वाढ होते. काही बाळांमध्ये जन्मतः काही अवयव सुयोग्य आकारात नसतात किंवा काही अवयवांची नैसर्गिक वाढ होत नाही. बऱ्याच जणांना अपघातात दुर्दैवाने एखादा अवयव गमवावा लागतो. अश्यावेळी  कृत्रिम आधार देऊन बाह्योपचार केले जातात. त्यामुळे रुग्ण दैनंदिन जीवन सामान्यपणे आनंदात जगू शकतात. 
     एखाद्या अपघातात गमावलेला किंवा रुग्णांच्या गरजेनुसार आवश्यक अवयव कृत्रिमपणे बनवून योग्य पध्दतीने बसवला जातो.  त्यांच्याकडून सराव करवून घेऊन योग्यप्रकारे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शास्त्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगत होत आहे. त्यामुळे रुग्ण जास्तीतजास्त नैसर्गिक हालचाली करू शकतो. कृत्रिम पाय बसवलेली व्यक्ती आत्मविश्वासाने चालू, फिरू शकते. कृत्रिम हाताने दैनंदिन कामे विनासायास करता येतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉ. दीपक आधार देऊन बाह्योपचार करतात. कृत्रिम नाक, कान, डोळे, जबडा तसेच हातापायांची बोटे तयार करतांना रुग्ण व्यक्तीचा वर्ण, शारीरिक ठेवण, वय या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन तंतोतंत दिसतील असे तंत्र व कौशल्य वापरले जाते. त्याला कॉस्मेटिक रिस्टोरेशन असे म्हणतात. रुग्णाचे अवयव असूनही बऱ्याचदा काही कारणांनी ते योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. अश्यावेळी ऑर्थोटिक्स शास्त्रानुसार योग्य पध्दतीने आधार देऊन रुग्णांना बाह्योपचार देऊन सक्षम बनवले जाते. पोलिओ, अर्धांगवायू किंवा मेंदूविकार असणाऱ्या रुग्णांचे अवयव कमजोर झालेले असतात. अशांना
कॅलिपर, ब्रेसेस, बूट, स्प्लिन्ट बसवून पूर्ववत होण्यास मदत केली जाते. जन्मतः व्यंग, दोष असणाऱ्यांंना आधार मिळतो. जलद सुधारणा होते. नवजात बाळाच्या हातापायात काही व्यंग असल्यास अस्थिरोग तज्ज्ञ शस्त्रक्रिया करतात. नंतर विशिष्ट प्रकारचे बूट, स्प्लिन्ट दिले तर दोष कायमस्वरूपी जाऊ शकतो. पाठीत बाक, कुबड असल्यास सुयोग्य आकारांचे पट्टे वापरल्याने दोष कमी होतो व वाढत नाही. अनेकांना तरुण वयात टाचा, मानदुखी, कंबरदुखी, वृद्धपकाळात गुढगे, हातपाय दुखणे असे त्रास उदभवतात. त्यांना सुयोग्य पट्टे, नेमका व्यायाम व मार्गदर्शन करून व्याधीमुक्त करता येते. या दिनाच्या निमित्ताने ही कार्यप्रणाली जाणून घेतली तर समाजात जागृती होईल.
                   -  डॉ. सुमेध दीपक सुगंधी
                           ( पी अँड ओ, मुंबई )
            ■ शब्दांकन - पत्रकार संजय देवधर
 **********************************
डॉ. दीपक सुगंधी यांचे अखंड योगदान !
   नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या उत्तर महाराष्ट्रात दीपक सर्जीकल्स ही संस्था ४४ वर्षे रुग्णसेवा करीत आहे. डॉ. दीपक सुगंधी यांनी सन १९७८ मध्ये मुंबईतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीन अँड
रिहॅबीटेशन या केंद्र सरकारच्या संस्थेतून डिप्लोमा पूर्ण केला. या क्षेत्रातील भारतात पहिल्या १२ इंजिनिअर्समध्ये त्यांचा समावेश होतो. नाशिकमधील प्रथितयश अस्थिविकार तज्ज्ञांसमवेत डॉ. दीपक बाह्योपचार करतात. त्यांचे अखंड योगदान आहे. मी देखील याच संस्थेतून पदवी प्राप्त केली असून सहा वर्षांपासून वडिलांसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहयोगातून रुग्णांवर उपचार करीत आहे. दीपक सर्जीकल्स ही नोंदणीकृत संस्था रिहॅबीटेशन कौन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !