होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आभाळाने नाकारलेल्या पंखांना विहाराचं सामर्थ्य द्यावं, उपेक्षितांना साधनांचं पाठबळ देत संधींची कवाडं खुली करावी, दुर्जनांचा समाचार घेत सज्जानांचा सन्मान करावा, सहकारी वर्गाला उंबुटू न्यायाने सर्वथैव लोकहिताचे आत्मभान द्यावे आणि सुशासनाच्या निर्मितीतून लोककेंद्री संविधानाचा पाया मजबूत करत राष्ट्रकार्यात स्वतःला समर्पित करावे, अशा पंचसूत्रीतून लोकसेवेचा परिपाठ पढवत लोकाभिमुख प्रशासनाची आश्वासक मांडणी करणारी 'भारत की बेटी' काल नाशिकमधून पुढील जबाबदारीसाठी मार्गस्थ झाली. व्रतस्थ लोकसेवेच्या या अग्रणीला निरोप देताना प्रशासनाचा जेव्हा कंठ दाटून आला तेव्हा एक सलाम हृदयापासून निघाला आणि शब्दरूप घेऊन कागदावर स्थिरावला. 
       होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

        पत्रकारितेच्या उण्यापुऱ्या अडीच दशकांत कितीतरी सनदी अधिकाऱ्यांशी संपर्क आला. पण, अशा अधिकाऱ्यांना निरोप देताना गहिवरलेले प्रशासन बघण्याचा दुर्मिळ योग कालचा दिवस पुढ्यात टाकून गेला. फार नाही, पण दोनच वर्षांच्या कारकीर्दीत नाशिक जिल्हा परिषदेत आपल्या संविधान अधिनस्त कार्याचा अमीट ठसा श्रीमती लिना बनसोड मॅडम यांनी उमटविला. 'लोकसेवा हा राष्ट्रविकासाचा शाश्वत व घटनानिर्मित राजमार्ग आहे. तो नि:पक्ष, निधर्मी, निगर्वी, निस्पृह आणि निर्व्याज लोकसेवेतून आपल्याला प्रशस्त करावा लागेल. यासाठी 'मी' नाही, तर 'आम्ही' या संकल्पनेचा अंतर्भाव प्रशासनकार्यात अनिवार्य आहे', असा प्रगत विचार लिना बनसोड मॅडम यांनी आपल्या कार्यकृतीतून मांडला. तो प्रशासनासाठी प्रमाणभूत ठरला आणि लोकशाहीला अभिप्रेत ग्रामविकासाचे अर्थचक्र गतिमान झाले.


         लिना बनसोड यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्हा परिषद प्रशासनात अनेक आमूलाग्र बदल घडले. चुकीच्या पद्धतीने कामकाज करून लोकहित प्रताडित करणाऱ्या महाभागांवर कठोर कारवाई करण्याचे धारिष्ट्य लिना बनसोड यांनी दाखविले. कार्यालयीन शिस्तीबरोबरच विहित शासकीय कार्यपद्धतीची निकोप अंमलबजावणी करण्याकडे लिना बनसोड यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. कामकाजातील गतिमानता, पारदर्शकता, वचनबद्धता आणि लोकाभिमुखता या प्रशासकीय चौकटीला खऱ्या अर्थाने झळाळी लाभली ती लिना बनसोड यांच्या कारकीर्दीत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ग्रामीण भागातील तळागाळातील लाभार्थ्यांना समान संधी, शाश्वत विकास व आश्वासक उन्नतीची हमी गेल्या दोन वर्षांत मिळाल्याचे कितीतरी साक्षीदार मी क्षेत्रीयस्तरावर पाहिले. अनुभवले. प्रशासनाचा सुकाणू सुरक्षित हातात असेल तर लोकविकासाची नाव विनासायास किनारी लागते, याचा प्रत्यय या दोन वर्षांतील लिना बनसोड यांच्या कार्यपद्धतीचे मुल्यमापन करताना प्रकर्षाने आला. जिल्हा परिषदेत तक्रार घेऊन येणारा अभ्यागत समाधानाने बाहेर पडला पाहिजे, यासाठी लिना बनसोड यांनी कार्यान्वित केलेली यंत्रणा लोकसेवेचा एक उत्तम नमुना ठरावा, असाच आहे. 
_________________________________
नासिक शहरासह जिल्ह्यातील जनतेसाठी लीना बनसोड यांची झालेली बदली रद्द करून त्यांना जिल्ह्याबाहेर जाऊ न देणे हे नासिकच्या हिताचे ठरेल अशी अपेक्षा आहे. यांसाठी आता जिल्ह्यावर प्रेम करणारे कोण राजकीय, सामाजिक, बौद्धिक विचारवंत पुढे येतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल !
___________________________________

      भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याचा अभिनिवेश लिना बनसोड यांच्या देहबोलीत अपवादानेच जाणवला. कार्यालयीन कामकाजात शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना समानतेची व विशेष म्हणजे मानवतेची वागणूक देत एक कुटुंबवत्सल प्रशासक म्हणून लिना बनसोड यांची नाशिक जिल्हा परिषदेत ख्यातकीर्त अजरामर राहिल. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विधायक निर्णय घेत प्रशासनाला सकारात्मक ठेवण्यात लिना बनसोड यांनी यश मिळवले. त्याचा अनुकूल परिणाम प्रशासकीय कामकाजात झाला आणि लोकहिताच्या कामांमध्ये विलक्षण गतिमानता आली. मिनी मंत्रालय संबोधण्यात येणारी जिल्हा परिषद लोकांना आपली वाटू लागली. या आपलेपणातच लिना बनसोड यांच्या लोकाभिमुख प्रशासकीय सेवेची महत्ता अधोरेखित होते. 
     असे सर्वकाही सुरळीत असताना परवा वरिष्ठ पातळीवरून लिना बनसोड यांच्या बदलीचा धक्कादायक निर्णय जिल्हा परिषदेत येऊन धडकला. प्रशासनाच्या काळजाचा ठोका चुकविणारा हा निर्णय सर्वांच्याच नेत्रकडा अलगद ओलावून गेला. एक कर्तव्यदक्ष, निर्भीड आणि निष्कलंक अधिकारी आपल्यातून उद्या जाणार आहे, ही जाणीवच जिल्हा परिषद प्रशासनाला सुन्न करवून गेली. अतिशय जड अंतःकरणाने लिना बनसोड यांना निरोप देण्यात आला. हा निरोप सोहळा दाटलेल्या कंठांच्या आर्त स्वरांनी अन् धारोष्ण अश्रूंनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सजला आणि एक ऐतिहासिक दस्त बनून प्रत्येकाच्या हृदयात स्थिरावला. लिना बनसोड यांच्या निरोपाचा सोहळा डोळ्यात साठवून घेताना सुरेश भटांच्या या ओळी नकळत ओठांवर आल्या... 
स्वप्नासवे तिने संसार केला !
राखेतही तिने शृंगार  केला !
जाता जाता तिने, 
यातनांचाही सन्मान केला ! 
          मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या खुर्चीत किती आले आणि गेले, पण लिना बनसोड हे नाव प्रत्येकाच्या कानीवचनी कायमचे सुश्रूत व उदृधत झाले. 'भारतीय प्रशासकीय सेवा' हा शब्द 'लिना बनसोड' असाही लिहिता येऊ शकतो या निष्कर्षाप्रत मी पोहचलो आहे. नव्या जबाबदारीसाठी लिना बनसोड यांना न्यूज मसाला परिवारातर्फे सहस्त्रकोटी सदाहरित शुभेच्छा!

टिप्पण्या

  1. सर नौकर्या मिळत नसतांना त्यांनी ३५० अनूकंपा भरती करून घरातील चुल चालू ठेवली व कर्मचारी कमतरता उनीव भरुन काढली.हा निर्णय खूप धडाडीचा होता.

    उत्तर द्याहटवा
  2. आयुष्यात प्रत्येकाने फक्त एकच चूल पेटविली तरीही खूप काही कमाविले , ३५० चूली पेटविणे सोपी गोष्ट नाही,

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !