शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!
शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : करीरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी, लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. 'कल्पनेतून जग निर्माण झाले' या कवितेनं जग बदलले असे विचार मांडणारे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ त्यांच्या स्वरचित कवितेत म्हणतानाच 'माणसातला माणूस असा घडवत जाते कवितेतून खदखदून हसवताना नकळत डोळ्यातून अश्रू येणे भाग पाडतात. कंकाळ यांच्या कवितेनं रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करत सभागृह जिंकून घेतलं.
शिक्षणाधिकारी राजू तडवी (मध्यवर्ती) यांनी हरीवंशराय बच्चन यांची कविता ऐकवून अभिजात कवितेचा अनुभव रसिकांना दिला. या कार्यक्रमाचे संयोजक मनपा अधीक्षक निसार खान यांनी शिक्षण विभागात कार्यरत कवी, शायर, लेखक ज्यांनी देशभर नाव कमावलं आहे त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे, कविसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील यांनी करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपशिक्षणाधिकारी रविंद्र काळे यांनी स्वत:ची कविता ऐकवत कविसंमेलनाला अधिक उंचीवर नेत चार चांद लावले. ७० हून जास्त कवींनी नाव नोंदणी केलेल्या या कार्यक्रमात बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, कवयित्री विद्या प्रभु, कवी अरविंद पवार, हिंदी माध्यमातील सुरेश मिश्रा, भारती श्रीवास्तव, पूर्णिमा पांडे, उर्दूचे मकसद आफाक, मोहसिन साहिल, वसीम अकील शाह यांनी कविता सादर करून सभागृहाची दाद मिळवली. सर्व कवींना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी अजय वाणी यांचा त्यांच्या सहा पुस्तकांच्या लेखनासाठी सत्कार करण्यात आला.
उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, अजय वाणी, ममता राव, अधीक्षक अशोक मिश्रा, मुख्तार शहा, निसार खान, प्रशासकीय अधि किसन पावडे पाटील, विजय जाधव, श्रीमती नसरीन, विभाग निरीक्षिका आरीफा शेख, अश्फाक शेख, विश्वास रोकडे सहित अनेक अधिकारी, शायर, कवी यावेळी उपस्थित होते. असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येईल असे सांगून शिक्षणाधिकारी यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा