बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांच्या मते मैत्री २२० आणि २८४ प्रमाणे असते ! राॅबीन डनबार यांचे मैत्रीसाठी सांख्यिकीय विश्लेषण !
बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !
‘दिए जलते है, फूल खिलते है, बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है !’ १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नमकहराम चित्रपटातील गीतकार आनंद बक्षी यांचे हे गीत, अगदी समर्पक आणि अर्थपूर्ण आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार (यंदा दि. ७ ऑगस्ट) म्हणजे तरुणाईचा आवडता ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात मैत्री दिन. या दिवशी विविध रंगांचे धागे एकमेकांच्या हातावर बांधून मैत्रीचे संदेश एकमेकांना पाठविले जातात. या संदेशांमधून मैत्रीच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचावयास मिळतात. त्यापैकी संकटात जो पाठीशी उभा राहतो, तोच खरा मित्र असतो, अशी मित्राची व्याख्या बहूतेकांनी केलेली पहावयास मिळते. तथापि, ‘संकटकाळी मदतीस येतो तो खरा मित्र नसून ज्याला आपल्या मित्राच्या उन्नतीतून खरा आनंद मिळतो, तोच खरा मित्र असतो’ अशी मैत्रीची अचूक व्याख्या हिंदी कवी कमलेश्वर यांनी केली आहे. एकदा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय गणिती रामानुजन यांना त्यांच्या मित्रांनी मैत्रीची व्याख्या विचारली असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्रता २२० आणि २८४ या संख्यांप्रमाणे असावी हे सांगुन २२० ला भाग जाणाऱ्या १,२,४,५,१०,११,२०,२२,४४,५५,११० यांची बेरीज २८४ तर २८४ ला भाग जाणाऱ्या १,२,४,७१,१४२ या संख्यांची बेरीज २२० येते असे स्पष्टीकरण सुद्धा दिले. शत्रूचा सामना करण्यापेक्षा मैत्री निभावणे कठीण असते हे सत्य प्रत्येकाला आपल्या खासगी आयुष्यात, देशांतर्गत राजकारणात, आंतरराष्ट्रीय राजनैतिक व्यवहारात अनुभवास आलेले असते. म्हणून मैत्रीची व्याख्या न समजलेने अनेक सामाजिक प्रश्न, आर्थिक कुचंबणा, राजकीय स्पर्धा, दंगली, लढाया उद्भवू शकतात, असे आंतरराष्ट्रीय अभ्यासक वासलेकर यांचे मत आहे.
रॉबिन डनबार यांचे मैत्रीवरील सांख्यिकीय संशोधन
मानव वंश शास्त्रज्ञ रॉबिन डनबार यांनी संख्याशास्त्रीय तंत्र वापरून केलेल्या संशोधनानुसार माणसाला अगदी जीवाभावाचे केवळ पाचच मित्र असू शकतात आणि तो जास्तीत जास्त १५० लोकांबरोबर अर्थपूर्ण नाते जोडू शकतो. हे संशोधन (प्राण्यांवरील) इतके गाजले की १५० या आकड्याला आता डनबार नंबर म्हटले जाते. तथापि, डनबार यांच्या मते १५० हीच संख्या खरी मानता येणार नाही, कारण जरी आपले अगदी जीवाभावाचे पाच मित्र असले तरी काही वेळा याखेरीज आणखी दहा-पंधरा चांगले मित्र असू शकतात. मात्र, प्रत्यक्ष कामाला येणाऱ्या संपर्कांची संख्या १५० असू शकते. यावर इतर संख्याशास्त्रज्ञांनी टीका केली असून जो सहसंबंध मनुष्येतर जातीमध्ये आहे तोच सहसंबंध मनुष्याला लावणे किती योग्य आहे ? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण हजारांच्या संपर्क गटांमध्ये वावरत असतो. याविषयी स्वतःशीच नव्याने संशोधन करून डनबारने फेसबुक वर असलेल्या किती मित्रांना आपण संदेश पाठवतो आणि त्यांच्या खासगी बाबीवर मत व्यक्त करतो ? याचे निरीक्षण केल्यावर पुन्हा एकदा डनबारच अगदी बरोबर असल्याचे आढळले.
यानिमित्ताने प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ शोपेन्हार यांच्या मते खरा मित्र भेटणे दुर्मिळ हिरा भेटण्यासारखे असून मित्र बनविणे हे फक्त तुमच्यावरच अवलंबून नसते, तर ते दोन्हीकडील प्रतिक्रियांचे फळ मानले जाते. ते तुम्हाला पाहिजे तसे आणि अचानक होऊ शकत नाहीत. मैत्री करताना घाई करू नका. तथापि केलीच तर ती शेवटपर्यंत निभवा. मैत्री शेवटपर्यंत निभविणे सर्वात मोठी कसोटी आहे. याचा अर्थ शोपेन्हार ने कोणासोबत मैत्रीच केली नाही, असा नसून तर त्यांनी जेव्हा जेव्हा कोणामध्ये इमानदारीची झलक पाहिली, तेव्हा त्याच्याकडे त्यांनी मैत्रीसाठी हात पुढे केला मात्र त्यांच्या पदरी नेहमी निराशाच पडली. समोरचा फक्त स्वत:चाच स्वार्थ पहायचा. यामुळे ते खूप दु:खी व्हायचे. त्यांना वाटायचे की त्यांचेही मित्र असावेत, ज्यांच्यासमवेत ते आपला वेळ मजेत घालवू शकतील. ज्यांच्यासोबत ते उठतील, बसतील. मात्र त्यांना आयुष्यात शेवटपर्यंत कोणीच मित्र मिळाला नाही. तथापि, त्यांच्या कुत्र्याने मित्राची कमतरता काही प्रमाणात भरून काढली. त्याला ते प्रेमाने आत्मा म्हणत असत. शोपेन्हार यांचे संपूर्ण जीवन एकाकी आणि मित्रांशिवाय गेले. ते कुणाला आपलं करू शकले नाहीत आणि कोणी त्यांचे होण्यासारखे काही केले नाही. एक व्यक्ती दवाखान्यात बेडवर पडून उदास होती. १५ दिवसांपासून ती आजाराने त्रस्त होती. या कालावधीमध्ये एक-दोन जणच तिला भेटून गेले. बाकी कोणी विचारपूसही केली नाही.जेव्हा ती फेसबुकवर असते तेव्हा तिला हजारो मित्र असतात. मित्रांना घेऊन आपण भ्रमाच्या युगात जगत असतो. आपण कितीही सोशल झालो तरी फक्त एक-दोन मित्रांनाच आपल्याविषयी आपुलकी वाटते. असे सुद्धा असू शकते की, एखाद्याकडे एकही मित्र नसेल, पण सर्वांशी ओळख असेल. शोपेन्हार यांच्या म्हणण्याचा किंवा रॉबिन डनबार यांनी केलेल्या संशोधनाचा मतितार्थ असा की भरपूर मोठी मित्र यादी ठेवण्या ऐवजी मोजके च असे मित्र ठेवा की जे तुमच्या गरजेच्या वेळी कसला ही विचार न करता धावून येतील. नाही तर लोकांचे फेसबुक वर ५००० मित्र असतात आणि प्रत्यक्षात कोणीही ओळखत नाही. त्यामुळे थोडा वेळ हा आपले कुटुंब, आपले खरे मित्र यांच्या साठी दिल्यास गरजेच्या वेळी तेच धावून येतील.
सद्यस्थितीत व्हॉटस् अॅपवर आणि फेसबुकवर हजारो मित्र असूनही अनेक व्यक्ती एकाकी दिसतात. त्यांना ज्यांच्या समवेत मनमोकळे बोलता-वागता येईल असे जवळचे कोणीही मित्र नसल्याने ते एकटेपणा जाणवतात. हे गर्दीतील एकाकीपण खरे मित्र नसल्यामुळेच येते. त्यामुळे मैत्रीदिनानिमित्त आपल्या मैत्रीची व्याख्या तपासून घ्यायला हव्यात, असे वाटते. दुध आणि पाण्याची खरी मैत्री. दोघे अगदी एकरूप होऊन जातात. दुध अग्नीने तापू लागले की त्यातील पाणी प्रथम तापते, त्याची वाफ होते आणि दुधाचा जीव वाचावा म्हणून ते आत्मबलिदान करते, नष्ट होते. आपल्यावरील संकटाच्या वेळी मित्राने केलेला त्याग पाहून मग दुधही आत्मबलिदानाच्या हेतूने भांड्यात वर-वर येते व कधी-कधी ते उतू जाऊन आत्मसमर्पण करते. शेवटी पु. लं. नी केलेली मैत्रीची एक सोपी व्याख्या- ‘रोज आठवण यावी, असं काही नाही, रोज भेट व्हावी, असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री'. शेवटी, ‘आभासी मित्रांच्या खांद्यावर डोके ठेऊन रडता येत नाही’, हे डनबारचे (१९९३) संशोधन आणि आनंद बक्षी यांचे १९७३ मध्येच नोंदविलेले ‘उम्रभर दोस्त लेकिन साथ चलते है !’ हे निरीक्षण प्रत्येकाने आपल्याला लागू पडते का पहावे, असे वाटते. मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !
प्रा. विजय कोष्टी,
कवठेमहांकाळ ता. सांगली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा