नासिकच्या युवा उद्योजकाचा सन्मान करणार माॅरिशसचे राष्ट्राध्यक्ष ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय अचिव्हमेंट अवाॅर्ड घोषित !!

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष करणार नाशिकच्या आबासाहेब थोरात यांचा गौरव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड घोषित
नाशिक (प्रतिनिधी)::-नाशिक येथील युवा उद्योजक, इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सचे डायरेक्टर आबासाहेब वामनराव थोरात यांना मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनच्यावतीने नुकताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड’ घोषित करण्यात आला असून,

हा अवॉर्ड मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते श्री. थोरात यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती इलाइट सर्टिफिकेशन ॲण्ड युनोव्हेटीव सोल्युशन्सच्या सीईओ स्वप्ना आबासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आबासाहेब थोरात उपस्थित होते.
               या पुरस्काराविषयी सांगताना स्वप्ना थोरात म्हणाल्या की, ‘पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संम्मेलने आयोजित केली जात आहेत. याची दखल मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनने घेत मॉरिशसमध्ये अशाप्रकारचे साहित्य संम्मेलन आयोजित केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

त्यानुसार मॉरिशस सरकारच्या कला, सांस्कृतिक विभाग तसेच भोर मधील फुले, शाहु, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि नागपूर येथील ‘संथागार’ संस्थेच्या विद्यमाने १ ते ५ ऑगस्ट २०१९ दरम्यान थेट मॉरिशस येथे फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संम्मेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. या संम्मेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची यशस्वी धुरा आबासाहेब थोरात यांनी सांभाळली होती. विशेष म्हणजे या संम्मेलनासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील शंभरपेक्षा अधिक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
           तसेच मॉरिशस सरकारच्या कला, सांस्कृतिक विभागाने देखील या संम्मेलनात सक्रीय सहभाग नोंदविला होता. या संम्मेलनाच्या माध्यमातून प्रथमच मॉरिशस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर झाला होता. या संमेलनाची प्रचिती म्हणून मॉरिशस सरकारने यावर्षीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर मॉरिशसमधील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश केला असून, मॉरिशसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचाही निर्णय घेतला. ही बाब नक्कीच भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तसेच मॉरिशस येथील मराठी मंडळी फेडरेशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ॲचिव्हमेंट अवॉर्ड देण्याचे घोषित केले असून, या पुरस्काराचे पहिले मानकरी आबासाहेब थोरात ठरले आहेत.

       आबासाहेब थोरात यांचे सामाजिक कार्य विचारात घेवून त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये म्हणजे मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही बाब गौरवास्पद असून, पुढच्या महिन्यात म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !