४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत पूर्ण !
पिंपळगाव बसवन्त येथील
श्री बालाजी हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. मनापासून प्रार्थना केली तर भगवान बालाजी नक्कीच इच्छापूर्ती करतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्याचेच प्रत्यंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन्त येथील बालाजी भक्तांना आले. ४० वर्षांपूर्वी काही बालाजी भक्तांनी पाहिलेले मंदिर उभारणीचे स्वप्न यंदाच्या मे - जून महिन्यात केवळ ४० दिवसांत त्यांच्याच पुढच्या पिढीच्या हातून पूर्ण झाले. हा चमत्कार बालाजीच्या कृपेनेच घडला, यात शंका नसल्याची भावना महेशनगरवासीयांची आहे.
पिंपळगाव बसवन्त हे नाशिक जिल्ह्यातील संपन्न गाव. बागायतदार शेतकरी द्राक्ष, कांदा पिकवतात. अनेक जातिधर्मांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. येथील माहेश्वरी समाजातील काही जणांनी गावात भगवान बालाजीचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडली. कारण तिरुपती बालाजीवर श्रध्दा असली तरी सर्वसामान्य भाविकांना लांबचा प्रवास करून तेथे जाणे शक्य होतेच असे नाही. म्हणून तसेच मंदिर उभे करण्याचा संकल्प करण्यात आला. मात्र तो सिद्धीस जाण्यासाठी ४० वर्षे जावी लागली. चिंचखेड रस्त्यावर ६६ गुंठे जागेवर महेशनगर ही वसाहत आहे. १८ प्लॉट्सवर बंगले उभे असून, १४ गुंठे म्हणजे १४ हजार चौरसफूट जागेत २०१५ मध्ये मंदिर उभारणीला सुरुवात झाली. १ ते ८ जून २०२२ दरम्यान व्यंकटेश बालाजी भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'व्यंकटरमणा गोविंदा'च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वीच्या ४० दिवसात सर्व अडथळे दूर होऊन निधीचीही पूर्तता झाली. तिरुपती येथून दि.२ मे रोजी श्री बालाजीची मूर्ती घडवून आणण्यात आली. ७ फूट उंचीची ही मूर्ती अखंड शाळीग्राम वापरुन तिरुपतीच्या पारंपरिक शिल्पकारांनी निर्माण केली आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असून हातांमध्ये शंख, चक्र, गदा धारण केले आहेत. अभय मुद्रेतील उजवा हात भक्तांना आशीर्वाद देतो. माथ्यावर उभट आकाराचा मुकुट तर कपाळी उभा चंदन टिळा खुलून दिसतो. विविध अलंकारांनी ही मूर्ती सजलेली आहे. येथे काटेकोरपणे पावित्र्याची जपणूक केली जाते. मूळचे जबलपूरचे संतदास तिवारी हे पुरोहित पूजाअर्चा करतात. त्यांनी नाशिकच्या बालाजी मंदिरात १० वर्षे सेवा बजावली आहे. मंदिर उभारणीत माहेश्वरी समाजाचा पुढाकार असला तरी गावातील अन्य सर्वच जातींमधील लोकांचे सहकार्य मिळते. नुकताच कृष्णजन्माष्टमी सोहळा थाटामाटात झाला. दहीहंडी व तुलसीअर्चना कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सर्वजण सहभागी झाले. आगामी काळात नवरात्रात ब्रम्होत्सव होईल; तसेच विविध उपक्रम आयोजित करण्याचा समितीचा मानस आहे. शाळांच्या, महिला मंडळांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या सहली येथे श्रीदर्शनासाठी याव्यात, असा प्रयत्न आहे.
सुनील (बाळासाहेब) भुतडा यांनी या मंदिर उभारणीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की ह.भ.प. माधवदास राठी यांच्या प्रेरणेने आम्हाला बळ मिळाले. पं. सूर्यकांत राखे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जून महिन्याच्या प्रारंभी १ ते ८ जून दरम्यान प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा झाला. त्या आधी श्री बालाजीच्या मूर्तीला जलाधिवास, धान्यवास, पुष्पवास व इतर मंगलविधी करण्यात आले. शुद्ध पितळेच्या भव्य आकाराच्या समया, मूर्तीमागची महिरप, मंदिरावरील कळस व पूजा उपकरणी कुंभकोणम येथून आणली. पुजारी म्हणाले की, पहाटे मंगलारतीने प्रारंभ होतो. सकाळी ७.३० वाजता सुप्रभातम् आरती केली जाते. त्यानंतर पूजाअर्चा, अभिषेक व बालभोग होतो. दुपारी १२ वाजता पूजा- आरती व भोग चढवला जातो. दुपारी ४ वाजता पंचोपचार पूजा होते. दररोज सायंकाळी ७.३० वाजता आरती व रात्री ९.३० वाजता शयनआरती केली जाते. शुक्रवार हा व्यंकटेश बालाजीचा वार असल्याने हरिपाठ, भजनसेवा केली जाते. राजेंद्र भदाणे सुरेल बासरीवादन करतात. माहेश्वरी युवक मंडळ सहकार्य करतात तर पिंपळगाव महिला मंडळ भजनसेवा देतात. रात्री ८.३० वाजता आरती केली जाते. ह.भ.प. राहुल क्षीरसागर हरिपाठ वाचन करतात. यावेळी मोठ्या संख्येने भाविक श्रोते उपस्थित असतात. बांधकाम प्रमुख संदीप कुशारे म्हणाले की, दाक्षिणात्य गोपुरम शैलीने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी दक्षिण भारतातून कारागीर आणले होते. मंदिराची उंची ४१ फूट तर राजगोपुरम् ५१ फूट उंचीचे आहे.भव्य सभामंडप असून समोर गरुडमंदिर व त्यामागे ३१ फुटांचा लखलखता ध्वजस्तंभ आहे. सोनेरी कळस लक्षवेधी आहे. कळसावर दशावतार शिल्पे आहेत. काही मोजक्या मूर्ती रंगीत असून संपूर्ण मंदिर निळसर करड्या रंगात उठून दिसते. भाविकांना मंदिरात प्रवेश करतांना पाय धुवून यावे लागते. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिसर विविधरंगी सुगंधी फुलबागेमुळे सुंदर दिसतो, दरवळतो. निसर्गरम्य, शांत वातावरणात सकारात्मक ऊर्जा देणारे हे मंदिर पिंपळगाव बसवन्तचे भक्तिस्थान ठरले आहे.
-संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार, कलासमीक्षक, नाशिक)
***********************************
या बालाजीभक्तांचे आहे सेवायोगदान...
मंदिर समितीचे विजय राठी, अध्यक्ष द्वारकानाथ मुंदडा, भैरूशेठ जागेटिया, जुगलकिशोर राठी, संतोष मुंदडा, महेश कलंत्री, अनिलशेठ चांडक, ऍड. रमाकांत मुंदडा, महेश राठी, गोकुळ मुंदडा, श्रीनिवास बूब, संदीप कुशारे, सुनील (बाळासाहेब) भुतडा, भगवान राठी, मदनशेठ बूब, दिलीप राठी हे सारे सदस्य तनमनधनाने सेवा-योगदान देत आहेत. आगामी काळात मंदिरासमोरच्या जागेत एक विविधोपयोगी सभागृह, समितीचे कार्यालय, स्वयंपाकगृह व प्रसादालय तसेच भक्तनिवासही उभारण्याची योजना आहे. बालसंस्कार केंद्र, स्वाध्याय केंद्र, सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात येईल. नागरिकांनी आपले वाढदिवस येथे येऊन साजरे करावेत. देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी सुनील भुतडा यांच्याशी ०९३७२९०९९५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा