अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !


अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !
 
       नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी भागातील पत्र्याचापाडा येथील विद्यार्थ्यांना मुंबईच्या अमास सेवा ग्रूप या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सन २०१६ पासून आदिवासी भागातील मुलांच्या, समाजाच्या समस्या ओळखून विविध मदत मिळवून  देण्यासाठी  'अमास सेवा ग्रुप ' सतत प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकीचे हे नाते आता घट्ट झाले आहे.

    शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया, विजय भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, भंडारदरा, वैतरणा, दिंडोरी परिसरातील ९० जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ( स्कूल बॅग, वही, पेन्सिल बाॅक्स, रेनकोट, पाटी, वाॅटर बॅग, चित्रकला वही, पेन, स्केल व गिफ्ट सेट) वाटप करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करीत आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुखद क्षण असतो. समाजामध्ये अशाही काही व्यक्ती आहेत ज्या आपला वाढदिवस गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्यरूपी भेट देऊन साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या आनंदात दुर्गम भागातील मुलांना सहभागी करून समाधान मिळवतात. 
   अशा व्यक्तींचा वाढदिवस आदिवासी भागातील गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य रूपी भेट देऊन साजरा करण्याचा अनोखा उपक्रम अमास सेवा ग्रूपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया यांनी सातत्याने हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ नुकताच जिल्हा परिषद शाळा पत्र्याचापाडा ( ता. दिंडोरी) शाळेतील ५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही, गिफ्ट सेट व खाऊ वाटप करून झाला. गेल्या ६ वर्षापासून 'अमास सेवा ग्रूप ' मुंबई ही संस्था आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकरीता कार्यरत आहे ' मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ' या उक्तीप्रमाणे अखंडपणे कार्य सुरू आहे. यानंतर विविध आदिवासी पाड्यांवरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !