मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !
यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे
व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !
सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या नकलांचे उत्तम सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गोळवलकर गुरुजी, चाचा नेहरू, बाजीराव पेशवे, शिवाजी महाराजांपासून तर मेरा जुता है जपानी गाणाऱ्या राज कपूर पर्यंत अनेकांच्या नकलांचे कार्यक्रम सादर केले. प्रत्येक कलाकाराला नावारूपाला येण्याआधी अतोनात कष्ट करावे लागतात तसेच जोशींना सुद्धा भरपूर कष्ट करावे लागले होते.
मॅट्रिक नंतर त्यांनी नासिकच्या रूंग्टा विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ग.वि. अकोलकर यांच्यासारखाच कोट आणि चष्मा लावून त्यांच्याप्रमाणे स्वतः हावभाव करून फोटो काढून घेतला. तो फोटो बघून सर्वांना खूप कौतुक वाटले. पण एका चुगलखोर व्यक्तीने तो फोटो खुद्द अकोलरांनाच दाखवून तुमची नक्कल सदानंद जोशीनी केली असे सांगितले. अकोलकरांनी जोशींना बोलावून आणायला सांगितले. तेव्हा आता जोशींची चांगलीच खरडपट्टी होणार असा अंदाज त्या व्यक्तीने केला. पण अकोलकर सरांनी तू याच कलेत करीअर कर असे सांगून खरोखर मोठा कलाकार होशील असा आशीर्वाद दिला.
मॅट्रिक नंतर त्यांनी नासिकच्या रूंग्टा विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ग.वि. अकोलकर यांच्यासारखाच कोट आणि चष्मा लावून त्यांच्याप्रमाणे स्वतः हावभाव करून फोटो काढून घेतला. तो फोटो बघून सर्वांना खूप कौतुक वाटले. पण एका चुगलखोर व्यक्तीने तो फोटो खुद्द अकोलरांनाच दाखवून तुमची नक्कल सदानंद जोशीनी केली असे सांगितले. अकोलकरांनी जोशींना बोलावून आणायला सांगितले. तेव्हा आता जोशींची चांगलीच खरडपट्टी होणार असा अंदाज त्या व्यक्तीने केला. पण अकोलकर सरांनी तू याच कलेत करीअर कर असे सांगून खरोखर मोठा कलाकार होशील असा आशीर्वाद दिला.
त्याप्रमाणे त्यांनी मुंबईत येऊन तसे प्रयत्न सुरू केले. पुढील काळात आपला ठसा उमटवला.
सदानंद जोशी यांच्यावर बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्याने त्यांनी काही वर्षे संघ प्रचारकाचे कामही केले. पुढे त्यांनी मुंबईत दंतमंजनाचा व्यवसाय सुद्धा केला. जाहिरात व्यवसायही करून बघितला. आचार्य अत्र्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याने ' शामची आई ' चित्रपटात सुरवातीला स्वतःचे चरित्र कथन करणाऱ्या शाम म्हणजेच साने गुरुजींची भूमिका करण्याचा मानही त्यांना मिळाला होता. त्याच चित्रपटास पहिला सुवर्ण कमळाचा राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला. दिल्लीत होणाऱ्या २६ जानेवारीला निघणा-या शोभायात्रेत महाराष्ट्राचा चित्ररथ सादर करण्याची सर्वात पहिली संधी त्यांना मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. शिवराज्याभिषेकाचा देखावा तयार केला होता त्यालाही सर्वोत्तम देखाव्याचे पारितोषिक मिळाले होते. १९६१ मुंबईत मार्शल मार्सो नावाचे फ्रान्समधील मुकाभिनय करणारे सुप्रसिद्ध कलावंत आले होते. त्यांच्याकडून मुकाभिनय शिकवण्याचे वचन मिळविले. त्या देशात जाऊन मुकाभिनयाचे प्रशिक्षण घेऊन त्याचा उपयोग आपल्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे ते करित असत. परदेशात जाऊन एकपात्री चे प्रशिक्षण घेऊन आलेले सदानंद जोशी हे एकमेव कलावंत होते. फ्रान्सला जाणे त्या काळात एवढी सोपी बाब नव्हती. त्यांच्या त्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ.आशा जोशींनी आपले मंगळसूत्र मोडुन ते पैसे त्यांना दिले होते. त्यांचे मामा ज्येष्ठ साहित्यिक, नाट्य समिक्षक श्री. माधव मनोहर यांनी सुध्दा वेळोवेळी खुप मदत आणि मार्गदर्शन त्यांना केले होते.
प्रत्येक मराठी माणसाला सुपरिचित असलेले बहुगुणी , बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले मराठा वृत्तपत्राचे संपादक, निर्भिड पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, विडंबनकार , टिकाकार, नाटककार, ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी होत असे महान वक्ते. चित्रपट निर्माते अशा थोर व्यक्तीमत्वाचे
व्यक्तीदर्शन ते हयात असताना त्यांच्या समोर करण्याचे धारिष्ट्य सदानंद जोशींनी १९६५ साली दाखवून एक मोठा उच्चांक प्रस्थापित केला. त्यासाठी दोन वर्षे अथक परिश्रम घेतले. अत्र्यांच्या "क-हेचे पाणी" आणि "मी असा झालो" या दोन्ही आत्मचरित्रपर पुस्तकांची मदत घेतली आणि त्यांच्या वेशात आणि आवाजात तंतोतंत अत्रे स्टेजवर साकार केले. त्या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभ १७ जानेवारी १९६५ रोजी झाला त्याप्रसंगी स्वतः अत्रे साहेबांनी "मी जिवंत असताना जोशींनी मला अमर केले आहे मी मरायला मोकळा झालो ! " असे उद्गार काढले होते. तीन वर्षे लोकांना भरपूर हसवून झाल्या वर काही तरी गंभीर करून बघावे म्हणून त्यांनी रणजीत देसाईंच्या स्वामी कादंबरीचे एकपात्री रूपांतर करून त्याचे ५० पेक्षा अधिक प्रयोग केले. तिकिट लाऊन एकपात्री कार्यक्रम हाऊस फुल्ल होऊ शकतो. हे सदानंद जोशींनी वारंवार सिद्ध करून दाखवले. त्यानंतर रंगनाथ कुलकर्णी, रणजीत बुधकर, व.पु.काळे. लक्ष्मण देशपांडे अशा अनेक कलावंतांनी पुढे ही परंपरा चालू केली. काका सदानंद जोशी यांच्या स्मृतींना प्रणाम !
अनिरुद्ध जोशी, नाशिक
( लेखक सदानंद जोशी यांचे पुतणे आहेत.)
■ शब्दांकन: पत्रकार संजय देवधर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा