घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके
घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके
स्वयंसिध्दा आयोजित प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ
नाशिक::- महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणामध्ये आर्थिक अंग अत्यंत महत्वाचे असून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी ते निर्णायक आहे. यासाठी चांगल्या घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड देऊन व्यवसायवृध्दीचे समीकरण यशस्वी करणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.
स्वयंसिध्दा समूहाच्या वतीने गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. फडके बोलत होते. माजी उपमहापौर अजय बोरस्ते, अर्चना बोरस्ते, योग विदुषी प्रज्ञा पाटील, माजी नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव या अतिथींसह आयोजक रूक्मिणी जोशी व मानसी सजगुरे यावेळी उपस्थित होत्या. कोरोना काळातील अनपेक्षित आर्थिक अस्थैर्याचा उल्लेख करत प्रा. फडके यांनी महिलांनी लहान व्यवसायातून स्वयंसिध्दता साधायचे आवाहन केले. अजय बोरस्ते यांनी, महिलांमधील उद्योजिका विकसित होणे काळाची गरज असल्याचे सांगताना नाशिकमध्ये खास महिलांसाठी प्रदर्शन स्थळे विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्रज्ञा पाटील म्हणाल्या, अर्थार्जनासोबत शारिरीक आणि मानसिक संतुलनाच्या दृष्टीने योगासह तत्सम व्यायाम आत्यंतिक गरजेचा असल्याने महिलांनी त्याचा अंगीकार करावा. प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांनी महिलांमध्ये व्यावसायिकता अंगी भिनली तर उद्योजक महिलांची संख्या वाढून समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
प्रास्ताविकात रूक्मिणी जोशी यांनी स्वयंसिध्दाच्या पहिल्याच उपक्रमाला मिळालेल्या यशाची चर्चा करताना महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहाण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सर्व अतिथींचा सन्मान करण्यात आला.
प्रदर्शनात ५० महिलांचा सहभाग
दरम्यान स्वयंसिध्दाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय प्रदर्शनात जिल्ह्यातील ५० महिलांनी सहभाग नोंदवला आहे. वैविध्यपूर्ण उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने प्रदर्शनाचे महत्व अधोरेखित झाले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अनेक नागरिकांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला. प्रदर्शनाचा रविवारी (दि. २४) अखेरचा दिवस असून नागरिकांनी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा