माधव सटवाणी यांना ३० जून रोजी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान !

माधव सटवाणी यांना ३० रोजी कालिदास पुरस्कार प्रदान !

कोकण मराठी परिषद, गोवा उपक्रम . डॉ. महेश खरात यांची उपस्थिती !

पणजी ::- कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेतर्फे दरवर्षी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार यंदा गोव्यातील ज्येष्ठ कवी माधवराव सटवाणी यांना जाहीर झाला असून येत्या ३० जून रोजी सायंकाळी ३.३० वाजता होणाऱ्या इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱ्या समारंभात औरंगाबाद येथील डॉ. महेश खरात यांच्या हस्ते हा पुरस्कार माधव सटवाणी यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून यापूर्वी गोव्यातील अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


माधव सटवाणी यांचा अल्प परिचय 

        माधव सटवाणी हे वाळपई तालुक्यातील वेळूस येथील असून गेली दशकांपासून त्यांचे कविता व इतर लेखन सातत्याने सुरू आहे. त्याचे ‘निमग्न’ आणि ‘एक शुभ्र टिंब’  हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या तिसऱ्या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहेत. इंग्रजी  वाङ्मय आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए.आणि एम. एड. असलेले प्रा. सटवाणी यांनी सत्तरी तालुक्यात १९६५ ते २००५ या काळात चार दशके ज्ञानदानाचे कार्य केले आहे. निवृत्तीनंतर सध्या ते पूर्णवेळ लेखन करत आहेत. 

                    त्यांचे ‘निमग्न’ (१९९९) आणि ‘एक शुभ्र टिंब’ (२०१०) असे दोन मराठी कवितासंग्रह असून, २०१७ मध्ये ‘फिफ्टी एव्हरग्रीन पोएम्स ऑफ माधव सटवाणी’ हा  त्यांच्या मराठी कवितांचा मोहनराव कुलकर्णी यांनी अनुवादित केलेला संग्रह प्रकाशित झाला आहे.या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ताळगाव येथील माधव राघव प्रकाशनने पणजीत आयोजित केला होता. 

         


  त्यांनी पहिली कविता १९६२ मध्ये इयत्ता दहावीत शिकत असताना केली. १९६९ साली त्यांनी काही कविता लेखन केले. परंतु १९७२ पासून त्यांचे कवितालेखन सातत्याने सुरू आहे.

            त्यांनी ललित लेखन, काव्य समीक्षा लेखनही केले आहे. ही दोन्ही पुस्तके तसेच ललितबंध (लेखसंग्रह) आम्ही नाटक शिकतो (बालनाट्य), बा. भ. बोरकरांच्या कविता रसग्रहण तसेच कथासंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 

            त्यांनी १९७४ मध्ये साहित्य कलोपासक मंडळाची स्थापना केली आहे. १९८२ मध्ये ते या मंडळाचे अध्यक्ष झाले. ‘बिल्वदल, साखळी’ या संस्थेतर्फे ३ डिसेंबर, २०१३ रोजी आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. त्यापूर्वी २००८ मध्ये वाळपईत भरलेल्या ‘युवा मराठी साहित्य समेलना’तील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. इचलकरंजी येथील दै. महासत्ता आणि कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, महाराष्ट्र गोव्यातील दैनिके तसेच दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत आहेत. 

           विष्णू सूर्या वाघ यांनी कला अकादमीतर्फे २०१६ मध्येआयोजित केलेल्या ‘काव्यहोत्र’ या राष्ट्रीय स्तरावरील कविसंमेलनात ते निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. त्यांना अकोला महाराष्ट्र येथील ‘अंकुर साहित्य संघा’चा ‘कवी बी’ साहित्य पुरस्कार बेळगाव येथील ‘वाङ्मय चर्चा मंडळा’चा कवी कृ. ब. निकुंब साहित्य पुरस्कार, कुलकर्णी साहित्य प्रतिष्ठानचा ‘शारदीय साहित्य पुरस्कार’, ‘बिल्वदल, साखळी’ या संस्थेचा ‘पं. महादेव शास्त्री पुरस्कार’, नाशिक येथील ‘नाशिक कवी संस्थे’चा ‘कुसुमाग्रज पुरस्कार’ तसेच उगवे-पेडणे गोवा येथील ‘यशवंत साहित्य राज्यस्तरीय’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. साहेबराव खंदारे आयोजित ‘आशिएन पोएट्री’ या विश्वव्यापी ऑनलाईन कविसंमेलनासाठी त्यांच्या दोन कवितांची निवड झाली आहे. 

         अडवई -सत्तरी, गोवा येथील नेताजी सुभाषचंद्र युवक मंडळ, बेळगाव येथील ‘माय मराठी संघा’तर्फे २०१४ मध्ये, २०१८ मध्ये वाळपई सार्वजिनक गणेशोत्सव मंडळातर्फे, २०१९ मध्ये वाळपई येथील गोमंतक मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांचे सत्कार  व गौरव झालेले आहेत. 

डॉ. महेश खरात यांचा अल्पपरिचय 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांचा ‘ओळ तुझी माझी’  हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून त्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘बुर्गांट’  ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तसेच त्यांचे समीक्षाविषयक अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. ते पी. एचडी साठीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पी.एचडी पदवी मिळवली आहे. अनेक संंशोधन प्रकल्पासाठी ते कार्यरत आहेत.

दोन पुस्तकांचे प्रकाशन 

या कार्यक्रमात माजी शिक्षणाधिकारी ज. अ. रेडकर यांच्या ‘एक प्रवास आठवणींचा’  या लेखसंग्रहाचे तसेच डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या ‘हिरव्या रानात’  या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉ. महेश खरात यांच्या हस्ते करण्यात येईल. 

आषाढस्य प्रथम दिवसे - कविसंमेलन 

महाकवी कालिदासांनी आषाढाच्या पहिल्या दिवशी ‘मेघदूत’ या महाकाव्याची निर्मिती केली. त्याच दिवशी कालिदास जयंती साजरी केली जाते. कोकण मराठी परिषद, गोवा या संस्थेतर्फे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे कविसंमेलनही घेण्यात येते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील कवयित्री प्रिया धारुरकर आणि प्रिया कालिका बापट (गोवा) या असतील. या कविसंमेलनात गोव्यातील नामवंत आणि नवोदित कवी- कवयित्री सहभागी होणार आहेत. या कविसंमेलनात औरंगाबाद येथील डॉ. रामकृष्ण दहिफळे आणि डॉ. संतोष देशमुख हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

प्रिया धारुरकर यांचा परिचय !

            प्रिया धारुरकर या साहित्यिका आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्श आहेत. त्यांचे ‘विदेही’ आणि ‘अंग भरून वाहणाऱ्या पान्ह्यातून’ हे दोन कवितासंग्रह तसेच ‘घन दाटले स्वर’ हा ललितलेख संग्रह प्रकाशित आहेत. महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत आहे. ‘मुक्त सृजन’  या साहित्यिक पत्रिकेच्या त्या सहसंपादिका आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !