वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा, महामस्तकाभिषेक संपन्न !

वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा,  महामस्तकाभिषेक संपन्न !
ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी  ( प्रतिनिधी )  सतत तेरा दिवस सुरू असलेल्या सोहळ्याची रंगत वाढत आहे.

काल सोमवारी ( दि.२७) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सकाळपासूनच मेघ दाटून आले होते. वर्षाऋतूमध्ये पावसाची सगळ्यांना आस लागली आहे. मोरांचा केकारव देखील सुरू आहे. अश्या अमृतमय वातावरणात भक्तीधारा बरसल्याने उपस्थित भाविकांनी जल्लोष केला.
उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंद मिळवला. अभिषेकानंतर दुपारी प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी सुरू झाली.

   रविवारी रात्री मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, सोलापूर, नांदगांव, शिर्डी, मालेगाव, नाशिक, सटाणा येथून असंख्य भाविक खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाचा आणि मराठी मातीचा मोठा सहभाग होता.

चेन्नई येथूनही काहीजण आले. काल सोमवारी( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या गिनीज विश्वविक्रमी १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा व पंचामृत अभिषेकाचा मान चेन्नई येथून आलेले प्रकाशचंद बडजात्या, सौ.संतोषदेवी, अनिता व विशाल सेठी, नीरज व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आल्याने त्यांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.

पंचामृत कलश त्यांनी सहपरिवार अर्पण केला.  महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली.

महाशांतीधारा कलश नांदगावच्या तेजपाल, स्वप्नील, स्नेहल, श्रेयांस कासलीवाल परिवाराने तसेच पवन व समन्वयक दिवाकर यांनी अर्पण केले. जयपूर येथील वीरेंद्रकुमार अजमेरा परिवाराच्या हस्ते रत्नकलशातून अनमोल रत्नवृष्टी समर्पित करण्यात आली. 
           सर्वांना पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींजींनी आशिर्वाद प्रदान केले. त्यांच्या व महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल, पारस लोहाडे यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला. काल महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या तेराव्या दिवशी सोमवारी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले. महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी.आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल अशोक दोशी, चंदशेखर कासलीवाल, हसमुख गांधी, सुजाता शहा, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.जीवनप्रकाश जैन यांनी केले.
नाशिकच्या पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे या काल
महामस्तकाभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

त्यांचे स्वागत व सत्कार मंजुषा पहाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
             हस्तिनापूर येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या परमपूज्य आर्यिकारत्न डॉ.चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी ऑनलाईन संवाद साधताना म्हणाल्या, "मांगीतुंगी सिद्धक्षेत्र ही अतिशय पवित्र भूमी आहे. येथील विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. हस्तिनापूर, अयोध्या, कुंडलपूर सारखेच महत्व साधुसंतांच्या पवित्र स्पर्शाने येथेही लाभले असल्याचे सांगून पूजापाठ व महामस्तकाभिषेक याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. अजूनही येत्या ३० तारखेपर्यंत भाविकांनी सहकुटुंब येऊन, दर्शन, अभिषेक, पूजन यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी बोलताना त्यांनी केले." 
   सजवलेल्या पंचामृत कलशांमध्ये शेकडो लिटर नारळपाणी, ऊसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधि तसेच हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले, यांचा समावेश करण्यात आला. भरतपूर येथून आलेले गायक संतोष यांनी सुमधुर भजनांनी वातावरणात पावित्र्य निर्माण केले. दिवसभर लांबलांबून भाविकांची वर्दळ सुरू होती. दुपारच्या सत्रात भगवान पार्श्वनाथ महामंडल विधान - पूजनाने वातावरण दुमदुमून गेले. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात गायन, वादन, नृत्य तसेच धार्मिक विषयावरील नाटीकांचा समावेश होता. उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढत असून त्याचे सुयोग्य नियोजन पीठाधीश रवींद्रकिर्ति स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था प्रमुख विशेष परिश्रम घेत आहेत. कालही सायंकाळी परगावाहून येणाऱ्या भाविकांची रीघ लागली होती. 
**************************************
पारस वाहिनीच्या माध्यमातून तसेच थेट देणग्यांची व्यवस्था !
   ज्या भाविकांना इच्छा असूनही मांगीतुंगी येथे काही कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही अश्यांना पारस वाहिनीच्या माध्यमातून ऑनलाईन पूजाअर्चा, महामस्तकाभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळते. दररोज जगभरातील भाविक त्याचा लाभ घेतात. इतरांनीही घ्यावा तसेच भगवान ऋषभदेव मूर्तीनिर्माण कमिटी मांगीतुंगी या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्र.32298663459 आयएफएस्सी कोड SBIN0002353 आणि पंजाब नॅशनल बँक खाते क्र. 3704005500000077 आयएफएससी कोड PUNB0370400  येथेही देणग्या जमा करता येतील. असे आवाहन पीठाधीश स्वस्तिश्री रवींद्रकीर्ती स्वामीजींनी, महामंत्री संजय पापडीवाल व कार्यकारिणी सदस्यांनी केले.
***********************************
सुमधुर गीतांनी वातावरण स्वरसुगंधित !
राजस्थानातील भरतपूर येथून आलेले गायक संतोषकुमार जैन व सहकारी आपल्या भक्तीपूर्ण गीतांमधून दररोज सकाळी व सायंकाळी सारे वातावरण  स्वरसुगंधित करतात. सब 
भक्तोंने ठान लिया है...., कलश हाथोमे लेकर करो अभिषेक प्रभूपर..., कलश छलकेगा ; पुण्य बरसेगा... महामस्तकाभिषेक करो ; पुण्यप्राप्ती करो... या व अश्या विविध भक्तीगीतांमधून ते भाविकांना मंत्रमुग्ध करतात. संतोषकुमार यांना गायनाचे प्रशिक्षण त्यांचे वडील व संगीतकार हरीश जैन यांच्याकडून बालवयात मिळाले. गेली २० वर्षे ते आपल्या सहकाऱ्यांसह जेथे जेथे जैन धर्मियांचे भव्य महोत्सवात संगीतसेवा करीत आहेत. रितेश कीबोर्डवर सुरेल साथ देतात. तर दमदार तालवाद्य साथ दीपक व नवीन यांची असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !