संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य, कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार !

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य
कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार !
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या तीन पिढ्या तुरुंगात होत्या, ते स्वतः नाशिक रोड, त्यांची पत्नी आशालता सोबत लहान मुलगी जयश्रीसह ऑर्थर रोड, भाऊ प्रभाकर येरवडा तर आई साबरमती कारागृहात यातना सहन करत होत्या, अशा या चळवळीत सर्व लढवय्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्याग, समर्पण नव्या पिढीने कायम लक्षात ठेवले पाहिजे, असे विचार त्यांचे सुपुत्र अनिल गणाचार्य यांनी व्यक्त केले. 

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लढलेल्या घराण्याच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघात आचार्य अत्रे यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या पुढाकाराने अत्रेय संस्था तसेच मनिषा प्रकाशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते उद्धवराव पाटील यांचे नातू अविष्कार पाटील, कै. प्रभाकर पाटील यांची मुलगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, गुलाबराव गणाचार्य यांचे सुपुत्र अनिल गणाचार्य, गजाभाऊ बेणी यांचे नातू श्रीकांत बेणी आदींचा यावेळी शाल, श्रीफळ आणि हुतात्मा स्मारकाची तसबीर देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मराठी बाणाचे अशोक हांडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सिद्धी विनायक ट्रस्टचे संचालक राजाराम देशमुख, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत हप्पे, शेकापचे कॉ. राजेंद्र कोरडे, आचार्य अत्रे यांचे नातू व मीनाताई देशपांडे यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशपांडे, पणतू अक्षय पै, हेमंत मंडलिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जैनू शेख आणि केसरबाई यांच्या चिरंजीवांनी शाहीर अमर शेख कलापथकाच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील भारदस्त पोवाडे सादर केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !