पितापुत्र रंगवतात सुरेख वारली चित्रे ! वडिलांप्रमाणे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड परदेशवारी साठी मुलाचीही इच्छा !!
पितापुत्र रंगवतात
सुरेख वारली चित्रे !
वारली चित्रशैली जशी कलावंतांच्या मनाला आनंद देते, तशीच ती त्यांच्या पोटाला घासही देते. डहाणू तालुक्यातील रायतळी या पाड्यावर राहाणारे नथू सुतार उत्तम वारली कलाकार आहेत. अनेक वर्षांपासून शेती कसतानाच ते सुंदर वारली चित्रे रंगवतात. त्यांचा मुलगा सुभाष त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन वारली चित्रे रेखाटतो. तो म्हणतो, "चारपाच महिने शेतीचे काम असते. उरलेल्या दिवसांमध्ये वडील व मी वारली चित्रे रंगवतो. त्यावर वर्षभर आमचा उत्तम उदरनिर्वाह होतो."
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यातर्फे दि.२७ ते ३१ मे दरम्यान नाशिकला आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आदिवासींच्या कलात्मक वस्तूंची दालने मांडण्यात आली. सहभागी होण्यासाठी वारली कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले. सुभाष सुतार आपली सुंदर वारली चित्रे घेऊन आला होता. ५० रुपयांच्या ग्रीटिंग कार्डपासून ५ हजार रुपयांच्या भव्य वारली पेंटिंगपर्यंत अनेक चित्रे त्याच्या दालनात सजली होती. सुभाषशी संवाद साधला असता तो म्हणाला, "१८ वर्षांपूर्वी मी वडिलांकडे वारली चित्रकला शिकलो.
त्यात गोडी निर्माण झाल्याने मी तासनतास त्यात रंगून जातो. अनेक प्रदर्शनांत मी माझी वारली चित्रे घेऊन सहभागी होतो. प्रदर्शनांमध्ये मोरांच्या चित्रांना सर्वाधिक मागणी असते. आम्ही मोराला समृद्धीचे प्रतीक मानतो. शहरातील रसिकांना, विशेषतः महिलांना मोरांची चित्रे अधिक आवडतात. याशिवाय मला स्वतःला शेती, पूजाविधी, लग्नचौक, देवचौक, गावदेव,
त्यात गोडी निर्माण झाल्याने मी तासनतास त्यात रंगून जातो. अनेक प्रदर्शनांत मी माझी वारली चित्रे घेऊन सहभागी होतो. प्रदर्शनांमध्ये मोरांच्या चित्रांना सर्वाधिक मागणी असते. आम्ही मोराला समृद्धीचे प्रतीक मानतो. शहरातील रसिकांना, विशेषतः महिलांना मोरांची चित्रे अधिक आवडतात. याशिवाय मला स्वतःला शेती, पूजाविधी, लग्नचौक, देवचौक, गावदेव,
तारपानृत्य या विषयांवरील चित्रे रंगवायला जास्त आवडतात. कारण त्यात आमच्या परंपरा, चालीरीती, संस्कृती यांचे दर्शन घडते. आमचे जीवन जंगल, शेती यांच्यावर आधारित आहे. आम्ही निसर्ग रक्षण, संवर्धन करतो. तो आमच्या दैनंदिन जगण्याचाच भाग आहे. त्याचेच प्रतिबिंब माझ्या चित्रांमध्ये उमटते."
सुभाष व त्याचे वडील नथू हे साडेपाच एकरांमध्ये प्रामुख्याने भात व त्याबरोबरच ज्वारी, तूर, खुरासणी, भेंडी आणि इतर भाजीपाला पिकवतात. सुभाषला तीन बहिणी व दोन भाऊ आहेत मात्र ते कोणीच वारली चित्रे रंगवत नाहीत. सुभाषची बायको अलका त्याला वारली चित्र रंगविण्यात मदत करते. मुलगी संजीवनी व मुलगा शुभम् यांना वारली चित्रकलेची आवड आहे, तेही मदत करतात. सुभाष दरवर्षी चार-पाच प्रदर्शनांमध्ये सहभागी होतो. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू येथे भरपूर चित्रविक्री होते. तो यापूर्वी भोपाळ येथील इंदिरा गांधी मानव संग्रहालय व जनजाती संग्रहालय, कोलकाता, नागपूर येथील कल्चरल मिनिस्ट्री, साऊथ सेंट्रल झोन सेंटर, कर्नाटकात बंगळुरू आणि गुलबर्गा, दिल्लीतील प्रगती मैदान व दिल्ली हाट येथील प्रदर्शनांत सहभागी झाला आहे. तेथे त्याने वारली चित्रशैलीचे प्रशिक्षण देखील दिले आहे. त्याचे वडील नथू फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड व इतर काही देशांत वारली चित्र प्रसारासाठी जाऊन आले आहेत. त्यासाठी त्यांना 'टीआरटीआय'चे डॉ.रॉबिन त्रिभुवन यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. आई धानीबाईला वारली जमातीची पारंपरिक गाणी, कहाण्या खूप माहिती आहेत. अशा २० परंपरागत कहाण्या आईवडिलांकडून जाणून घेऊन त्यांच्यावर सुभाषने चित्रे काढली व लेखनही केले. लवकरच पुण्यातील डॉ.सतीश पांडे त्याविषयी युरोपात पुस्तक प्रकाशित करणार आहेत. सुभाषच्या घरी जर्मन, फ्रेंच पर्यटक लॉकडाऊन पूर्वी मोठ्या संख्येने यायचे. दोन वर्षांच्या लॉकडाऊनच्या काळात सुभाष व त्याच्या वडिलांनी खूप चित्रे रंगवून ठेवली. त्यानंतरचे नाशिकला झालेले हे पहिलेच प्रदर्शन असल्याने सुभाष उत्साहात होता. त्याचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होवो ही शुभेच्छा.
-संजय देवधर
( वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ज्ञ )
***********************************
पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत १९६४ साली आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. तेथे आदिवासींचे जीवन, संस्कृती व कलेचे दर्शन घडविणाऱ्या १३५१ दुर्मिळ वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. आदिवासींची कारवीची झोपडी देखील येथे दिसते. २०१३ -१४ पासून दरवर्षी ५ दिवसांचे हस्तकला प्रदर्शन आयोजित केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकला मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शन झाले. त्यात पारंपरिक नृत्यस्पर्धा घेण्यात आल्या. सन २००४ पासून एखाद्या आश्रमशाळेत पारंपरिक वारली चित्रस्पर्धा घेण्यात येते. त्यातून परंपरा व नवनवीन कल्पना, प्रयोग यांची सांगड घातली जाते. सन १९९२ पासून आदिवासींच्या संस्कृती, चालीरीती यांची ओळख नागरी भागातील लोकांना करून देण्यासाठी अनुबोधपट व लघुपट तयार केले जातात. संस्थेने आतापर्यंत ९३ लघुपटांची निर्मिती केली आहे,अशी माहिती आदि महोत्सवात डॉ.रमेश रगतवान यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा