भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार !
       १६ मे ला बुद्ध जयंती साजरी होत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये मानव आणि निसर्ग सुखरूप कसे राहतील? हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. गौतम बुद्धांच्या मते, मानवाने निसर्गातील झाडे-झुडपे तसेच तमाम जीवजंतु बरोबरच नदी-तलावांतील पाणी स्वच्छ ठेऊन या सर्वांचे रक्षण केले तरच मानव स्वतःही सुरक्षित आणि स्वस्थ राहील. ‘भवतु सब्ब मंगलम्’

या त्यांच्या वचनाप्रमाणे माणूसच नव्हे  तर सर्व प्राणिमात्र, जीवसृष्टीचेच कल्याण व्हावे यासाठी त्यांची धडपड चालली होती. आपल्या शिष्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या लोककल्याणकारी संदेशांचा आणि वचनांचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संदेश आणि वचने ‘उदान’ नावाने ओळखली जातात. माणसाने जागृत म्हणजेच डोळस किंवा प्रज्ञावान व्हावे, बुद्धिवंत म्हणजेच  बुद्ध व्हावे, परावलंबी न राहता  स्वावलंबी बनावे, प्रकाश पुंज  म्हणजेच दीपक व्हावे, ‘अत: दीप भव:’ असे ते सांगतात. कारण मनुष्य जन्म दुर्लभ असून तो पुनः मिळण्याची शाश्वती नसल्याने माणसाने तात्काळ जागे व्हावे असे म्हणतात.
        गौतम बुद्ध सांगतात की प्रदूषण हे दोन स्तरावर समझून घेऊन ते रोखले पाहिजे. एक म्हणजे मनुष्याने वैयक्तिक पातळीवर आणि दुसरे सामुदायिक पातळीवर. एक व्यक्ति सुधारली आणि आपल्या आजूबाजूच्या झाडे तथा वनस्पतिं विषयी आणि जीवजंतुविषयी संवेदनशील झाली आणि सह्रदयतेने  व्यवहार करू लागली तर संपूर्ण समाजामध्येही आपोआप बदल होईल असे त्यांचे ठाम मत होते. याकरिता त्यांनी समाजासाठी पंचशील सिद्धांत (तत्वे) दिला  आहे, ज्याचे अनुसरण आणि अनुवर्तन  केले पाहिजे. पंचशील तत्वे अशी आहेत- प्राणीमात्रांची हत्या करू नये, चोरी, चाडीचपाटी, लावालावी करू नये, विवाहापूर्वी कामवासने पासून दूर राहणे तर विवाहानंतर पती-पत्नीशी एकनिष्ठ राहणे, खोटे बोलने किंवा खोटा व्यवहार न करणे, दारू, जुगार किंवा वाईट व्यसनांच्या आहारी न जाणे किंवा अशा ठिकाणी न जाणे. निरोगी मानव समाज निर्मितीसाठी हा उपदेश एखाद्या सूत्रा प्रमाणे आहे.
       बुद्धांनी सांगितले की, जगामध्ये पशू-पक्षी, झाडे-वनस्पती,जीवजंतूच्या अनेक जाती असतात. ज्या आपल्याला लांबूनही ओळखता येतात. मात्र माणसाला पाहून त्याची जात ओळखता येत नाही आणि म्हणूनच जगांत माणसाची ‘मनुष्य जात‘ ही एकच जात आहे. यात वेगळेपण किंवा भिन्नता नाही. दुसरे, कोणतीही व्यक्ति जन्माच्या आधारे उच्च, नीच असत नाही तर ती तिच्या कर्माने उच्च किंवा नीच ठरत असते. झाडाझुडूपामध्ये, बागेमध्ये, जंगलात, नदीकिनारी, गाव-शहरांपासून दूर भिक्षू निवास आणि विहार बांधण्यामध्ये बुद्धांचा भौगोलिक, नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणा बरोबरच पर्यावरण आणि परिस्थितीच्या शुद्धतेचा  आग्रह लक्षात येतो. विहार रचनेमध्ये कोणत्याही बाजूने हवा आली तर पूर्ण इमारतीमध्ये हवा आणि प्रकाश येऊ शकेल, विहाराच्या मध्यभागी अंगण, कडेला विहीर, सांडपाण्यासाठी गटार आदींवर विशेष लक्ष दिले जात असे. बाहेरून विहारामध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी हात-पाय धुण्यासाठी पाण्याची वेगळी व्यवस्था तसेच विहारात एका बाजूला छोटासा जलाशय असे. विनयपिटक (बौद्ध ग्रंथ) नुसार गवतावर, पाण्यामध्ये किंवा उभे राहून मल-मूत्र विसर्जनास मनाई  होती. बुद्धांनी पाण्याच्या योग्य वापरावर जोर दिला. ते पाण्याचा दुरुपयोग निषिद्ध मानत असत.  रोहिणी नदीच्या पाणी वाटपा वरून शाक्य आणि त्याच्या शेजारील राज्य  कोलियों मधील युद्ध हेही त्यांच्या गृह त्यागा चे एक कारण होते.
        एकदा कूटदंत नावाच्या व्यक्तीने बुद्धांना यज्ञा बाबत त्यांचे मत विचारले असता ज्या यज्ञात निष्पाप प्राण्यांची आहुती दिली जाते, तो यज्ञ निरुपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले होते. सुत्तनिपात   (बौद्ध ग्रंथ) नुसार गाईच्या रक्षणावर भर देणारे बुद्ध हे पहिले व्यक्ति होते. वनस्पतींची वाढ होण्यासाठी आणि मनुष्याला भोजन आणि ताकद  देण्यासाठी गाय मदत करत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या उपदेशाने लोकांनी पशुहत्या बंद केली आणि त्यामुळे पशुसंवर्धन झाले आणि त्याचा लाभ शेतीला झाला. गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणीद्वारे लोकांना वृक्षारोपणाचे महत्व पटून दिले आणि आपल्या अनुयायांना निसर्गाशी ताळमेळ ठेवून जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
          प्रा. विजय कोष्टी, 
          कवठेमहांकाळ (जि.सांगली)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे