आजपासून राष्ट्रीय महिला आयोगाकडून मानव तस्करीविरोधी विभाग सुरू !
मानवी तस्करीची प्रकरणे हाताळताना परिणामकारकता सुधारणे, महिला आणि मुलींमध्ये जागरूकता वाढवणे, तस्करीविरोधी कक्षांची क्षमता बांधणी करणे आणि प्रशिक्षण देण्यासह कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांचा प्रतिसाद वाढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महिला आयोगाने आज मानव तस्करीविरोधी विभाग सुरू केला.
कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या क्षमता बांधणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी हा विभाग प्रादेशिक, राज्य आणि जिल्हा स्तरावर पोलिस अधिकारी आणि अभियोक्त्यांसाठी लैंगिक संवेदना प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करेल. आयोगाला प्राप्त होणाऱ्या मानवी तस्करीशी संबंधित तक्रारींचे या विभागामार्फत निराकरण केले जाईल.
मानवी तस्करीविरोधात लढताना भेडसावणाऱ्या काही प्रमुख समस्यांमध्ये पीडितांच्या पुनर्वसनाचा अभाव आणि तस्करीची झळ पोहोचल्यानंतर त्यातून सुटका करण्यात आलेल्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल असंवेदनशील वृत्ती यांचा समावेश होतो, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. या अनुषंगाने हा विभाग देखरेख यंत्रणा सुधारेल आणि तस्करी रोखण्यासाठी आणि पीडितांच्या पुनर्वसनासाठी अवलंबलेल्या उपाययोजनांबाबत सरकारी संस्थांना प्रोत्साहन देईल. हा विभाग मानवी तस्करी पीडितांच्या सुटकेनंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी गरजेनुसार प्रशिक्षण देऊन आणि पीडितांवर पुन्हा आघात होऊ नये यादृष्टीने त्यांच्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करून त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा