अत्यावश्यक बाब,,,,,,,,,,,,,,,,, मानीव अभिहस्तांरणासाठी विशेष मोहिम ! सहकारी गृहनिर्माण संस्थांना ३० एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी- डॉ. सतिश खरे

मानीव अभिहस्तांरणासाठी विशेष मोहिम; सहकारी गृहनिर्माण संस्थांना ३० एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी- डॉ. सतिश खरे
 
नाशिक, दिनांक: ४ (जिमाका वृत्तसेवा)::-राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी १ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी बाकी आहे अथवा विकासकाकडून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण करण्यात आलेले नाही. अशा संस्थांनी ३० एप्रिल २०२२ पर्यंत नोंदणी करावी असे, सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 

        जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना अपार्टमेंट अॅक्ट १९७० अंतर्गत अपार्टमेंट मधील फ्लॅट व युनिट धारकांना देखील सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनशिप अॅक्ट अन्वये नोंदविण्यात आलेल्या अपार्टमेंट मधील सदनिका तसेच युनिट धारकांनी स्थावर मिळकतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
      या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाबतचे प्रस्ताव http://www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. तसेच सदर प्रस्तावाची मुळ प्रत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या कार्यालयास सादर करावी. प्राप्त प्रस्तावावर महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबतचा कायदा (मोफा) १९६३ नूसार सुनावणी अंतर्गत निर्णय घेवून गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट मधील सभासद व सदनिका धारकांना अभिहस्तांतरण प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार आहे. 



 आवश्यक कागदपत्रे

▪️ विहीत नमुन्यातील (नमुना ७) अर्ज व अर्जामागे रु.२०००/- चे कोर्ट फी स्टॅम्प.
▪️सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, Deed of Declaration ची प्रत.
▪️विकासकाने मंजुर करुन घेतलेल्या रेखांकन (Layoul) समाविष्ट असलेल्या सर्वे व गट नंबरचा ७/१२ उतारा व मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा, प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स-२ किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुरावा जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकूमनामा किंवा मृत्युपत्र इत्यादी. 
▪️सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस. संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिका धारकांची यादी.
▪️नियोजत प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र.
▪️नियंत्रित सत्ता प्रकार, नवीन अविभाज्य शर्त किंवा भोगवटदार वर्ग-२ अशा नोंदी ७/१२ वर किंवा मिळकत पत्रीकेवर असल्यास सक्षम प्राधिकाऱ्‍याची जमीन हस्तांतरणासाठी किंवा बिनशेती करण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आदेशाची प्रत. (लागू असल्यास)

 
असा होणार फायदा---
▪️गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट मधील सदनिका धारकांना अभिहस्तांतरणामुळे खालील प्रमाणे फायदे होतात. बिल्डर किंवा जमिन मालक अभिहस्तांतरण प्रक्रियेत असहकार्य करीत असल्यास त्यांचेविरुद्ध दाद मागण्याची व्यवस्था
▪️मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर हस्तांतरणासाठी बिल्डर, विकासक, जागा मालक यांचे सहकार्यासाठी सदनिका, फ्लॅट धारक, सहकारी गृहनिर्माण संस्थांना अवलंबुन राहण्याची आवश्यकता नाही.
▪️ मानीव अभिहस्तांतरणामुळे बिल्डर, विकासक यांचा संबंधीत अपार्टमेंट किंवा सोसायटीमधील एफ.एस.आय. टी.डी.आर, वरील दावा व हक्क संपुष्टात.
▪️सातबारा (७/१२) उतारा, प्रॉपटी कार्डवर नांव लागल्यानंतर अपार्टमेंट किंवा सोसायटीच्या पुनर्विकासाचा मार्ग सुलभ.
▪️ बिल्डर विकासक जमिन मालक यांचेविरूद्ध न्यायालयाीन दाव्यांमध्ये अभिहस्तांरणासाठी जाणारा वेळ व पैसा यांची बचत
▪️घरांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता घेतलेल्या घराचे संपूर्णत: मालक होण्यासाठी अभिहस्तांतरण प्रक्रिया महत्वाची.
▪️सातबारा (७/१२) उतारा, प्रॉपर्टी कार्डवर नाव लागल्यामुळे मालकी हक्काचा लाभ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !